प्रोफेसरांच्या (प्रा. सतीश देवपूरकर) बहुप्रसव व प्रतिभाशाली लेखणीतून झरलेल्या "कधी मी आगही प्यालो, कधी मी झोकला वारा!" ह्या गझलेने प्रेरित होऊन आम्ही केलेले हे पांढऱ्यावर काळे. प्रोफेसर, तुमच्याच शब्दांत सांगायचे तर,
"छान आहे तुझी गझल! आवडली.
फक्त अभिव्यक्ती थोडी अजून प्रभावी हवी होती.
आम्ही तुझी गझल अशी वाचून पाहिली......"
कधी मी एक पेग् प्यालो, कधी मी झोकल्या धारा!
कधी केलाय मी शिमगा, कधी केलाय पोबारा!
गळाले नाक चाफ्यासे तिचे सर्दीमुळे ऐसे
रुमालावर तिच्या वाहून तो सुकलाय लिप्तारा
तिचे ते ओठ सुजलेले, जणू बोटॉक्स केलेले!
कसे चुंबायचे त्यांना, तिच्या दातांसही तारा!
फिकिर नाही, जरी माझी निघाली धिंडही येथे;
जगाला लाभलो शायर, करिन हुकमी गझलमारा
दिल्या गझला किती त्यांना? कुठे मी मोजतो आहे?
मला पाहून केला वाचकांनी आज पोबारा
"मलाही" आकळेना का "स्वत:ची" आणि मग "माझी"
दिसे हा शेर 'खोड्या'ला द्विरुक्तीचाच डोलारा!
.....ना(ध्यापक) खोडसाळ
पद्यार्कचित्रण व निर्विष चिमटे विभाग,
रोजच्या खोड्या महाविद्यालय,
मु. पो. भादवि ४२०,
मराठी आंतरजाल
प्रेरणास्रोत : निशिकांत यांची द्विभाषिक गझल "रूखी, सूखी, बासी दावत"
टिचभर गझला लिहिण्यासाठी रोज कशाला हवी कवायत?
खून पसीना छोडो, भैया, इतनी मुष्किल नहीं किताबत
पहा दीन वाचकांस देतो तत्परतेने गझल द्विभाषिक
सवाल मेरा आज कवी से, "गयी तुम्हारी कहाँ रिवायत?"
शेर सांगता दुसर्यांना आनंदित होतो कवी परंतू
कहनेवालें यहाँ हज़ारों, सुननेवाला मिले, गनीमत
दिवे लागले, अतिथी गेले, तूच उबारा माझा आता
सोनेसे जागना है बेहतर, तनहाईमें करें शरारत
मला न चिंता, न काळजीही, ज़नानखान्यामध्ये सुखी मी
सवाल मुझको है सिर्फ़ इतना, बनाम किसके करूँ मुहब्बत
अंधाराच्या किश्श्यांवरती आत्मवृत्त लिहिण्याला बसलो
माहताब शरमाकर बोली, "बेग़ैरत हो, मियाँ, निहायत"
अलिबाबाच्या गुहेत होत्या तिघी, संपदा, माणिक, नीलम
याद आ गयी मुझको भी किस वख़्त मगर कंबख़्त शराफत
लग्नावरती आज भरवसा कसा, कुणी अन् किती करावा?
निकाह फर्ज़ी, फर्ज़ी काज़ी, गले पड गयी मेह्र की आफत
दोषपूर्ण गझलांच्या "खोड्या" काढत केले लेखन सारे
अर्ज़ मेरी है यही खुदासे, रहे सुखनवर सभी सलामत
वाचकांची बोंबाबोंब (आणि शिव्या :) ) टाळण्यासाठी उर्दू शब्दांचे अर्थ खाली देत आहे.
किताबत - लेखन
रिवायत - परंपरा
गनीमत - पर्याप्त
शरारत - खोडसाळपणा, खोड्या
बेग़ैरत - निर्लज्ज
शराफ़त - सभ्यता
आफ़त - संकट
सुखनवर - कवी
सलामत - सुरक्षित
मी बोललो न काही, तू बोलतेस सारे
ह्यालाच नवयुगाचे म्हणतात काय वारे ?
विसरू कसा, प्रिये, मी मधुचंद्र आपला तो
येतो अजून काटा, येती किती शहारे
वाटायचे, करावे तू गप्प चुंबनांनी
तू ऐकवीत बसली गीतेतले उतारे
चाले सरस्वतीचे नर्तन तुझ्या जिभेवर
अन् शब्द संपल्यावर नुसतेच हातवारे
मी नेत्रपल्लवीने 'विषया'स छेडल्यावर
बघसी वटारुनी तू संतप्त नेत्र घारे
पाणी दुज्या तळ्यांचे चाखवयास जावे
तर ठेवतेस कायम माझ्यावरी पहारे
दिसतील काय, देवा, मजला दिवस असेही
'खोड्या' तिच्या 'अरे'ला जेव्हा करेल 'का रे' ?
Labels: कविता
ज.के.उपाध्ये लिखित "विसरशील खास मला" हे मराठी भावगीतांच्या सुवर्णकाळातील एक गाजलेले गाणे. (इथे उपलब्ध). विरहकाळात प्रियकर इतरत्र गुंतून आपल्याला विसरून जाईल ही प्रेयसीची भीती कालातीत असली तरी गीताची भाषा आजच्या संगणकीय, विश्वजालीय युगात कालबाह्य वाटते. संगणक क्षेत्रात जशी प्रत्येक सॉफ्टवेअर, ग्राहकाची इच्छा व गरज असो वा नसो, सतत अद्ययावत, चुकलो, अपडेट, केली जाते त्याप्रमाणे हे सुंदर गाणेही 'अपडेट' करण्याची आम्हास खोडसाळ लहर आल्यामुळे पुढील पंक्तिप्रपंच. तेच प्रेम, तेच प्रियकर-प्रेयसी, तोच विरह, तेच अधिकृत अभ्यासक्रमाबाहेरील 'विषय', तीच भीड. केवळ रूपकं आधुनिक. तेव्हा सादर आहे 'विसरशील खास मला_ver.2', अर्थात "ट्विटरशीलही न मला" :
ट्विटरशीलही न मला रेषेआड* होता
पिंगा ह्या ऑर्कुटवर देशि जरी आता**
रेषेआड झाल्यावर सृष्टिही निराळी
मैत्रिणिही विविध, प्रणय-विषय भोवताली
गुंतता तयात कुठे, पिंग आठवीता
स्वैर तू अनंग, विश्वजाल विहरणारा
वशहि वशीकरण तुला गुगल, याहुद्वारा
पिंगशील केव्हा मज कॉन्फ-चॅट करता
वॉल आणि स्क्रॅप तुला दाखवू कशी मी
वेबकॅम चॅटनेच पिंगपूर्तता ही
याकरता रेषेआड होऊ नको नाथा
* : offline
** : ऑर्कुटवरून फेस्बुकवर बढती घेतलेल्यांनी ही ओळ
'पोका ह्या फेस्बुकवर करशि जरी आता'
अशी वाचावी ही नम्र विनंती.
जयन्ता५२ यांची सुंदर गझल "ना चांदण्यास जमले" वाचून म्हटलं बघू या आपल्यालाही काही 'जमतंय' का ते. पण कसलं काय? तेथे "पाहिजे जातीचे" ! कुठे जयन्तरावांसारखे जातिवंत कवी आणि कुठे खोड्या. आम्ही अजूनही 'खोड्या, शीक रे अ, आ, इ... ' च्या पातळीवर. 'जमले जसे जयन्ता, खोड्या, तुला न जमणे' 
पण जित्याची खोड काही मेल्याशिवाय जाणार नसल्याने औद्धत्य करीत आहे. (जयन्तराव, तुम्ही आमची 'मजबूरी' समजून घ्याल अशी आशा करतो.)
ना गोवरास जमले ना कांजण्यास जमले
ती कंड शायरीची ना शमविण्यास जमले
'पिच' शोधला तुझा तो नवखा कुणी खिलाडी
शेजारच्या ’विकेट’वर ना खेळण्यास जमले?
डिवचत अनेक होत्या माशा मला, परंतु
नादात प्रीतिच्या त्या ना वारण्यास जमले
बस, पाहिले तुला अन् बेशुद्ध जाहला तो
परतून मम वसंता ना बहरण्यास जमले
दिन रात शहरभर मी फिरतो तुझ्याच मागे
कोणी हमाल दुसरा ना ठरवण्यास जमले
मी पाहिले तुला ती नक्कीच सर्वपित्री
होऊन भूतबाधा ना झोपण्यास जमले
----------------------------------------------------------
(खोडसाळ)
आमचे प्रेरणास्थान : जयन्ता५२ यांची गझल सुखास आता तुझे नाव आहे
घरात आला नवा भाव आहे
'सुहास' त्याला दिले नाव आहे
'दिला'स तू जर न चोरून नेले
तुझी सहेली 'सही !', 'वाव !' आहे
उगाच पत्ते पिसू मी कशाला
तुझा रडीचाच जर डाव आहे ?
'लिना' घरी हाय नवरा 'रिना'चा
तिच्या पतीला कुठे ठाव आहे ?
कट्यार कसली तुझी बोडक्याची
कशीबशी कापते पाव आहे
'दिला'त क्लृप्त्या किती खोडसाळा
मुखी परी बावळा आव आहे !
---------------------------------------------------
(खोडसाळ)
आमची प्रेरणा : बघत राहु दे तुझ्याकडे
फुकट राहु दे तुझ्याकडे
भाव घरांचे फार चढे ||धृ||
लाख न उरले, बनले कोटी
किमती पाहुन भरली भीती
मागुनी बघु कुणाकडे ? ||१||
कर्ज मिळे बँकांतुन सत्वर
फेडत बसता लागे घरघर
चक्रव्याजाचे उंच कडे ||२||
सत्य भेटले भाडोत्र्याला
पंख लागले घरभाड्याला
खोडसाळ अनिकेत रडे ||३||
तुकोबांची व ज्ञानेश्वर माउलींची मन:पूर्वक क्षमा मागून ...
१)
आपुल्या माहेरा | जाऊ मी कशाला | खेचीन तुम्हाला | कोडतात ||
सुखदु:ख माझें | ऐकियलें नाहीं | कळवळा नाहीं | नवर्याला ||
सासुला यें शूळ | सुनेला पाहोनी | खुलें ती देखोनी | जावयासी ||
यांचें सवतीसि | लागलेसें चित्त | धाडी मज नित्य | माहेराला ||
फुक्या म्हणे त्यांना | येतील न्यावया | संगें आपुलिया | फौजदार ||
मूळ अभंग : तुकारामांची गाथा अभंग क्रमांक १५८७ इथे वाचा.
२)
देवींचिये द्वारी उभा जन्मभरी | तेणें युक्ति नारी साधियेल्या ||
चंद्रमुखी म्हणा सूर्यमुखी म्हणा | स्तुतीची गणना तोषकरी ||
असोनि संसारीं नेत्रे वेगु करी | देखतो उभारी बाह्या सदां ||
फुक्यादेव म्हणे गेलेत पाहुणे | शेजारचे राणे माडीवरीं ||
मूळ अभंग : श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ अभंग क्रमांक १ इथे वाचा.
३)
गोड चुंबनें तें बळें | घेंऊनी नामानिराळें ||
तैसा तूंहि आम्हाठायीं | खेळतोसी अंतर्बाहीं ||
भक्ष समजुनी चोरा | इथे वळवी मोहरा ||
फुक्या म्हणे अधीलपणे | अंग चर्चिलें चंदनें ||
मूळ अभंग : तुकारामांची गाथा अभंग क्रमांक ७६९ इथे वाचा.
४)
वाईटांचें भलें | दीन जाहलें चांगलें
आर्या, दिंडी, केका | त्यांचें मोल नाहीं, लेका
जळ्ळी सत्यज्योति | देतें करवंटी हाती
उंच निंच गोरा | परी गरीब नवरा
फुक्या म्हणे भले | ऐशा पत्नीने छळले
मूळ अभंग : तुकारामांची गाथा अभंग क्रमांक १७१६ इथे वाचा.
कुणीतरी अम्हा पटापट कविता वाचून सांगेल काय
या रचण्यावाचुन अडलय काय ? ॥धृ॥
पाडत असतो रोज नवी
कराल केव्हा, कविवर, तुमच्या काव्याची भैरवी ? ॥१॥
गझलांचे खच जिथे-तिथे
विडंबनाची सरिता कायम दुथडीने वाहते ॥२॥
अक्षरगण-कट्टर कोणी
बेरीज चुकता म्हणे कवी ही मुक्तछंद-बांधणी ॥३॥
Labels: कविता
प्रेरणा : त्रिवेणी
१.
एखादा पाहुणा दारात उभा राहिल्याशिवाय
कळून येत नाही
आपल्या खिशाची तंगी
२.
सापडता सापडत नाही
या नाडीचे दुसरे टोक
या लेंग्याला बटणं लाव...
३.
मंदिराकडून नकारघंटानाद
तिच्या ’दी’कडून रुकार
हे मात्र औरच
४.
रात्रीच्या या तिसर्या प्रहरात
कुणावर भुंकताहेत
!@#*&%#* कुत्र्यांची टोळकी...
५.
मनसोक्त दारू पिली
फुल्ल कोंबडी हादडली
निजलो आहे मस्त तृप्तीचे ढेकर देउनी.
६.
ती बाई मला मघाचपासून खुणावतेय
मला जायचं असूनही
मी आमच्या हिला घाबरतोय.
खोडसाळ...
खो
मी कवी नाही, मला हा गंड आहे
यमकबाजीची तरीही कंड आहे
'र' पुढे 'ट' ठेवुनी उजळून जातो
व्योम कविता; आणि मी मार्तंड आहे!
वाचल्यानंतर शिव्या घालो कुणीही
छापला नुकता दहावा खंड आहे
वृत्त अन् बाराखडी झेपे न जेव्हा
मुक्तछंदातून केले बंड आहे
व्याप्त कवितेच्या जमीनी झोपड्यांनी
पण विडंबन मोकळा भूखंड आहे
काळजी निवृत्त होण्याची कशाला ?
काफ़ियांची बँक आहे, फंड आहे
बोलले काका, विडंबन हे नसावे
ऐकुनी ते, गर्व मम शतखंड आहे
प्रौढ अन् गंभीर कविता शीक, लेका!
लांबले, खोड्या, किती पौगंड आहे...
मूळ जमीन
खेळा खो खो रे, खेळा खो खो रे
खो देउन त्या पुढे पळाल्या, तू मागे धाव रे!
कट्ट्यावरल्या चिमण्या, साळू
माझ्या राजा नकोस पाहू
पिकल्या पाना, तुझ्या, जाहली अब्रूची लक्तरे!
"पुरे खेळणे", वदली बाला
थांबव चाळा, थांबव लीला
गुमान येऊन घरी भेट तू माझ्या बापा, रे!
केस पांढरे त्यांचे झाले
नातवंड मांडीवर आले
ललनांनी ज्या कधी मारले तुज डोळे घारे!
आपल्या सर्वांच्या मायमराठीने सोडलेला सुटकेचा निश्वास सध्या मराठी जालविश्वात सर्वत्र ऐकू येत आहे. तिच्या या आनंदाला कारणही तसेच आहे. गेली काही वर्षे तिला पीळ पीळ पिळून घेतल्यावर श्री. मिलिंद फणसे यांनी आपली मेहेरनजर (पक्षी : वक्रदृष्टी) यावनी भाषेकडे, चुकलो, ज़ुबानकडे, वळवली आहे. (कोण आहे रे तो "बुरी नज़रवाले तेरा मुँह काला " म्हणणारा ?!) हे ऐकून मायमराठीस जरी हर्षवायू झाला असला तरी उर्दूअम्मी रडत रडत अश्फ़ाक़ परवेज़ कियानी व मुल्ला ओमरकडे गेल्याची खात्रीलायक बातमी ISI मधील आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
तद्दन बाजारू हिंदी चित्रपटगीते ऐकण्यापलिकडे हिंदी/हिंदुस्तानी/उर्दूशी कोणताही संबंध आलेला नसताना मिलिंदमियाँना त्या भाषेत शेर लिहिताना (की कहताना ?) बघून आम्ही जलकर खा़क न होतो तर नवल ! लाहौल विलाकुवत ! अरे, चार-दोन हिंदी सिनेमे आम्हीही पाहिले आहेतच की. तो राजकुमार का कोण म्हणतो ना, "जानी, हम किसीसे कुछ कम है क्या?! हम हम है, बाकी सब पानी-कम है!" तेव्हा मिलिंदमियाँपासून स्फूर्ती घेऊन म्हणा किंवा जलकर खा़क होऊन म्हणा, आम्हीही ठरवले - यवनांवर नाही तर नाही, निदान यावनी(भाषे)वर तरी प्रभुत्व मिळवायचेच! देखना है ज़ोर कितना बाजू-ए-खोड्यामें है...
जिस ओर देखता हूँ कितनी बिमारियाँ हैं
हैज़ा, मलेरिया या सीनें धुवाँ धुवाँ हैं
बिजली को गुल कराके पूछें अवा़मसे वह
माथेंपे क्यों पसीना, क्यों बंद बत्तियाँ हैं ?
आए करीब इतने हम प्यार के सफ़रमें
गुस्सा मुहाफ़िजोंने दी खूब गालियाँ हैं
वह रूठनाभि, यारों, मेंहंगा हमें पडेगा
दीदारेअश्रफ़ी क्या जब चार बीवियाँ हैं ?
सायें हैं ज़िंदगीपर गुजरी हुई शबोंकें
हड़तालपर है बीवी, बच्चों को छुट्टियाँ हैं
लो, शाम आ गयी है उनकी शिकायतोंकी
इल्ज़ाम रातभर अब, मैं हूँ, सफ़ाइयाँ हैं
प्रेरणा : श्री. प्रसाद कोलते यांची कविता चुंबन
प्रियेचे पहिले चुंबन
हाय मजला असे भाजुन गेले
वैशाखातही नसतील भाजले
माळरानावरील दगड आणि धोंडे
तीच्या कम नीयर ओठांची
मजल्या मजल्यावर चर्चा झाली
टुणटुणलाही पालटुन नसती दिसली
अशी रुंदी आज मी बघितली
चुंबन तीचे घेताना
त्राहिची आशा मिटली
निशस्त्र मी शाकाहारी
ती मांसाहारात शिर-शिर-शिरली
तिचे चुंबन तिचे आलिंगन
वाटले नसावे सोसणे याहून काही
जीवन याहुन असावे काय भयंकर
नासावी जीवनाला हि अशी अख्ख्या का ही
प्रेरणा : 'क्षणाचा सोबती' यांची कविता 'संधी आणि मंदी'
मंदी आणि कुंदी
यांची कधी होत नसते ’जुगलबंदी"?
दोघी एकमेकींच्या सवती
घुटमळतात दोघी नवर्याच्या अवती भवती
मंदी असल्यास कुंदी पाळत ठेवते
कुंदी दिसल्यास मंदी तिला जळवते
मंदी चुकवता येत नाही
कुंदी रुसली की जवळ येत नाही
मंदी जाता जात नाही
कुंदी येता येत नाही
मंदी जाण्याची वाट बघावी लागते
कुंदी येण्याची वाट बघावी लागते
मंदी असताना चुकून कुंदी आली तर
हे नवर्या तिला झापलेसे कर
अन्यथा मंदी तिला खाऊ की गिळू करेल
आणि नवर्याची कंबख्ती ओढवेल
एक मंदी पुरे आहे घराला डोक्यावर घ्यायला
मात्रा फक्त एकच योग्य; कुंदी आवश्यक आहे, मंदीला जळवायला...
मंदीला जळवायला...!!
आमचे प्रेरणास्रोत : भूषण कटककर यांची मस्त गझल बोलणे त्याचे मनापासून ते...
ती म्हणाली तेच झाले शेवटी
ढोसली अन् रेच झाले शेवटी
बोलणे बेंबीतळापासून ते
श्रोतृगण बहिरेच झाले शेवटी
एवढा खोटे खरेच्या कच्छपी
की तिला पोट्टेच झाले शेवटी
हालचाली आमच्या थंडावता
व्हायग्रा होतेच, झाले शेवटी
खात मी बसलो अधाशासारखा
आतड्यांचे पेच झाले शेवटी
प्रेम ज्यांचे नाव होते ठेवले
ब्रह्मचारी तेच झाले शेवटी
खोडसाळा, तू जसा देवास त्या
काव्यही प्यारेच झाले, शेवटी
प्रेरणा : 'लेखणी'
काय मी सांगू तुला, केव्हा उचलली देखणी
तू घरी कटलास, येथे मी पटवली देखणी
पाहिले गौरांगनांसम चालता तिज रँपवर
मालफंक्शनले वसन जेव्हा घसरली देखणी
पाहिले नव्हते कुणी, शृंगारली ना तोवरी
पाहण्याची रीत नडली, रोज नटली देखणी
अर्थ गुजगोष्टीत नही, अर्थ नाही मीलनी
अर्थ बँकेतील सच्चा अर्थ, वदली देखणी
कोडकौतुक खोडसाळाने तिचे केले तरी
बोहल्यावर, हाय, दुसऱ्याचाच चढली देखणी
------------------------------------------------------------------
प्रेरणा : लेखणीचा उत्तरार्ध
'पिंड गाण्याचा नसे माझा', गरजली लेखणी
का तरीही कुंथुनी कविता चिरकली लेखणी?
फार शाई, फार कागद, लेखका संयम कुठे?
का, प्रभो, त्याची न तू अडवून धरली लेखणी?
काय अन् सांगू किती, होते असे अपचन तिला
शब्द वारा बापुडे अन् वातभरली लेखणी
जी करी चमचेगिरी राजापुढे, "तू ग्रेट बॉ! '
ती पुरी क्षेत्री रिघे, निष्ठा विसरली लेखणी
लादले निर्बंध ज्यांनी 'डायर्'ईया होउनी
हीच निर्बंधाविरोधी काल लढली लेखणी?
रावणासम दशजिह्वा, आयडी हजारो निर्मिले
पाग पाहून खेचरांची हसत सुटली लेखणी
वाचता काही कुणाचे, थांबली नाही कधी
खोडसाळा, काव्यरक्ताला चटवली लेखणी
आमची प्रेरणा : भूषण कटककर यांची बोल्ड ऍंड ब्यूटिफुल गझल 'गंधाच्या उलाढाली'
जरा चुंबावया जाता तिला, मळमळ मला आली
तिच्या तोंडातल्या हुंगून गंधाच्या उलाढाली
तुला जे पाहिजे होते तसे केलेस तू सारे
तुला पुष्कळ मजा आली परी मजला इजा झाली
उभी आहेस तू माहीत आहे पण कुणासाठी ?
कुणी शिट्ट्य़ा तुला मारून जातो खालच्याखाली
रचावे काव्य कोणीही, कुणी मोरीत रेकावे
कुणा थोडे मिळाले मद्य की तो लावतो चाली
रडावे वाचकाने, काव्य वाचुनिया किती वेळा
चला झटकून टाकूयात या अंगावरुन पाली
जरा कोठे निघालो मी, कसा पायास तो ओढी
मराठी माणसाच्या नेहमी का खेकड्या चाली?
पुरेसे काफ़िये केव्हाच माझे जाहले गोळा
नको रे, खोडसाळा, काळजी, कविता, चला झाली!
प्रेरणास्रोत : भूषण कटककर यांची कविता "श्वासात ताल आहे"
बिनधास्त वाजवावी मजला कुणीही येथे
माझा सदाचसाठी उपलब्ध गाल आहे
भक्ती स्वतः:च करतो, मूर्ती स्वतः:च असतो
वरती स्वतः:स नमतो, माझी कमाल आहे
जितका जमेल तितका उपभोग घेत जावा
सध्यातरी दिरांचा मधुचंद्र-काल आहे
मदिरा खराब आहे, आंबूस वास येतो
व्हिस्की न ही, गड्यांनो, देशीच माल आहे
जाते कुठे नि येते, हंसा कुणास ठाउक
भलतीच संशयास्पद हंसाचि चाल आहे
कापू किती किती मी या गीतकार माना
करणार काय सांगा? बकवास माल आहे
रंगित रुमाल पाही नि त्यास खूळ लागे
नजरेत फक्त एका, बकरा हलाल आहे
आजार हा कवींना, जुळवत हजार यमके
वाचू तरी किती मी ? बस हाल हाल आहे
बावीस, हाय, ओळी, चालू असे परीक्षा
केव्हाच लागलेला माझा निकाल आहे
या वाचनात आला ओठांस फेस माझ्या
जडला विकार उदरी, गोटा जमाल आहे
झाले कथून तरिही सोडून जात नाही
ही खोडसाळकीची कसली कमाल आहे !
प्रेरणा : मिलिंद फणसे यांची गझल "विश्राम"
मान्य, गर्दी फार येथे पण तरी विश्राम आहे
रोजच्या वाटेवरीचा बार हा निजधाम आहे
छेडणे तिज सोडले पाहून अनुजाला तिच्या मी
रेशमाचा भाउ हल्ली वाढला बेफाम आहे
खूपसे हितशत्रू आणिक वानवा नाही रिपुंची
तेव्हढ्यासाठीच माझा चालला व्यायाम आहे
अत्तरे लेऊन अंगी भेटलो होतो तिला मी
चारुगात्रीला, परंतू, वाटले तो घाम आहे
चार खांदे शोधण्यासाठी निघाले प्रेत माझे
बोलले, "शववाहिनीचा फार सध्या दाम आहे"
'मूर्ति'पूजेचा गुन्हा चुकला कुणा; सारेच 'तसले'
पूजती कांता कुणी, इतरत्र कोणा राम आहे
येउनी टाकून गेला शब्दपाचोळा कवी तो
झाड कवितांगण, तुझे ते, खोडसाळा, काम आहे
