सोनालीताई जोशी यांनी बेधकपणे म्हटले "धीट माझी प्रीत होती" आणि आम्हास आमच्या प्रीतीबद्दल ('प्रीती'इथे सर्वनाम आहे, विशेषनाम नाही याची वाचकमित्रांनी व खासकरून मैत्रिणींनी कृपया नोंद घ्यावी.) इतके दिवस मूग गिळून बसल्याची अत्यंत लाज वाटू लागली. तेव्हा सोनालीताईंपासून स्फूर्ती घेऊन आम्ही आज आमच्या प्रीतीचा कबुलीजबाब वाचकांसमोर ठेवीत आहोत.
खात होती, पीत होती
झिंगुनी नाचीत होती
कापणे अलगद गळा ही
कुंतलांची रीत होती
ढोंग होते सोवळ्याचे
(स्पर्शुनी खिजवीत होती)
पाहुनी ना पाहिले मज!
(छेड ती चिंतीत होती)
सोस होता पुरुरव्याचा
अप्सरा मस्तीत होती
हे कुठे होते विडंबन?
'खोडसाळी' प्रीत होती
Labels: विडंबन
इतकेच उभे असताना काट्यावर कळले होते
डायटने केली सुटका, वजनाने छळले होते
ही चरबी खादाडाने सहजीच जमवली नाही
दररोज बटाट्यांना मी भातात मिसळले होते
मधुमेह असे जडलेला, बी.पी.ही अंमळ चढले
पाहून बिले डॉक्टरची अवसानच गळले होते
'ही' उठली, धावत सुटली, परतून लाजुनी वदली
"ओळखा पहाटे, सखया, मज का मळमळले होते"
दुष्काळ इथे पुजलेला संसाराच्या पाचविला
नितनेमाने दर साली पण मीलन फळले होते
ही खबर ऐकुनी वदल्या चाळीच्या आया-बाया
या वीजकपातीपायी म्हातारे चळले होते
मी कॉलर ताठ करोनी असतो कट्ट्यावर हल्ली
बाकी ज्येष्ठांच्या कंठी मफलर आवळले होते
जमीन : कविवर्य सुरेश भट यांची नितांतसुंदर गझल ' आकाश उजळले होते'
Labels: हजल
केवळ कविता न पाडतो
त्यांचा मुडदा असतो पाडलेला
त्या पाडण्याच्या वेदना सांगण्यासाठी
रंगही त्यावर असतो फासलेला....
-:खोडकर खोडसाळराव (खवीस)
प्रेरणा : तुझ्यासाठीLabels: विडंबन
प्रदीप निफाडकरांच्या "माझे घराणे" ने प्रेरित होऊन माझे(ही)घराणे तुमच्यासमोर ठेवावेसे वाटले.
दूर तू जातेस का ऐकून गाणे ?
सहन मी केले तुझे भुक्कड उखाणे
राहिली आजन्म ती येथे कुमारी
भेटले सारे तिला माझ्याप्रमाणे
गान माझे ऐकुनी हा कर्ण फाटे
सप्तकाच्या पार जाते मम तराणे
टाकतो नि:श्वास मी कोणावरीही
भेटणारी वाटते पत्नीप्रमाणे
टाकले जेव्हा तिने हे नाव माझे
वाटले गावास मी साखरफुटाणे
मी भटांचा शिष्य आहे, काय सांगू !
अनुकरण संपेल केव्हा, देव जाणे
Labels: विडंबन
मिलिंद फणसे यांची गझल वाचून आम्हालाही एखादी गझल लिहावी असे वाटू लागले. कोणीसे म्हटले आहेच - "केल्याने होत आहे रे..."
दूध नाही, पाव नाही
आज नास्ता, राव, नाही
हार घेते, डूल नाही
हो, तशी तिज हाव नाही
हासते पाहून मजला
हा तिचा तर डाव नाही ?
विरह का भोगू सखीचा ?
मज दुजी का ठाव नाही ?
तागडी काव्यास कुठली ?
(हसवण्याला भाव नाही ?!)
तू कवी होशील कैसा ?
काव्य शब्दस्राव नाही
कर विडंबन 'खोडसाळा'
काव्य अपुले गाव नाही
Labels: विडंबन
श्रीयुत मिलिंद फणसे यांची विराणी वाचून 'तिने' एक उत्तर लिहून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या हाती दिलं. ते आम्ही खाली देत आहोत. मिलिंदरावांनी ( आणि आपण सर्वांनी) अवश्य वाचावे.
मुळीच नाही पटायचे मज तुझे बहाणे, तुझी कहाणी
सुधार, मेल्या, स्वत:स, मजला उगाच समजू नको अडाणी
अजून सुजलाय चेहरा अन् अजून जातोय तोल थोडा
अजून डोळ्यांत तारवटल्या दिसे नशा कालच्याचवाणी
म्हणायला सोडलीस मागे कुमारिकेंशी अफेर सारी
फळून सटव्या खुशाल गाती बरी तुझ्या प्रीतिचीच गाणी
सख्या कधीच्या निघून गेल्या बसून मेण्यात सासरी त्या
डरू नको तू, तुझे कराया उरेल पत्नी जुनी-पुराणी
विषाद याचा नसे मला की नकार आले अनेक मजला
उरेल आजन्म दु:ख हे की मला उजवले अशा ठिकाणी
नसेल हातात एक पैसा, नसेल ती सुंदरी इराणी
असेल विरहात सोबतीला, शिरावरी व्याज ते पठाणी
रचून असल्या टुकार कविता छळे जरी 'खोडसाळ' त्यांना
कुणी न त्याची करीत "वा, वा", कुणी न देतात 'चायपाणी'
Labels: विडंबन
जगण्याचा मी हक्क निभावत असतो असे म्हणत अजब ह्यांनी आम्हास कमालीचे निभावित, आपलं, प्रभावित, केलं. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेच आहे :
म्हणून काय कवणे चालोची नये ?" (चू. भू.दे. घे.)
श्वासांची मी करत मशागत असतो
पकण्याचा मी हक्क निभावत अस्तो
लेक्चरला मी डुलक्या काढत असतो
खाणे नसले फार जरी ते माझे
किलो-किलोने सतत बळावत असतो
कविता माझ्या विशेष नसल्या तरिही
इतरांच्या मी रोजच ढापत असतो
बाप लागता मागे माझ्या तिचा
जीव घेउनी मुठीत धावत असतो
बोलत आहे 'ती' माझ्याशी ऐसे
दिवास्वप्न मी नित्यच पाहत असतो
नजरेने ती मला खुणावत असते
नजर तिची मी कायम चुकवत असतो
वाचत नाही कोणी त्याचे लेखन
'खोडसाळ' का तरी फुशारत असतो ?
अजब यांची मनात माझ्या ही गझल आम्हास खूप आवडली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आम्हीही लिहिते झालो.
मनात माझ्या काही आता तगमग नाही
दीक्षित झाली नेने, आता धकधक नाही
रस्त्यावरती कसा पसरला सन्नाटा हा ?
कुणी न छेडी, कशी मुलांची शुकशुक नाही ?
प्रेम तुझ्यावर आहे माझे केव्हापासुन
तुझ्या मुखी पण कायम असते "नग, नग, नाही"
चेंडुफळीतुन कमविन म्हणतो पैसा थोडा
जाहिरातींची सोसत आता दगदग नाही
शून्यवीर ते ठरले राहुल, सचिन नि धोणी
'खोडसाळ' हा संघामध्ये का मग नाही ?
Labels: विडंबन
आज सहज जालभ्रमण करत असताना माझा StumbleUpon Toolbar (मराठीवर असीम प्रेम असूनही ह्यास आयुधफळी म्हणणं जीवावर येतं. क्षमस्व.) मला 10 Mistakes that Will KILL a Forum ह्या पानावर घेऊन गेला. मराठी संकेतस्थळांच्या चवाठ्यावर सध्या हा विषय रंगलेला असताना मी नेमका तिथे पोचलो हा निव्वळ योगायोग समजावा की दैवी संकेत ? असो. तुम्ही त्या जालपृष्ठाला अवश्य भेट द्या. मुद्दा क्रमांक ५ कडे खास लक्ष द्या. वैधानिक इशारा - तो वाचून तुम्हाला एखाद्या विशिष्ट संकेतस्थळाची आठवण झाल्यास त्यास हा खोडसाळ जबाबदार नसून तो केवळ तुमच्या मनाचा खेळ समजावा. हो, एकदा कानफाट्या नाव पडलं की...
मुद्दे २, ३, व ४ वाचल्यानंतरही स्मृती चाळवल्यासारखी होईल. मला मात्र हे सर्व वाचल्यानंतर एका जुन्या म्हणीच्या स्थलकालातीत सत्यतेची प्रचीती आली - घरोघर मातीच्या चुली. आपले प्रिय प्रशासक काही एकटे नाहीत हे बघून बरं वाटलं. कारण त्यांच्यासारखे इतर प्रशासक आहेत याचा अर्थ आपल्यासारखे अनेक समदु:खी आहेत. And misery loves company.
याच जालपृष्ठावर मला Flame Warriors या संकेतस्थळाचा दुवा मिळाला. तिथे फोरमवर वावरणाऱ्या सदस्यांचं केलेलं व्यंगचित्रांसहित वर्गीकरण आणि त्यांच्या वैशिष्ट्यांचं मार्मिक विवेचन वाचून हसून हसून पुरेवाट झाली. पोटभर हसून झाल्यावर मन आपोआप त्या वर्गीकरणात मराठी संकेतस्थळांवरील नेहमीचे यशस्वी कलाकार बसवू लागलं. काय फिट्टं बसतात हो! तुम्हीही वाचा आणि हा खेळ खेळा. तुम्हालाही पटेल. हे वर्गीकरण निर्माण करणाऱ्या माईक रीडच्या निरीक्षणशक्तीला आणि विनोदबुद्धीला खोडसाळाचा सलाम.
Labels: ललित
संपदाताईंच्या रितेपणाने प्रेरित होऊन आम्हीही कळफलक जरासा बडवायचा ठरवला.काय करणार, अखेर "महाजनो येन गता: स: पंथ:" (संस्कृतातील चुकभूल द्या. घ्या.)
पुन्हा पुन्हा मला वळून पाहतोय ढापणा
नवीन आज पाखरास शोधतोय ढापणा
निशा-उषा जरी घरात येत-जात सारख्या
तरी प्रभा मिठीत, हाय, ओढतोय ढापणा
न आठवे कसा, कधी, कुठून पोचला घरी
घुसून वर कडी हळूच लावतोय ढापणा
लबाड रास खेळतोय, गोपिके जपून ग
इथे-तिथे हळूच बोट लावतोय ढापणा
करात माळ घेउनी लबाड 'खोडसाळ' तो
वरात माझिया घरीच आणतोय ढापणा
Labels: विडंबन
कुठल्याही प्रकारचे लेखन "अनुमतीच्या प्रतीक्षेत" पडून राहण्याची हल्ली इतकी सवय झाली आहे की हे शब्द वाचल्याशिवाय आपण लेखन केले आहे हेच मनाला पटत नाही. आपली लेखनकामाठी अपूर्ण असल्याचा भास होत राहातो. त्यामुळे होतं काय की इथे जालनिशीवर लिहिताना चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं.
'ते' प्रशासक इथे येऊ शकत़ नाहीत. तेव्हा आम्ही पुन्हा आमच्या आवडत्या - एकलव्याच्या - भूमिकेत शिरलो. त्याने गुरू द्रोणाचार्यांची प्रतिमा समोर ठेवून धनुर्विद्येचा सराव केला. आम्ही मास्तरांच्या स्फूर्तीदायक शब्दांची प्रतिमा बनवून इथे डकवली आहे. आता आम्ही निश्चिंत, शांत मनाने लेखन करू.
आमची प्रेरणा - सोनालीवहिनींना झालेला भास.
धुवाया घेतले मोजे तुझे
मायेची सावली माहेरी विसावा
इथे ना विसावा, त्रास तुझा
सुवर्णा, क्षितिजा गुणी लेकी माझ्या
वंशदिव्याची पण आस तुला
काटक्यांच्या मोळी घेउनी चालते
डोईवर माझ्या भार तुझा
तसबिरीपुढे विडी मी ठेवते
आहे स्मरणात ढास तुझी
Labels: विडंबन
मराठी गझल - एक अखंड मैफल हे एक नुकतचं सुरू झालेलं मराठी संकेतसथळ. नवीन असल्यामुळे व सृजनशीलतेला वाहिलेलं असल्यामुळे तेथील वातावरण मुक्त असेल अशी अनेकांप्रमाणे आम्हालाही आशा होती. तिथे विडंबनांना मज्जाव असला तरी आम्ही वाचक व प्रतिसाददाता म्हणून तिथे वावरू इच्छित होतो. परंतु मनोगताच्या प्रशासनाचे वारे इतक्या लवकर marathigazal.comच्या गुरुद्वयीस लागतील असे वाटले नव्हते. गझल कार्यशाळेस श्री.चित्तरंजन भट यांनी दिलेल्या या प्रतिसादास एका सदस्याने ("नावात काय आहे?" - Shakespeare ) दिलेल्या प्रतिसादात 'जी' च्या वापरास हिंदीकरण ठरवून त्यावर कडाडून हल्ला चढवला. चाललेल्या चर्चेच्या मूळ विषयाबद्दल त्यांच्या प्रतिसादात काही नव्हतं. त्यांचा हा प्रतिसाद प्रकाशित झाला होता व काल आम्ही तो वाचला. गंमत म्हणजे हिंदीकरणावर आक्षेप घेणाऱ्या या प्रतिसादात त्यांनी "निकटवर्तीय" ( हिंदी), "शेर" (उर्दू) व गैर(उर्दू)समज हे 'जी'प्रमाणेच मूळचे अमराठी पण आता मराठी शब्दकोषात व बोलीभाषेत पूर्णपणे स्वीकृत शब्द वापरले होते. जर 'जी' आक्षेपार्ह तर हे शब्दही आक्षेपार्हच व ते प्रतिसादातून गाळावे, पर्याय म्हणून 'आप्तेष्ट', 'द्विपदी' व 'चुकीचा समज' हे शब्द वापरावे असा त्यांना आम्ही प्रतिसाद दिला. आज पाहातो तर गुरुद्वयीने त्या सदस्यांचा प्रतिसाद व त्यास आम्ही दिलेले उत्तर दोन्ही गाळले आहेत व त्या जागी हे लिहिले आहे. आम्हाला प्रश्न पडतो तो असा की जोपर्यंत आम्ही प्रतिसाद दिला नव्हता तोपर्यंत त्या सदस्याचा "कार्यशाळेशी संबंधित नसलेला" प्रतिसाद कार्यशाळेच्या संचालक मंडळाला चालला. मात्र आम्ही खोडसाळपणे फुग्यास टाचणी लावल्याबरोबर दोन्ही काढून टाकण्यात आले. म्हणजे गुरुद्वयीस allergy आहे ती नक्की कसली ? प्रतिसाद कार्यशाळेशी संबंधित नसल्याची ? की अस्मादिकांची ? कोणी कोडे माझे उकलेल का?
Labels: बातमी चौकशी
आमचे प्रेरणास्थान : मिलिंद फणसे यांची गझल "झाले जुने नभाचे ते चंद्र, सूर्य, तारे" .
झाले जुने पतीचे ते पँट, शर्ट, सारे
बोहारणीस देते, चमचा नवा हवा रे
पत्नीस ड्रेस लागे, पल्लू शिरावरी अन्
मैत्रीण अल्पवस्त्रा चाले बरी तुला रे !
हा रँप की असे हा दुष्काळग्रस्त जिल्हा ?
अन्नान्न बायकांना मॉडेल करू नका रे
वाया अनेक गेले रांगेत तास माझे
पोटात या नळाच्या असतील थेंब का रे ?
घेतात लोक हल्ली खोकून श्वास येथे
धूरात प्राणवायू भेसळ करू नका रे
निर्धास्त व्हा गुरांनो, सरली उपासमारी
लालू न मुख्यमंत्री, चारा तुम्हीच खा रे
तू शीक खोडसाळा गंभीर काव्य करणे
करती टवाळकीचा आरोप वाचणारे
Labels: विडंबन