कोण आपणहून झाले

आमची प्रेरणा : कोण आपणहून आले

कोण आपणहून झाले, बनवले गेले किती ?
कंपुबाजीने इथे बायरन किती, शेले किती

दंग लाइन मारताना, खर्च हे कळले कधी ?
पटवण्यासाठी दिले परफ्युम किती, झेले किती

शीळ जी ऐकून खुलली तीच केवळ जाणते
चौक-चौकावर तिच्यावर जीव जडलेले किती

भेट अतिथींची टिपे अवघ्याच वस्तीची नजर
आजवर पोहे-चहा खाण्यास आलेले किती

श्वेत-अश्वेतात हल्ली रंगतो कलगी-तुरा
"लावुनी गाली चुना गोरे तुला केले किती"

"चोंबडा" म्हणुनी मतांची पिंक जी ती टाकते
नाक मुरडुन बोलते, " लुब्रे इथे मेले किती"

अमृताचे थेंब थोडेसेच गेली देउनी
पण कडू उपदेश भरलेले दिले पेले किती !

कैक नामी भ्रमर असलेल्या कवींना पाहिले
काव्य स्फुरलेले किती अन् यमक सुचलेले किती...?

बोलणे, खोड्या, तुझे झाले दफन पानावरी
गाडण्या काव्यास तुझिया लेखकू ठेले किती !

0 Comments:

Post a Comment



Newer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds