आज सहज जालभ्रमण करत असताना माझा StumbleUpon Toolbar (मराठीवर असीम प्रेम असूनही ह्यास आयुधफळी म्हणणं जीवावर येतं. क्षमस्व.) मला 10 Mistakes that Will KILL a Forum ह्या पानावर घेऊन गेला. मराठी संकेतस्थळांच्या चवाठ्यावर सध्या हा विषय रंगलेला असताना मी नेमका तिथे पोचलो हा निव्वळ योगायोग समजावा की दैवी संकेत ? असो. तुम्ही त्या जालपृष्ठाला अवश्य भेट द्या. मुद्दा क्रमांक ५ कडे खास लक्ष द्या. वैधानिक इशारा - तो वाचून तुम्हाला एखाद्या विशिष्ट संकेतस्थळाची आठवण झाल्यास त्यास हा खोडसाळ जबाबदार नसून तो केवळ तुमच्या मनाचा खेळ समजावा. हो, एकदा कानफाट्या नाव पडलं की...

मुद्दे २, ३, व ४ वाचल्यानंतरही स्मृती चाळवल्यासारखी होईल. मला मात्र हे सर्व वाचल्यानंतर एका जुन्या म्हणीच्या स्थलकालातीत सत्यतेची प्रचीती आली - घरोघर मातीच्या चुली. आपले प्रिय प्रशासक काही एकटे नाहीत हे बघून बरं वाटलं. कारण त्यांच्यासारखे इतर प्रशासक आहेत याचा अर्थ आपल्यासारखे अनेक समदु:खी आहेत. And misery loves company.
याच जालपृष्ठावर मला Flame Warriors या संकेतस्थळाचा दुवा मिळाला. तिथे फोरमवर वावरणाऱ्या सदस्यांचं केलेलं व्यंगचित्रांसहित वर्गीकरण आणि त्यांच्या वैशिष्ट्यांचं मार्मिक विवेचन वाचून हसून हसून पुरेवाट झाली. पोटभर हसून झाल्यावर मन आपोआप त्या वर्गीकरणात मराठी संकेतस्थळांवरील नेहमीचे यशस्वी कलाकार बसवू लागलं. काय फिट्टं बसतात हो!
तुम्हीही वाचा आणि हा खेळ खेळा. तुम्हालाही पटेल. हे वर्गीकरण निर्माण करणाऱ्या माईक रीडच्या निरीक्षणशक्तीला आणि विनोदबुद्धीला खोडसाळाचा सलाम.

1 Comment:

  1. MilindB said...
    खोडसाळाचार्य गुरुजी,

    त्या फ्लेम वारियर दुव्यातल्या वर्णिलेल्या सर्वच भूमिका आम्ही आजवर 'त्या जुन्या संकेतस्थळावर' अनेकदा वठवल्या आहेत, ह्याची जाणीव झाली. दुव्यासाठी धन्यवाद. एका नवीन संकेतस्थळावर ह्याचे मराठीकरण करायचा विचार आहे.

    - मिलिंदलव्य

Post a Comment



Newer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds