(फायदा?)

आमचे प्रेरणास्रोत : आदरणीय भूषणसाहेब कटककरसाहेब यांची रचना "फायदा? "



हो न हो, ठेहरूच, देखू ठेहरण्याचा फायदा
ठेहरणे येभी असावा चालण्याचा फायदा

मालकाचा त्रास सोसावा कसा हे जाणले
हा तुझ्या हपिसात आम्ही राबण्याचा फायदा

लीन केव्हा व्हायचे, पत्नीपुढे वाकायचे
जो शिके त्यालाच रात्री जागण्याचा फायदा

घेत गेलो मी मुक्याने बोलण्याचा फायदा
खूप मज झाला असे त्या चुंबण्याचा फायदा

दात तू घासायचे होतेस मित्रा टाळले
दंतवैद्यालाच झाला उपटण्याचा फायदा

रोज कोणी वेगळी पाहून मादक हासते
हाच आहे बारबाला पाहण्याचा फायदा

रोज कोणी वेगळा बापूस पोहे घालतो
हाच उपवर कन्यकांना पाहण्याचा फायदा

केवढा मी क्षुद्र मज कळलेच नसते हे कधी
केवढा हा बायकोशी बोलण्याचा फायदा

जागते पत्नी असे हा घोरण्याचा फायदा
घोर बघता रूप कळतो झोपण्याचा फायदा

फार होता त्रास छोटे पोहता मासे इथे
लाभला पण त्यात काटा काढण्याचा फायदा

घेतला नाहीच आपण नांदण्याचा फायदा
काय असल्या संयमाने वागण्याचा फायदा?

मी तुझी आई तुझी आई तुझी आई तुझी
घेतला आहेस म्हणुनी बडवण्याचा फायदा

खोडसाळा खूप कवितावाचनाचा फायदा
शब्द दुसर्‍यांचे, मिळे मज लाटण्याचा फायदा

प्रेरणा : 'क्षणाचा सोबती' यांची कविता 'संधी आणि मंदी'


मंदी आणि कुंदी

यांची कधी होत नसते ’जुगलबंदी"?

दोघी एकमेकींच्या सवती

घुटमळतात दोघी नवर्‍याच्या अवती भवती

मंदी असल्यास कुंदी पाळत ठेवते

कुंदी दिसल्यास मंदी तिला जळवते

मंदी चुकवता येत नाही

कुंदी रुसली की जवळ येत नाही

मंदी जाता जात नाही

कुंदी येता येत नाही

मंदी जाण्याची वाट बघावी लागते

कुंदी येण्याची वाट बघावी लागते

मंदी असताना चुकून कुंदी आली तर

हे नवर्‍या तिला झापलेसे कर

अन्यथा मंदी तिला खाऊ की गिळू करेल

आणि नवर्‍याची कंबख्ती ओढवेल

एक मंदी पुरे आहे घराला डोक्यावर घ्यायला

मात्रा फक्त एकच योग्य; कुंदी आवश्यक आहे, मंदीला जळवायला...

मंदीला जळवायला...!!

आमचे प्रेरणास्रोत : भूषण कटककर यांची मस्त गझल बोलणे त्याचे मनापासून ते...


ती म्हणाली तेच झाले शेवटी
ढोसली अन्‌ रेच झाले शेवटी

बोलणे बेंबीतळापासून ते
श्रोतृगण बहिरेच झाले शेवटी

एवढा खोटे खरेच्या कच्छपी
की तिला पोट्टेच झाले शेवटी

हालचाली आमच्या थंडावता
व्हायग्रा होतेच, झाले शेवटी

खात मी बसलो अधाशासारखा
आतड्यांचे पेच झाले शेवटी

प्रेम ज्यांचे नाव होते ठेवले
ब्रह्मचारी तेच झाले शेवटी

खोडसाळा, तू जसा देवास त्या
काव्यही प्यारेच झाले, शेवटी

देखणी / लेखणी

प्रेरणा : 'लेखणी'

काय मी सांगू तुला, केव्हा उचलली देखणी
तू घरी कटलास, येथे मी पटवली देखणी

पाहिले गौरांगनांसम चालता तिज रँपवर
मालफंक्शनले वसन जेव्हा घसरली देखणी

पाहिले नव्हते कुणी, शृंगारली ना तोवरी
पाहण्याची रीत नडली, रोज नटली देखणी

अर्थ गुजगोष्टीत नही, अर्थ नाही मीलनी
अर्थ बँकेतील सच्चा अर्थ, वदली देखणी

कोडकौतुक खोडसाळाने तिचे केले तरी
बोहल्यावर, हाय, दुसऱ्याचाच चढली देखणी

------------------------------------------------------------------


प्रेरणा : लेखणीचा उत्तरार्ध

'पिंड गाण्याचा नसे माझा', गरजली लेखणी
का तरीही कुंथुनी कविता चिरकली लेखणी?

फार शाई, फार कागद, लेखका संयम कुठे?
का, प्रभो, त्याची न तू अडवून धरली लेखणी?

काय अन् सांगू किती, होते असे अपचन तिला
शब्द वारा बापुडे अन् वातभरली लेखणी

जी करी चमचेगिरी राजापुढे, "तू ग्रेट बॉ! '
ती पुरी क्षेत्री रिघे, निष्ठा विसरली लेखणी

लादले निर्बंध ज्यांनी 'डायर्'ईया होउनी
हीच निर्बंधाविरोधी काल लढली लेखणी?

रावणासम दशजिह्वा, आयडी हजारो निर्मिले
पाग पाहून खेचरांची हसत सुटली लेखणी

वाचता काही कुणाचे, थांबली नाही कधी
खोडसाळा, काव्यरक्ताला चटवली लेखणी

आमची प्रेरणा : भूषण कटककर यांची बोल्ड ऍंड ब्यूटिफुल गझल 'गंधाच्या उलाढाली'


जरा चुंबावया जाता तिला, मळमळ मला आली
तिच्या तोंडातल्या हुंगून गंधाच्या उलाढाली

तुला जे पाहिजे होते तसे केलेस तू सारे
तुला पुष्कळ मजा आली परी मजला इजा झाली

उभी आहेस तू माहीत आहे पण कुणासाठी ?
कुणी शिट्ट्य़ा तुला मारून जातो खालच्याखाली

रचावे काव्य कोणीही, कुणी मोरीत रेकावे
कुणा थोडे मिळाले मद्य की तो लावतो चाली

रडावे वाचकाने, काव्य वाचुनिया किती वेळा
चला झटकून टाकूयात या अंगावरुन पाली

जरा कोठे निघालो मी, कसा पायास तो ओढी
मराठी माणसाच्या नेहमी का खेकड्या चाली?

पुरेसे काफ़िये केव्हाच माझे जाहले गोळा
नको रे, खोडसाळा, काळजी, कविता, चला झाली!

प्रेरणास्रोत : भूषण कटककर यांची कविता "श्वासात ताल आहे"


बिनधास्त वाजवावी मजला कुणीही येथे
माझा सदाचसाठी उपलब्ध गाल आहे

भक्ती स्वतः:च करतो, मूर्ती स्वतः:च असतो
वरती स्वतः:स नमतो, माझी कमाल आहे

जितका जमेल तितका उपभोग घेत जावा
सध्यातरी दिरांचा मधुचंद्र-काल आहे

मदिरा खराब आहे, आंबूस वास येतो
व्हिस्की न ही, गड्यांनो, देशीच माल आहे

जाते कुठे नि येते, हंसा कुणास ठाउक
भलतीच संशयास्पद हंसाचि चाल आहे

कापू किती किती मी या गीतकार माना
करणार काय सांगा? बकवास माल आहे

रंगित रुमाल पाही नि त्यास खूळ लागे
नजरेत फक्त एका, बकरा हलाल आहे

आजार हा कवींना, जुळवत हजार यमके
वाचू तरी किती मी ? बस हाल हाल आहे

बावीस, हाय, ओळी, चालू असे परीक्षा
केव्हाच लागलेला माझा निकाल आहे

या वाचनात आला ओठांस फेस माझ्या
जडला विकार उदरी, गोटा जमाल आहे

झाले कथून तरिही सोडून जात नाही
ही खोडसाळकीची कसली कमाल आहे !

(विश्राम)

प्रेरणा : मिलिंद फणसे यांची गझल "विश्राम"


मान्य, गर्दी फार येथे पण तरी विश्राम आहे
रोजच्या वाटेवरीचा बार हा निजधाम आहे

छेडणे तिज सोडले पाहून अनुजाला तिच्या मी
रेशमाचा भाउ हल्ली वाढला बेफाम आहे

खूपसे हितशत्रू आणिक वानवा नाही रिपुंची
तेव्हढ्यासाठीच माझा चालला व्यायाम आहे

अत्तरे लेऊन अंगी भेटलो होतो तिला मी
चारुगात्रीला, परंतू, वाटले तो घाम आहे

चार खांदे शोधण्यासाठी निघाले प्रेत माझे
बोलले, "शववाहिनीचा फार सध्या दाम आहे"

'मूर्ति'पूजेचा गुन्हा चुकला कुणा; सारेच 'तसले'
पूजती कांता कुणी, इतरत्र कोणा राम आहे

येउनी टाकून गेला शब्दपाचोळा कवी तो
झाड कवितांगण, तुझे ते, खोडसाळा, काम आहे

आमची प्रेरणा : 'सोबतीचा आव आहे' ही जयंता५२ यांची हृदयद्रावक तक्रार.


भोवती अंधार आहे, साथ नाही
बायकोचा डाव आहे; वाद नाही !

कोणताही खेळ नाही आज सोपा
झोपली अद्याप काही ब्याद नाही

ठेवले नाही खुशीने शस्त्र खाली
हारलो मी, पण दिली तू दाद नाही

भेटण्यासाठी तुला जागाच होतो
घोरणे कानास आले, साद नाही

का अजुन दारात माझ्या माप आहे?
अंगणी येतात सार्‍या, आत नाही

खोडसाळा ती म्हणाली, "बाय, टाटा"
जाउ द्या, नावीन्य काही यात नाही :(

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds