(मदार)

प्रेरणा : पुलस्ति यांची गझल मदार

"काय, गेली तक्रार वाड्यावर ?"
"छेड काढा अजून आडावर..."

भरड साडी, तरी खुलून दिसे
नेसणारी वयात आल्यावर

पाखरांचा बघा रुबाब जरा
भाव त्या मारतात कट्ट्यावर !

टाळतो कालिजात जाणे मी...
(ताण येतो उगाच डोस्क्यावर)

हात स्मश्रूत गुंतलेले जे
या मिशीची मदार त्यंच्यावर

(सर्वत्र "साभार परत")

जयन्ता५२ यांची सुंदर गझल "ना चांदण्यास जमले" वाचून म्हटलं बघू या आपल्यालाही काही 'जमतंय' का ते. पण कसलं काय? तेथे "पाहिजे जातीचे" ! कुठे जयन्तरावांसारखे जातिवंत कवी आणि कुठे खोड्या. आम्ही अजूनही 'खोड्या, शीक रे अ, आ, इ... ' च्या पातळीवर. 'जमले जसे जयन्ता, खोड्या, तुला न जमणे'
पण जित्याची खोड काही मेल्याशिवाय जाणार नसल्याने औद्धत्य करीत आहे. (जयन्तराव, तुम्ही आमची 'मजबूरी' समजून घ्याल अशी आशा करतो.)


ना गोवरास जमले ना कांजण्यास जमले
ती कंड शायरीची ना शमविण्यास जमले

'पिच' शोधला तुझा तो नवखा कुणी खिलाडी
शेजारच्या ’विकेट’वर ना खेळण्यास जमले?

डिवचत अनेक होत्या माशा मला, परंतु
नादात प्रीतिच्या त्या ना वारण्यास जमले

बस, पाहिले तुला अन् बेशुद्ध जाहला तो
परतून मम वसंता ना बहरण्यास जमले

दिन रात शहरभर मी फिरतो तुझ्याच मागे
कोणी हमाल दुसरा ना ठरवण्यास जमले

मी पाहिले तुला ती नक्कीच सर्वपित्री
होऊन भूतबाधा ना झोपण्यास जमले

----------------------------------------------------------

(खोडसाळ)

आमचे प्रेरणास्थान : जयन्ता५२ यांची गझल सुखास आता तुझे नाव आहे

घरात आला नवा भाव आहे
'सुहास' त्याला दिले नाव आहे

'दिला'स तू जर न चोरून नेले
तुझी सहेली 'सही !', 'वाव !' आहे

उगाच पत्ते पिसू मी कशाला
तुझा रडीचाच जर डाव आहे ?

'लिना' घरी हाय नवरा 'रिना'चा
तिच्या पतीला कुठे ठाव आहे ?

कट्यार कसली तुझी बोडक्याची
कशीबशी कापते पाव आहे

'दिला'त क्लृप्त्या किती खोडसाळा
मुखी परी बावळा आव आहे !

---------------------------------------------------
(खोडसाळ)

आमची प्रेरणा : बघत राहु दे तुझ्याकडे

फुकट राहु दे तुझ्याकडे
भाव घरांचे फार चढे                    ||धृ||

लाख न उरले, बनले कोटी
किमती पाहुन भरली भीती
मागुनी बघु कुणाकडे ?                 ||१||

कर्ज मिळे बँकांतुन सत्वर
फेडत बसता लागे घरघर
चक्रव्याजाचे उंच कडे                  ||२||

सत्य भेटले भाडोत्र्याला
पंख लागले घरभाड्याला
खोडसाळ अनिकेत रडे                ||३||



तुकोबांची व ज्ञानेश्वर माउलींची मन:पूर्वक क्षमा मागून ...

१)
आपुल्या माहेरा | जाऊ मी कशाला | खेचीन तुम्हाला | कोडतात ||

सुखदु:ख माझें | ऐकियलें नाहीं | कळवळा नाहीं | नवर्‍याला ||

सासुला यें शूळ | सुनेला पाहोनी | खुलें ती देखोनी | जावयासी ||

यांचें सवतीसि | लागलेसें चित्त | धाडी मज नित्य | माहेराला ||

फुक्या म्हणे त्यांना | येतील न्यावया | संगें आपुलिया | फौजदार ||

मूळ अभंग : तुकारामांची गाथा अभंग क्रमांक १५८७ इथे वाचा.

२)
देवींचिये द्वारी उभा जन्मभरी | तेणें युक्ति नारी साधियेल्या ||

चंद्रमुखी म्हणा सूर्यमुखी म्हणा | स्तुतीची गणना तोषकरी ||

असोनि संसारीं नेत्रे वेगु करी | देखतो उभारी बाह्या सदां ||

फुक्यादेव म्हणे गेलेत पाहुणे | शेजारचे राणे माडीवरीं ||

मूळ अभंग : श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ अभंग क्रमांक १ इथे वाचा.

३)
गोड चुंबनें तें बळें | घेंऊनी नामानिराळें ||

तैसा तूंहि आम्हाठायीं | खेळतोसी अंतर्बाहीं ||

भक्ष समजुनी चोरा | इथे वळवी मोहरा ||

फुक्या म्हणे अधीलपणे | अंग चर्चिलें चंदनें ||

मूळ अभंग : तुकारामांची गाथा अभंग क्रमांक ७६९ इथे वाचा.

४)
वाईटांचें भलें | दीन जाहलें चांगलें

आर्या, दिंडी, केका | त्यांचें मोल नाहीं, लेका

जळ्ळी सत्यज्योति | देतें करवंटी हाती

उंच निंच गोरा | परी गरीब नवरा

फुक्या म्हणे भले | ऐशा पत्नीने छळले

मूळ अभंग : तुकारामांची गाथा अभंग क्रमांक १७१६ इथे वाचा.

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds