Monday, January 02, 2017

वैधानिक इशारा


उजवीकडे 'सुभाषित सरिते'त दिसणारी इंग्रजी वाक्यं मी, म्हणजे खोडसाळाने, लिहिलेली नसून मला आवडलेली प्रसिद्ध quotations आहेत. एका वाचिकेचा गैरसमज झाल्यामुळे हे स्पष्टीकरण देत आहे.



Friday, January 01, 2016

प्रस्तावना

मनोगत ह्या मराठी भाषेला वाहिलेल्या (बहुधा) सर्वोत्कृष्ट संकेतस्थळावर अनेक प्रतिभावान हौशी कवी आपल्या रचना सादर करतात. त्या वाचून आपल्याला असे काही लिहिता येत नाही याचा मला खूप राग यायचा. सांगू नका कोणाला, पण माझी अवस्था ते काय असूयाग्रस्त की मत्सरग्रस्त म्हणतात ना तशी व्हायची. मग ठरवलं - नाही ना आपल्याला असे काही छान छान, नवनवीन कल्पनांनी नटलेले, साहित्यिक मूल्यांनी ओतप्रोत, इ. इ. लिहायला जमत, मग ठीक आहे. जे लिहितात त्यांची विडंबनात्मक टर उडवायची. कोल्ह्याला द्राक्षं आंबट, दुसरं काय. परत विडंबन करणे तुलनेने बरेच सोपे, खासकरून छंदबद्ध कविता वा गज़लांचे. तयार जमीन, तयार यमकें, रेडीमेड कवाफ़ी. आपण फक्त ओळी जराशा उलटसुलट केल्या की झाले विडंबन तयार. वाचणाऱ्यांनाही गंभीर रचनांचे अर्थ लावत बसण्यापेक्षा 'हसा आणि विसरून जा' छाप विडंबने वाचणे सोयीस्कर वाटते. त्यामुळे आमच्यासारख्यांची चलती असते. कोणी नाक मुरडलेच तर कानाच्या पाळ्या धरून आचार्य अत्र्यांच्या ' झेंडूची फुले' चा वारसा सांगावा. वर अत्यंत आदराने (नाटकं करायला आपलं काय जातय) ' क्व सूर्यप्रभवो वंश: क्व चाल्प विषयामति: ' वगैरे वाक्यं टाकावी. एकाच वेळी आपला विनम्रपणा आणि सु'संस्कृत'पणा दाखवण्याची संधी का सोडा? (संस्कृतातील ओ की ठो काही येत नसले तरी गाठीशी अशी दोन-चार वाक्य पाठ करून ठेवली आहेत मी. भाव मारण्याच्या कामी येतात.) अशी काही विडंबने इथे देण्याचा मानस आहे. खरे तर 'टाकणार आहे' लिहिणार होतो पण 'देण्याचा मानस आहे' कसे भारदस्त वाटते, नाही? मूळ रचनांचा दुवाही देईन. विडंबन आवडो न आवडो, वाचकहो, त्या मूळ रचना जरूर वाचा ही मात्र खोडसाळाची कळकळीची विनंती आहे. त्या प्रतिभावंतांची थट्टा करण्याच्या माझ्या पापाचे यामुळे थोडे तरी परिमार्जन होईल.


ता.क. ह्या नोंदीची तारीख बघून चक्रावून जाऊ नका. ही प्रस्तावनास्वरूपी नोंद ब्लॉगच्या सुरुवातीसच रहावी म्हणून भविष्यकालीन तारीख घातली आहे.

Tuesday, January 05, 2010

मुलाखतीतुन तुझ्या प्रकटती...

एका नटीची पत्रकाराकडे तक्रार. स्फूर्तिस्थान - सुरावटीवर तुझ्या उमटती


मुलाखतीतुन तुझ्या प्रकटती, अचुक कुणाला केव्हा पटले
नकोस छापू अशा बातम्या, तुझ्यामुळे, रे, जगा समजले
तुझ्यामुळे, रे, जगा समजले

कैक रात्री मी धुंद जागले, आई-बाबा होते निजले
जागरणाचे ठिकाण, कारण, तुझ्यामुळे, रे, जगा समजले

तीन दिवस मी ’लेट’ जाहले, कितिदा तरि मी मोजुन थकले
’उशिरा’मागिल भाव अनामिक, तुझ्यामुळे, रे, जगा समजले

तुला कळाली येणी-जाणी, ’गूज’ खोलवर केव्हा रुजले
’ब्रेकिंग’ केली ’न्युज’ तयाची, तुझ्यामुळे, रे, जगा समजले

चित्रपटांचे क्षेत्र मनोहर, नवरी हो‌उन कितिदा सजले
मधुचंद्राच्या विवाह नंतर, तुझ्यामुळे, रे, जगा समजले

तुझ्या बातमीमुळेच माझे, नटी म्हणोनी भाव उतरले
तुझ्यामुळे, रे, जगा समजले


Sunday, January 03, 2010

कविता न कराव्या...

कविवर्य कुसुमाग्रजांची क्षमा मागून, "समिधाच सख्या या"  या त्यांच्या अप्रतिम कवितेवरून सुचलेल्या ओळी देण्याचे धार्ष्ट्य करीत आहे.

भ्रांतिष्ट कुणीसा कवी करी ही कविता
भेटते जिच्यातुनि त्याची जीवन-वनिता

तडतडे, बडबडे, मुके न दे, फेटाळे
कवी अखंड पाहे वाट प्रेरणेकरिता !

लडिवाळ कान्त तो ही सोडून निघाली
अन्‌ शोधित प्रियकर रानातून ढमाली
नच रम्य बांधणी, सुडौल अथवा घाट
तोंडावर तुरळक लव अंकुरुनी आली !

नव-कवितेच्या या फसव्या शब्दांखाली
ही कॉंग्रेस गवतापरि बहरली, व्याली
वाचे न कुणी, छापे न कुणी संपादक,
"या जळोत कविता -- यांस कुणी ना वाली !"

कविता न कराव्या; हट्ट अता सोडावा,
कोठून कथेपरि पैसा त्यात मिळावा ?
जात्याच भिकारी, एकच मज आकांक्षा,
ना मिळोत पैसे, क्षणभर व्हावी "वा, वा !"

Tuesday, December 29, 2009

(प्रयोग)

प्रेरणास्रोत : प्रयोग

चेहर्‍यावरील खुणा लपवण्यासाठी,
कधी-कधी प्रयोग करावे लागतात स्वत:वर

उगाच कोणी असं
इलेक्ट्रॉलिसिस करून घेत नाही आपल्याच ओठावर.

(मोकळे असू द्या)

आमची प्रेरणा : मोकळे असू द्या


नकोत ओझी काव्याची, मोकळे असू द्या

कधी तरी रसिकांनाही मोकळे असू द्या

उगाच लाठ्या ओळींच्या घालता कशाला ?
कशास त्या अमुच्या माथी, मोकळे असू द्या

असोत, जर काव्याचे शेवाळले सरोवर
अम्हास गद्याचे पाणी मोकळे असू द्या

दिसून यावा बुरख्यातिल चेहरा प्रियेचा
असे वसन आरस्पानी, मोकळे असू द्या

असो मुखी यवनी अथवा खोडसाळ गोरी
हृदय मराठीच्यासाठी मोकळे असू द्या

Tuesday, December 15, 2009

(गमक)

प्रेरणास्रोत : मिल्या यांची गझल "गमक"


कसे जगावे सुखात ह्याचे मला कळाले अता गमक
इथे तिथे शोधणे कशाला? हवी कुणी ठेंगणी सुबक

खरोखरी छंदमुक्त लिहिणे सदैव जर का तुला हवे
मना सुचे ते लिही अगोचर, कशास जुळवायचे यमक?

लगेच ढुसतील कोपरांनी वयात येताच तू जरा
टिकायचे तर निदान सँडल तरी असावी तुझी टणक

उगाच नामोनिशाण जैसे कशास अल्फ़ाज़ घ्यायचे?
कशास सोडायचे मराठीवरी असा रीतिने उदक?

पडेल हे उन्मळून माझे क्षणात बेजार टाळके
तुझ्या बडबडीमुळे अशी डोचक्यात जाईल ही सणक

उगाच व्रतभंग व्हायचा जर दिलीस उत्स्फूर्त चुंबने
कशास तव चेहर्‍यास इतके दिसायला पाहिजे कडक?

खलास केलेस तू कवींना... दिला न सोडून एकही
सुचायला ही विडंबने, लेखणीत, खोड्या, हवी चमक

Wednesday, December 02, 2009

तांदळाची ह्या घरा चाहूल जेव्हा लागली

प्रेरणा : मानस६ ह्यांची सुंदर गझल "वादळाची ह्या जगा चाहूल जेंव्हा लागली"

तांदळाची ह्या घरा चाहूल जेव्हा लागली
भात सार्‍या रांधती, मी खीर, चकली रांधली!

शेवटी आलास सगळ्यांच्या वसंता, Hi, पण;
आज माझी डायरी आहे फुल्यांनी झाकली!

जावयाच्या चाचणीला पास झाली शेवटी
चप्पला झिजल्या खर्‍या, पण घोडनवरी चालली!

चालतो मी पावसातुन एवढ्यासाठीच की,
ना कुणालाही दिसावी पँट ही ओलावली!

वर्ग ह्याचा कोणता, काढा बरे घनही जरा;
कॅल्क्युलेटरची कशाला गरज भासू लागली?

स्वाद तोंडाला हवा लावण्यगीताचा, सखे!
भावगीती गुळमटाची सवय मागे सांडली

दूरदेशी वाहते माझी प्रिया माझ्यापुनी
गावली मज नाय, हिरव्या कार्डवाल्या गावली!

अंग उघडे.. कापडाने व्यापले होते कमी!
विघ्नसंतोषी कुणी पण शाल त्यावर टाकली!
-खोडसाळ

Older Posts

Blogger Template by Blogcrowds