तेंडूची पानेच्या वाचकांना आम्ही मागील लेखात एखादी 'तरी' गझल घेऊन येण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण करताना आम्हास अत्यंत आनंद होत आहे. आम्ही श्री. प्रणव सदाशिव काळे यांच्या "कुठे म्हणालो परी असावी" या गझलेची पहिली ओळ उसनी घेऊन गझल रचण्याचा प्रयत्न केला आहे. गुरुद्वयीने इस्लाह करून या शिष्यावर अनुग्रह करावा ही नम्र विनंती.

कुठे म्हणालो परी असावी
कधीतरी पण घरी असावी

हवी कुणाला छचोर मैना ?
वरायला छोकरी असावी

तरुस घरदार मानणारी
अशी कुणी वानरी असावी

नको अवाढव्य बॅंड-बाजा
फुकायला बासरी असावी

नकोय काकूसमान पण ती
जरा तरी लाजरी असावी

नकोत लुगडी जुनेर सूती
कधी तरी भरजरी असावी

उसळ नको अन नको आमट्या :(
खमंग मुर्गी करी असावी

नको "वहाव्वा", "सुरेख", "उत्तम"
विडंबनं बोचरी असावी

विदीर्ण झालास 'खोडसाळा'
तिची जिव्हा कातरी असावी

खोडसाळ उवाच

मायबोलीवर गझल कार्यशाळेची यशस्वी मुहूर्तमेढ रोवल्यानंतर गझलवैभवाचा रुचकर प्रसाद समस्त महाजालीय मराठी काव्यरसिकांना वाटण्याकरता मराठी गझलेचे सद्यकालीन द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांनी मराठी गझल : एक अखंड मैफल! नावाचे गुरुकुल स्थापन केले आहे. त्यांच्या या नूतन उपक्रमास आमच्या हार्दिक शुभेच्छा. (तो उपक्रम नाही हो ! अर्थात त्यासही आमच्या शुभेच्छा आहेतच. पण तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे.) या गुरुकुलात प्रवेश घेण्याची आमची खूप इच्छा होती परंतु गुरुद्वयीने "या संकेतस्थळावर विडंबने प्रकाशित केली जाणार नाहीत" असा नियमावलीतच सज्जड दम दिलेला असल्यामुळे आमच्या सर्व आशा-आकांक्षा धुळीस मिळाल्या.हा तर अगदी "प्रथमग्रासे मक्षिकापात" होता. मराठी गझलेच्या या अग्निहोत्रात ऋत्विजांनीच आम्हास प्रवेश नाकारल्याने आम्ही काही काळ अतिशय खिन्न झालो. मग आम्ही एकलव्यापासून स्फूर्ती घेऊन, गुरुंचे स्मरण करून इथे आमच्या या जालनिशीवर विद्याध्ययन करायचे ठरवले. 'तरही गझल' हा आदरणीय गुरुद्वयीचा अध्यापनाचा आवडीचा प्रकार असल्यामुळे आम्ही सध्या त्या अनुषंगाने अभ्यास करत आहोत. पण 'तरही' हा शब्द, का कुणास ठाऊक, आम्हास 'तर्र'ची आठवण करून देतो. [अवांतर : आमचे काही दुष्ट टीकाकार आमचे सारे लेखन तर्र अवस्थेतच केले जाते असे आमच्या अपरोक्ष बोलत असतात हे आमच्या कानी आले आहे. तुम्हा वाचकांच्याही जर हे कानी आले तर त्याकडे दुर्लक्ष करावे कारण हे टीकाकार दोन गटात मोडतात -
१) सदाशिव पेठी मनोवृत्तीचे सोवळे . यांना उत्तर दाग़ देहलवीने एकोणिसाव्या शतकातच दिलेले आहे :

"लुत्फ़े-मय तुझे क्या कहूँ ज़ाहिद
हाय कम्बख्त, तूने पी ही नहीं"
२) तीर्थप्राशनाच्या शुभकार्याचे निमंत्रण न मिळालेले असूयाग्रस्त. (हे बहुसंख्य ! यांची ही पोटदुखी दूर करणे आमच्या खिशाला परवडणार नाही.) ] त्यामुळे आम्ही आमच्यापुरते 'तरही गझल' चे 'तरी गझल' असे मराठीकरण केले आहे. एखादी तरी गझल (तरी शब्दावर इथे श्लेष केलेला आहे हे चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच ) रचून झाली की ती आम्ही या जालनिशीवर ताबडतोब सादर करू. वाचकांनी थोडी कळ काढावी. ( कोण रे तो सुटकेचा निश्वास सोडणारा ? )
वरील महाभारतीय रूपकांची यादी पुढे वाढवत आम्ही अशी प्रार्थना करतो की नव्या संकेतस्थळाच्या गुरुकुलातून लवकरच असे अनेक अर्जुन निर्माण होवो ज्यांना फक्त गझलरूपी पोपटाचा रदीफ़-काफ़ियारूपी डोळा दिसेल. हो, पण अशा अर्जुनांनी नंतर कुरुक्षेत्रावर द्रोण-कृपांनाच आव्हान दिले तर ? काळजी करू नका, त्या महाभारताचा आँखों देखा हाल तुमच्यापर्यंत पोचवायला हा खोडसाळ संजय तिथे असेलच. तेव्हा पाहात, आपलं, वाचत राहा तेंडूची पाने.

वर्मावर बोट

पुलस्तींच्या गझलेने आमच्या अगदी वर्मावर बोट ठेवलं. त्यामुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी आम्ही नेहमीप्रमाणे लेखणी हातात धरली.


पान आहे, कात आहे, भरवणारी नार आहे
हा चुना तळव्यावरी, हा तीनशेचा बार आहे

शिंग कोणी फुंकले की गाय लागे हंबराया
शिंग हे होते जयाचे तो तिचा का यार आहे ?

व्यर्थ ते ठरले महात्मे चोर जे होऊन गेले
हा वसा आहे कुणाचा, हा कसा व्यभिचार आहे ?

बडवते घरच्या धुण्यासम, घालते पत्नी धपाटा
मी रमावे मग इथे का? स्टेपनी तय्यार आहे!

जाहले पोटात का तव 'खोडसाळा' 'काव्य'जंतू ?
नित्य शब्दांचा तुला हा जाहला अतिसार आहे !

आनंदाने - २

चित्त ह्यांना आनंदाने गाताना ऐकून आमच्या आनंदसागरालाही उधाण आले. त्या लाटा जो गाळ मागे सोडून गेल्या तो खाली देत आहे.

खावे-प्यावे, फुगून जावे आनंदाने
वात अनर्गल सरून जावे आनंदाने

मधुमेहाची व्हावी लागण रसिकजनांना
शब्द गोजिरे रचून जावे आनंदाने

जिथे जिथे जाशील तू, तुला खांब दिव्याचा
श्वानांनी का करून जावे आनंदाने ?

राजकारण्या, पैशाची का चिंता तुजला ?
निवडुन यावे, चरून जावे आनंदाने

बोळामधले सर्व चेहरे सुंदर आम्हा
शीळ घालता पटून जावे आनंदाने

तुझ्या करांचे चित्र, लाडके‌, रंगबिरंगी
गालावर उमटवून जावे आनंदाने

मिळालीच तर अशी मेहुणी मला मिळावी
पत्नीला विस्मरून जावे आनंदाने

तह-कलमांना रटून झालो पास परीक्षा
आता ते विस्मरून जावे आनंदाने

दोन जणींच्या भेटीसाठी यावे आणिक
तिसरीला मी वरून जावे आनंदाने

माळ घातली ,बंदी झालो, आता तुम्ही
'सावधान' कोकलून जावे आनंदाने

-खोडसाळ

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१. खोडसाळाचा सागर तो, त्यात गाळच असायचा, मोती नाही.
२. "आनंदाने" हा शब्द ह्या 'काव्या'तील कोणत्याही ओळीत लागू होत असो वा नसो, तो लागू करून घ्यावा.
३. "कोकलून" - (१) बोंबलून (२) कोक पिऊन (३) कोकेन सेवून (४) वाचकाच्या मर्जीनुसार अन्य कोणताही अर्थ लावून

काल, जागतिक महिला दिनी, माफीचा साक्षीदार यांची स्त्री म्हणजे आईची वत्सलता ही कविता वाचली आणि सद्‌गदित का काय म्हणतात ते झालो. कंठ दाटला, ऊर भरून आला - आणि लेखणी स्रवू लागली :

स्त्री म्हणजे आईचा पाठीत धपाटा
स्त्री म्हणजे लेकीचा खरेदी-सपाटा

स्त्री म्हणजे धरणीकंपाची भीषणता
स्त्री म्हणजे सरितेतील भोवऱ्याची निर्दयता

स्त्री म्हणजे वेलीची झाडाला वापरण्याची चतुरता
स्त्री म्हणजे कुसुमाची मतलबी मोहकता

स्त्री म्हणजे छायेचे तासागणिक बदलणे
स्त्री म्हणजे जायेचे तासन्‌तास बडबडणे

स्त्री म्हणजे लक्ष्मीची चंचलता
स्त्री म्हणजे पुरुषाची निर्धनता

स्त्री म्हणजे अश्रुंची बळजोरी
स्त्री म्हणजे पुरुषांची कमजोरी !!

आमच्या मनोगतावर सध्या 'ऋतू' भलताच बहरात आहे. वैभव जोशींनी दिलेली ओळ "ऋतू येत होते, ऋतू जात होते" घेऊन तऱ्ही* गझल रचण्यासाठी सारे रथी, महारथी सरसावले आहेत. वानगीदाखल जयन्ता५२ ह्यांच्या काव्यप्रतिभेच्या वेलीस आलेले हे सुंदर फुल पहा - "ऋतू येत होते ऋतू जात होते-५". ह्या साहित्यिक वसंत ऋतूत आमच्या खोडसाळ बांडगुळ लेखणीसही किंचित बहर आल्यास नवल नाही. जयन्तरावांपासून स्फूर्ती घेऊन आमच्या काही ओळी सादर करीत आहोत.


ऋतू येत होते, ऋतू जात होते
नवे लग्न आता जुने होत होते

जुनी तीच पत्नी, जुने ते पतीही
नवे वाद हल्ली हजारात होते

कधी थांबले ना बरसणे तिचे ते
पितर का तिचे पाणी-खात्यात होते?

तशी ती तिची ओढणी द्वाड आहे
जरा वात येता खुली बात होते !

पिसारा इथे मी कितीही फुलवला
न लांडोर येते न बरसात होते

न होकार आला तरी दु:ख नाही
नवे पाखरू दृष्टिकक्षात होते


(* - अवांतर - मराठीत ह्यास 'तरीही' गझल म्हणावे काय? आणि इंग्रजीत "me too" गझल?)


कारकून ह्यांना पडलेला पेच काल आमच्या काही चिंताक्रान्त गझलकार मित्रांनी आमच्या निदर्शनास आणला. बिचाऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले होते. कारकून म्हणतात :

शराब कबाब शेरात नको
प्रतिसादीही पेचात नको


त्यांचे हे म्हणणे मान्य केलास ९९% शायरांना आपले दुकान कायमचे बंद करावे लागेल ह्याचा विचार लेखक मजकुरांनी केला आहे काय? त्यांच्यापुढे तमाम गझलकारांची कैफ़ियत मांडून आम्ही त्यांना आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करण्याची नम्र विनंती करीत आहोत. खालील शब्द जरी आमचे असले तरी भावना तमाम शायरवृंदाच्या आहेत.

गझलेत शराब, कबाब नको ?
उद्या म्हणाल शबाब नको !

देई अर्थ जी जगण्याला
तीच नेमकी बाब नको ?!

गझलेला ऋग्वेदाचा
पीतांबरी हिज़ाब नको

लक्ष्यार्थाशी दोस्ती कर
अभिधेचाच रुबाब नको

'खोडसाळ' व्हा दोस्तांनो
उगा सोवळी आब नको

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds