एक ढेरी...!

प्रेरणेचा उगम - प्रदीप कुलकर्णींची अप्रतिम गझल "एक नाते...!"


...............................................
एक ढेरी...!
...............................................

झाकताही येत नाही; टाळताही येत नाही
एक ढेरी; जी मला सांभाळताही येत नाही

पोट नसणारेच शेलाटे सभोती लोक सारे...
पोट मज त्यांच्यापुढे कुरवाळताही येत नाही!

घट्ट झाले पॅन्टचे ते बंद आता एवढे की -
पान ’इनो’च्या पुडीचे टाळताही येत नाही!

वाटते यावे तिने; पण, हाय, ऐसी वेळ आली...
वाढत्या पोटासवे चेकाळताही येत नाही!

एकदा अगदीच वैतागून तो तुंदिल म्हणाला...
’दु:ख माझे हे, तिला कवटाळताही येत नाही!’

गैरसोयीचीच ना ही एवढी वाढीव कंबर ?
नीट माझी पाउले न्याहाळताही येत नाही!

मज कळेना कोणती आहे कमी लिहिण्यात माझ्या...
पुनपुन: वाचू नका; पण चाळताही येत नाही?

एकदा का डुचमळाया लागला की लागला हा...
ढेर पोटाचा मला गुंडाळताही येत नाही!

पोटमापाची कशाला चौकशी आता फुकाची...
वाढलो आहे किती; पडताळताही येत नाही

वजन मज माझे घटवता पाहिजे तेव्हा न येई...
हाय, हे उष्मांक मजला जाळताही येत नाही!

स्वप्न तू बारीक होण्याचे पहा; बंदी न त्याला
तूर्त या मेदामुळे बोकाळताही येत नाही!

भावनांची धार संतत लाभते कविच्या कृपेने
काय हे ’खोड्या’, तुला शेवाळताही येत नाही ?!

- खोडसाळ

..............................................
रचनाकाल - २६-२७ जून २००९
..............................................

0 Comments:

Post a Comment



Newer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds