(प्रयोग)

प्रेरणास्रोत : प्रयोग

चेहर्‍यावरील खुणा लपवण्यासाठी,
कधी-कधी प्रयोग करावे लागतात स्वत:वर

उगाच कोणी असं
इलेक्ट्रॉलिसिस करून घेत नाही आपल्याच ओठावर.

आमची प्रेरणा : मोकळे असू द्या


नकोत ओझी काव्याची, मोकळे असू द्या

कधी तरी रसिकांनाही मोकळे असू द्या

उगाच लाठ्या ओळींच्या घालता कशाला ?
कशास त्या अमुच्या माथी, मोकळे असू द्या

असोत, जर काव्याचे शेवाळले सरोवर
अम्हास गद्याचे पाणी मोकळे असू द्या

दिसून यावा बुरख्यातिल चेहरा प्रियेचा
असे वसन आरस्पानी, मोकळे असू द्या

असो मुखी यवनी अथवा खोडसाळ गोरी
हृदय मराठीच्यासाठी मोकळे असू द्या

(गमक)

प्रेरणास्रोत : मिल्या यांची गझल "गमक"


कसे जगावे सुखात ह्याचे मला कळाले अता गमक
इथे तिथे शोधणे कशाला? हवी कुणी ठेंगणी सुबक

खरोखरी छंदमुक्त लिहिणे सदैव जर का तुला हवे
मना सुचे ते लिही अगोचर, कशास जुळवायचे यमक?

लगेच ढुसतील कोपरांनी वयात येताच तू जरा
टिकायचे तर निदान सँडल तरी असावी तुझी टणक

उगाच नामोनिशाण जैसे कशास अल्फ़ाज़ घ्यायचे?
कशास सोडायचे मराठीवरी असा रीतिने उदक?

पडेल हे उन्मळून माझे क्षणात बेजार टाळके
तुझ्या बडबडीमुळे अशी डोचक्यात जाईल ही सणक

उगाच व्रतभंग व्हायचा जर दिलीस उत्स्फूर्त चुंबने
कशास तव चेहर्‍यास इतके दिसायला पाहिजे कडक?

खलास केलेस तू कवींना... दिला न सोडून एकही
सुचायला ही विडंबने, लेखणीत, खोड्या, हवी चमक

प्रेरणा : मानस६ ह्यांची सुंदर गझल "वादळाची ह्या जगा चाहूल जेंव्हा लागली"

तांदळाची ह्या घरा चाहूल जेव्हा लागली
भात सार्‍या रांधती, मी खीर, चकली रांधली!

शेवटी आलास सगळ्यांच्या वसंता, Hi, पण;
आज माझी डायरी आहे फुल्यांनी झाकली!

जावयाच्या चाचणीला पास झाली शेवटी
चप्पला झिजल्या खर्‍या, पण घोडनवरी चालली!

चालतो मी पावसातुन एवढ्यासाठीच की,
ना कुणालाही दिसावी पँट ही ओलावली!

वर्ग ह्याचा कोणता, काढा बरे घनही जरा;
कॅल्क्युलेटरची कशाला गरज भासू लागली?

स्वाद तोंडाला हवा लावण्यगीताचा, सखे!
भावगीती गुळमटाची सवय मागे सांडली

दूरदेशी वाहते माझी प्रिया माझ्यापुनी
गावली मज नाय, हिरव्या कार्डवाल्या गावली!

अंग उघडे.. कापडाने व्यापले होते कमी!
विघ्नसंतोषी कुणी पण शाल त्यावर टाकली!
-खोडसाळ

आमचे प्रेरणास्रोत : माळ्याच्या मळ्यामंदी

दादाच्या मनामंदी पोरींची नावं किती
गुलाब, जाई, जुई, मोगरा, फुलवंती

दादाच्या मनामंदी फिरून लोटं ज्वानी
मोकळं रान सारं, माहेरी वयनी
हसत खुडतो फुलांची मोप शेती

छाकटा बंधुराया, वयनी काकुबाई
गोजिर्‍या शिल्पा, हंसा; दादाची मज्जा हाय
वाटेनं मैतरणींच्या दादाची गाडी जाती

गडनी, सजनी, गडनी सजनी गडनी ग

ढापतो भाऊराया वयनीचं सारं सोनं
सवत पाडी फशी, घेतोया बँक-लोनं
बयेला हार-तोडे, पैठणी साड्या येती

(मदार)

प्रेरणा : पुलस्ति यांची गझल मदार

"काय, गेली तक्रार वाड्यावर ?"
"छेड काढा अजून आडावर..."

भरड साडी, तरी खुलून दिसे
नेसणारी वयात आल्यावर

पाखरांचा बघा रुबाब जरा
भाव त्या मारतात कट्ट्यावर !

टाळतो कालिजात जाणे मी...
(ताण येतो उगाच डोस्क्यावर)

हात स्मश्रूत गुंतलेले जे
या मिशीची मदार त्यंच्यावर

(सर्वत्र "साभार परत")

जयन्ता५२ यांची सुंदर गझल "ना चांदण्यास जमले" वाचून म्हटलं बघू या आपल्यालाही काही 'जमतंय' का ते. पण कसलं काय? तेथे "पाहिजे जातीचे" ! कुठे जयन्तरावांसारखे जातिवंत कवी आणि कुठे खोड्या. आम्ही अजूनही 'खोड्या, शीक रे अ, आ, इ... ' च्या पातळीवर. 'जमले जसे जयन्ता, खोड्या, तुला न जमणे'
पण जित्याची खोड काही मेल्याशिवाय जाणार नसल्याने औद्धत्य करीत आहे. (जयन्तराव, तुम्ही आमची 'मजबूरी' समजून घ्याल अशी आशा करतो.)


ना गोवरास जमले ना कांजण्यास जमले
ती कंड शायरीची ना शमविण्यास जमले

'पिच' शोधला तुझा तो नवखा कुणी खिलाडी
शेजारच्या ’विकेट’वर ना खेळण्यास जमले?

डिवचत अनेक होत्या माशा मला, परंतु
नादात प्रीतिच्या त्या ना वारण्यास जमले

बस, पाहिले तुला अन् बेशुद्ध जाहला तो
परतून मम वसंता ना बहरण्यास जमले

दिन रात शहरभर मी फिरतो तुझ्याच मागे
कोणी हमाल दुसरा ना ठरवण्यास जमले

मी पाहिले तुला ती नक्कीच सर्वपित्री
होऊन भूतबाधा ना झोपण्यास जमले

----------------------------------------------------------

(खोडसाळ)

आमचे प्रेरणास्थान : जयन्ता५२ यांची गझल सुखास आता तुझे नाव आहे

घरात आला नवा भाव आहे
'सुहास' त्याला दिले नाव आहे

'दिला'स तू जर न चोरून नेले
तुझी सहेली 'सही !', 'वाव !' आहे

उगाच पत्ते पिसू मी कशाला
तुझा रडीचाच जर डाव आहे ?

'लिना' घरी हाय नवरा 'रिना'चा
तिच्या पतीला कुठे ठाव आहे ?

कट्यार कसली तुझी बोडक्याची
कशीबशी कापते पाव आहे

'दिला'त क्लृप्त्या किती खोडसाळा
मुखी परी बावळा आव आहे !

---------------------------------------------------
(खोडसाळ)

आमची प्रेरणा : बघत राहु दे तुझ्याकडे

फुकट राहु दे तुझ्याकडे
भाव घरांचे फार चढे                    ||धृ||

लाख न उरले, बनले कोटी
किमती पाहुन भरली भीती
मागुनी बघु कुणाकडे ?                 ||१||

कर्ज मिळे बँकांतुन सत्वर
फेडत बसता लागे घरघर
चक्रव्याजाचे उंच कडे                  ||२||

सत्य भेटले भाडोत्र्याला
पंख लागले घरभाड्याला
खोडसाळ अनिकेत रडे                ||३||तुकोबांची व ज्ञानेश्वर माउलींची मन:पूर्वक क्षमा मागून ...

१)
आपुल्या माहेरा | जाऊ मी कशाला | खेचीन तुम्हाला | कोडतात ||

सुखदु:ख माझें | ऐकियलें नाहीं | कळवळा नाहीं | नवर्‍याला ||

सासुला यें शूळ | सुनेला पाहोनी | खुलें ती देखोनी | जावयासी ||

यांचें सवतीसि | लागलेसें चित्त | धाडी मज नित्य | माहेराला ||

फुक्या म्हणे त्यांना | येतील न्यावया | संगें आपुलिया | फौजदार ||

मूळ अभंग : तुकारामांची गाथा अभंग क्रमांक १५८७ इथे वाचा.

२)
देवींचिये द्वारी उभा जन्मभरी | तेणें युक्ति नारी साधियेल्या ||

चंद्रमुखी म्हणा सूर्यमुखी म्हणा | स्तुतीची गणना तोषकरी ||

असोनि संसारीं नेत्रे वेगु करी | देखतो उभारी बाह्या सदां ||

फुक्यादेव म्हणे गेलेत पाहुणे | शेजारचे राणे माडीवरीं ||

मूळ अभंग : श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ अभंग क्रमांक १ इथे वाचा.

३)
गोड चुंबनें तें बळें | घेंऊनी नामानिराळें ||

तैसा तूंहि आम्हाठायीं | खेळतोसी अंतर्बाहीं ||

भक्ष समजुनी चोरा | इथे वळवी मोहरा ||

फुक्या म्हणे अधीलपणे | अंग चर्चिलें चंदनें ||

मूळ अभंग : तुकारामांची गाथा अभंग क्रमांक ७६९ इथे वाचा.

४)
वाईटांचें भलें | दीन जाहलें चांगलें

आर्या, दिंडी, केका | त्यांचें मोल नाहीं, लेका

जळ्ळी सत्यज्योति | देतें करवंटी हाती

उंच निंच गोरा | परी गरीब नवरा

फुक्या म्हणे भले | ऐशा पत्नीने छळले

मूळ अभंग : तुकारामांची गाथा अभंग क्रमांक १७१६ इथे वाचा.

आमचे प्रेरणास्थान : एका तळ्यात होती बदके पिले सुरेख.
आमच्या प्रेरणास्थानाचे प्रेरणास्थान : The Ugly Duckling

एका घरात होत्या बाया कजाग दोन
होता पुरूष तिथला धारून फक्त मौन

कारण लहानसेही भांडावयास चाले
आई व बायकोचा नेहमीच वाद चाले
दोघी तयास टोची, दिसतो हताश, दीन
होता पुरूष तिथला धारून फक्त मौन

पुरुषास दु:ख भारी, भोळा रडे स्वत:शी
पोरेहि ना विचारी, सांगेल तो कुणाशी
कर्तेपदास त्याच्या देती मुळी न मान
होता पुरूष तिथला धारून फक्त मौन

एके दिनी परंतु पुरुषास त्या कळाले
संकोच, लाज सारे वार्‍यासवे पळाले
चाले घराघरातुन डिट्टो असाच सीन
त्याचेच त्या कळाले सारे पती समान...

प्रेरणा : "उरी भावनांचा महापूर आहे"

उरी यौवनाचा महापूर आहे
परी आड येतो, पदर क्रूर आहे

तिचे नाक फेंदारणे चालते पण
तिच्या नासिकेला सदा पूर आहे

तिची गाठ घेऊन घालीन डोळा
मिठीचा विषय अद्यपि दूर आहे

तिचे दात पाहून फिटलेत डोळे
परी दंतमंजन मुखातूर आहे

दिवे लावण्याला पुढे नेहमी तू
नयन‍अश्व उधळून चौखूर आहे

मना, लाभले काय लुब्रेपणाने ?
जवळ तो तिच्या, मी उभा दूर आहे

मना, लाभले काय खोड्या करोनी ?
चुडेवज्रमंडन न मंजूर आहे

कुणीतरी अम्हा पटापट कविता वाचून सांगेल काय

या ओळींमध्ये दडलय काय ?
या रचण्यावाचुन अडलय काय ? ॥धृ॥


काव्य म्हणतो जिला कवी
पाडत असतो रोज नवी
कशास अमुच्या माथ्यावरती मारायाला हवी ?
कराल केव्हा, कविवर, तुमच्या काव्याची भैरवी ? ॥१॥


सुनीत कोणी करी इथे
गझलांचे खच जिथे-तिथे
नवकाव्याचे, गांभिर्याचेही दिसती चाहते
विडंबनाची सरिता कायम दुथडीने वाहते ॥२॥


मात्रावृत्ती असे कुणी
अक्षरगण-कट्टर कोणी
कविता कसली, लघु-गुरूची क्रमवारी-मोजणी
बेरीज चुकता म्हणे कवी ही मुक्तछंद-बांधणी ॥३॥

षट्वेणी

प्रेरणा : त्रिवेणी


१.

एखादा पाहुणा दारात उभा राहिल्याशिवाय

कळून येत नाही

आपल्या खिशाची तंगी


२.

सापडता सापडत नाही

या नाडीचे दुसरे टोक

या लेंग्याला बटणं लाव...

३.

मंदिराकडून नकारघंटानाद

तिच्या ’दी’कडून रुकार

हे मात्र औरच


४.

रात्रीच्या या तिसर्‍या प्रहरात

कुणावर भुंकताहेत

!@#*&%#* कुत्र्यांची टोळकी...५.

मनसोक्त दारू पिली

फुल्ल कोंबडी हादडली

निजलो आहे मस्त तृप्तीचे ढेकर देउनी.


६.

ती बाई मला मघाचपासून खुणावतेय

मला जायचं असूनही

मी आमच्या हिला घाबरतोय.


खोडसाळ...

खो

प्रेरणा : कधीतरी तू थांबशील...!


रोज मला येतात नव्या मित्रांच्या हाका !
तरुण कुणी अन्‌ कुणी वयाने मामा-काका !

बरे नव्हे हे लोकप्रिया होणे इतकेही...
घरास माझ्या म्हणू लागले वासूनाका

भेटतात मज डौल घेउनी कलहंसाचा...
कुणी घेइना परंतु सोबत आणाभाका !

पळून कोठे चाललात माझ्या मित्रांनो ?
तुम्हामुळे तर नवमासाने प्रसंग बाका !

कुणीतरी भेटेल तुम्हाला मित्र, सख्यांनो
कुणीतरी घालेल तुम्हावरतीही डाका !

कुणीतरी भेटेल मलाही उपवासाचे
आठवते मी...कधीपासुनी पडला फाका !

मूल हो‍उनी या देहाची चूक किरकिरे...
अतातरी या डोक्यावरती अक्षत टाका !

वीण उसवली या एकाकी आयुष्याची...
वीण वाढण्यासाठी येउन भिडवा टाका !

रोज ढगळ कपड्यात झाकते पोट बिचारी...
"लग्न करा ना लवकर, माझी अब्रू झाका !"

खोडसाळ हे संपतील काव्याचे फेरे...
साहित्याच्या अलीकडे माझा आवाका !

प्रेरणेचे उगमस्थान : 'मिठीत तोच गोडवा'


"बराच काळ नांदले तुझ्यासवे, चला अता"
जुनी धनीण मागते नवीन बापया अता

कधी कधी न पाहणेच छान वाटते तुला
मधेमधे दुज्याकडे हवे बघायला अता

तुझे नवीन रूपही बुळेच वाटले मला
तुला उगीच वाटले, "बरा दिसेन ना अता? "

म्हणायचास, ’रूप संपले तुझे, खलास तू’
कशास खेटलास? हा कशास चोचला अता?

पुन्हा न थाप मारुनी कधी जवळ सरायचे
तुला हवेच 'ते', खरा प्रकार जाणला अता

मिठीत तोच गारवा, दिवस असो, असो निशा
उरात एकदातरी मशाल चेतवा अता

मिठीत तोच दादला, कधी इथे, कधी तिथे
नवीन रंगरूट-शोध व्हायला हवा अता

नसेल खोडसाळ वा असेल, सारखेच ते
करून काव्य जाहले, विडंबने करा अता

प्रेरणा : वैभव जोशी यांची गझल ह्या कशा उबदार ओळी


ह्या कशा चवचाल ओळी, शब्द हे ’तसले’ पुन्हा
हाय!बच्चा कंपनीवर बाप खेकसले पुन्हा

ह्या कशा रचल्यास ओळी, शेर हे फसले पुन्हा
हाय!कच्च्या शाहिरा उस्ताद खेकसले पुन्हा

"सासरा, दारू, मुली, लफड्याविना कविता कशी?"
वाचणारे चेहरे झटक्यात खसखसले पुन्हा

हुडहुडी भरली तनाला, गालफडही तापले
काय बोटांचे ठसे गालावरी ठसले पुन्हा

अजुन त्यांची ठेवली नाहीच का पत्रावळी ?
कावळे झाडावरी जाऊनही बसले पुन्हा!

मज न चुंबन प्रेयसीने, अन्‌ न पत्नीने दिले
"संपला मधुचंद्र, आता चोचले कसले पुन्हा?"

मी नझल लिहिली तरीही वाजल्या टाळ्या किती
नाव माझे पाहुनी का लोकही फसले पुन्हा ?

"मायला!असला चुना का लावला कोणी कधी?"

खोडसाळा साफ हे बोलू नको असले पुन्हा

गंड

मी कवी नाही, मला हा गंड आहे
यमकबाजीची तरीही कंड आहे

'र' पुढे 'ट' ठेवुनी उजळून जातो
व्योम कविता; आणि मी मार्तंड आहे!

वाचल्यानंतर शिव्या घालो कुणीही
छापला नुकता दहावा खंड आहे

वृत्त अन् बाराखडी झेपे न जेव्हा
मुक्तछंदातून केले बंड आहे

व्याप्त कवितेच्या जमीनी झोपड्यांनी
पण विडंबन मोकळा भूखंड आहे

काळजी निवृत्त होण्याची कशाला ?
काफ़ियांची बँक आहे, फंड आहे

बोलले काका, विडंबन हे नसावे
ऐकुनी ते, गर्व मम शतखंड आहे

प्रौढ अन् गंभीर कविता शीक, लेका!
लांबले, खोड्या, किती पौगंड आहे...

(साहसे!)

स्फूर्तिस्थान : प्रदीप कुलकर्णी यांची गझल ’साहसे!


.................................
साहसे!
.................................

विडंबन जाहले नाही कसे काही?
कुणीही वाचले नाही जसे काही!

प्रयासाने किती ही लाभली कविता...
सुचू लागेल आता द्वाडसे काही!

गडे, या काफ़ियांना चालवा आधी...
असू द्या ओढले, बेजारसे काही!

उन्हाळा सोसण्याला पाहिजे संत्री...
दिसे देशी समोरी 'बार'से काही!

सखा घेईल कोणी माग डोळ्यांनी...
सखे, तू नेस लुगडे छानसे काही!

तशी वायाच गेली भेट दोघांची...
'तसे' करता न काले फारसे काही!

कुणाच्या बायका सोडूनही गेल्या...
इथे का होत नाही रे तसे काही?

बघू या पाडता येतात का कविता...
मला दे शब्द तू बंबाळसे काही!

नको रे कोपर्‍याच्या सीट तू शोधू...
घरी दिसतील आईला ठसे काही!


- खोडसाळ

.................................
पुनर्रचनाकाल ः २ जुलै २००९
.................................

एक ढेरी...!

प्रेरणेचा उगम - प्रदीप कुलकर्णींची अप्रतिम गझल "एक नाते...!"


...............................................
एक ढेरी...!
...............................................

झाकताही येत नाही; टाळताही येत नाही
एक ढेरी; जी मला सांभाळताही येत नाही

पोट नसणारेच शेलाटे सभोती लोक सारे...
पोट मज त्यांच्यापुढे कुरवाळताही येत नाही!

घट्ट झाले पॅन्टचे ते बंद आता एवढे की -
पान ’इनो’च्या पुडीचे टाळताही येत नाही!

वाटते यावे तिने; पण, हाय, ऐसी वेळ आली...
वाढत्या पोटासवे चेकाळताही येत नाही!

एकदा अगदीच वैतागून तो तुंदिल म्हणाला...
’दु:ख माझे हे, तिला कवटाळताही येत नाही!’

गैरसोयीचीच ना ही एवढी वाढीव कंबर ?
नीट माझी पाउले न्याहाळताही येत नाही!

मज कळेना कोणती आहे कमी लिहिण्यात माझ्या...
पुनपुन: वाचू नका; पण चाळताही येत नाही?

एकदा का डुचमळाया लागला की लागला हा...
ढेर पोटाचा मला गुंडाळताही येत नाही!

पोटमापाची कशाला चौकशी आता फुकाची...
वाढलो आहे किती; पडताळताही येत नाही

वजन मज माझे घटवता पाहिजे तेव्हा न येई...
हाय, हे उष्मांक मजला जाळताही येत नाही!

स्वप्न तू बारीक होण्याचे पहा; बंदी न त्याला
तूर्त या मेदामुळे बोकाळताही येत नाही!

भावनांची धार संतत लाभते कविच्या कृपेने
काय हे ’खोड्या’, तुला शेवाळताही येत नाही ?!

- खोडसाळ

..............................................
रचनाकाल - २६-२७ जून २००९
..............................................

प्रेरणास्रोत : पिंपळावरील भुतं


गालावर पिंपल हुळहुळतो, डंख मिशीचा होत असावा
अथवा कोणा बेतालाच्या उच्छ्वासाचा झोत असावा

कॉलेजमधला कुंवार जत्था कट्ट्य़ावरती वसतो म्हणुनी
पंचक्रोशितिल ’सभ्य’ मुलांचा जमलेला गणगोत असावा

दारावरल्या विक्रेतींशी हल्ली गट्टी करतो आहे
घरच्या संशयकल्लोळाचा तोच नेमका स्रोत असावा

कविवर्यांच्या पानोपानी त्याच कहाण्या, अन् रडगाणी
बेताच्या प्रतिभेचा सार डोलारा डिट्टोत असावा

केवळ वीरासन केल्याने वीरपुरुष का ठरतो कोणी ?
नसे कृष्ण हा, केवळ पेंद्या; कारकून वा खोत असावा

शब्द भरजरी , रेशिम कवने, ’खोडसाळ’ ती शीक शाहिरी
ओरखडे, वक्रोक्ती, चिमटे हाच तुझा का ओत असावा ?

आमच्या प्रेरणेचे उगमस्थान : भूषण कटककरांची गझल "विरहानंतर"


डेस्सर्ट असते, हे जेवण संपवल्यानंतर
खातो आहे, तुम्ही तुमचे ठरवा नंतर

"कसे बनवले आहे?" म्हणते पुढे येउनी
बोलवेचना मला तोबरे भरल्यानंतर

हवेत जाताना प्रश्नाचे उत्तर कळले
काय भरावे पेल्यामध्ये सोड्यानंतर...

किती जिलेब्या उदरी होत्या उगीच साठुन
किती मोकळे वाटत आहे रेच्यानंतर

तुझ्या विचारांमध्येच
व्यत्यय तुझ्याच भगिनी
असेच होते लग्न एकिशी झाल्यानंतर

उपास नसता खाउन घ्यावे गुलाबजामुन
रसगुल्ले थोडे मटकावे त्यांच्यानंतर?

काय घालता भीती खाताना वजनाची?
बोला डायटवाल्यांनो...पण खाल्ल्यानंतर

त्याच्याइतके वाइट नाही अपचन ’खोड्या’
जे होते पोटामध्ये...कलकलल्यानंतर

(...समाधी!)

प्रदीप कुलकर्णी यांची गझल ..समाधी! हिस वंदन करून आम्हीही समाधिस्त झालो. (ही बातमी ऐकून जालावरील आमच्या काही कविमित्रांना हर्षवायू झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे. असो.)...................................
(...समाधी!)
...................................

खाऊन मुगाचा भात...निघालो आहे!
पाडून दुधाचे दात...निघालो आहे!

सामान, वळकटी आणि भरीला जाया...
घेऊन मुले मी सात निघालो आहे!

असतात दिवाणे कोण तुझ्या गे मागे?
मी खार तयांवर खात निघालो आहे!

रंगात उना, सानी मिसरा रंगवितो...
मी चित्रकला-निष्णात निघालो आहे!

माझे न कधी भिडणार सुराला गाणे...
मी वर्ज्य स्वरांनी गात निघालो आहे!

भांडेन जिथे जाईन तिथे मी; नंतर -
-होईल पुन्हा रुजवात...निघालो आहे!

घेईन समाधी, खूप विडंबन केले...
सोलून कवींची कात निघालो आहे!

- खोडसाळ
................................
रचनाकाल ः २९ मे २००९
.................................

प्रेरणा : पाहून वादळाला झाला पसार नाही

लावून वाद झाला मागे पसार नाही
अन् कोणत्या शिव्या तो देण्या तयार नाही ?

गेलो अनेक पोरी घेऊन थेटराला
काळोख किर्र होण्या काही तयार नाही

मी रोज तिज पाहावे दीपावलीप्रमाणे
आहे फटाकडी ती, ती वायबार नाही

उंची नसे हृतिकची, सलमानची न छाती
लुब्र्यास कोण सांगे, तो डौलदार नाही ?

शब्दांत रंग भरतो जो भाव-भावनांचे
मी व्यंगचित्र त्याचे साकारणार नाही ?

कविता करीत गेले तोट्यात ते बुडाले
कविता करावया मी बेरोजगार नाही

थकतील वाचणारे शोधून मौक्तिकांना
फुटके मणीच सारे, हा रत्नहार नाही

धिक्कार रोज होतो, होतो निषेध कायम
अजुनी विडंबितांचा घटला विखार नाही

'खोड्या' विडंबनाच्या करतो जरी, तरी मी
केशवसुमार नाही, केशवकुमार नाही :(

आमची प्रेरणा : कोण आपणहून आले

कोण आपणहून झाले, बनवले गेले किती ?
कंपुबाजीने इथे बायरन किती, शेले किती

दंग लाइन मारताना, खर्च हे कळले कधी ?
पटवण्यासाठी दिले परफ्युम किती, झेले किती

शीळ जी ऐकून खुलली तीच केवळ जाणते
चौक-चौकावर तिच्यावर जीव जडलेले किती

भेट अतिथींची टिपे अवघ्याच वस्तीची नजर
आजवर पोहे-चहा खाण्यास आलेले किती

श्वेत-अश्वेतात हल्ली रंगतो कलगी-तुरा
"लावुनी गाली चुना गोरे तुला केले किती"

"चोंबडा" म्हणुनी मतांची पिंक जी ती टाकते
नाक मुरडुन बोलते, " लुब्रे इथे मेले किती"

अमृताचे थेंब थोडेसेच गेली देउनी
पण कडू उपदेश भरलेले दिले पेले किती !

कैक नामी भ्रमर असलेल्या कवींना पाहिले
काव्य स्फुरलेले किती अन् यमक सुचलेले किती...?

बोलणे, खोड्या, तुझे झाले दफन पानावरी
गाडण्या काव्यास तुझिया लेखकू ठेले किती !

आमचे प्रेरणास्रोत : प्रदीप कुलकर्णी यांची गझल "शब्द मी आहे असा...!"


अर्थ त्याचा लावण्याचा यत्न साऱ्यांनीच केला!
अर्थ काव्यातून माझ्या एकदाही ना उदेला !

हा कवी झाला कशाला, कैकदा वाटून गेले...
द्याल का याला कुणी हो, शाल, श्रीफळ आणि शेला ?

ना जनाचे, ना मनाचे, ऐकले नाही कधीही...
हा जरासुद्धा न थांबे, हा कवी कसला हटेला !

खेळ आहे वाचकांचा चालला पळता भुईचा
अन्‌ इथे ओठंगलेला काफ़ियांचा रोज झेला !

रोजच्या घायाळ किंकाळ्या बिचार्‍यांच्या नकोशा...
यातना झाल्या अशा की जीव कवितेनेच गेला !

ते कवी गांभीर्यपूर्वक प्रसवुनी जातात कविता
रोज आकांतामुळे त्या सुन्न मेंदूचा तबेला!

राहिले बाकी न काही, जाहले सांगून सारे
रिक्त पातेल्यात बसतो कालथा घालून मेला !

रोज तो कोठे न कोठे काव्य करणार्‍यांस भेटे...
हाय, हा संपेल केव्हा खोडसाळाचा झमेला ?

आमची प्रेरणाः कविवर्य सुरेश भट यांची अजर, धगधगती कविता "उषःकाल होता होता काळरात्र झाली"


काल रात्र झाली !
घरी पुन्हा पत्नी वाही शिव्यांची लाखोली ! ॥धृ॥

आम्ही गोड शब्दांची त्या आस का धरावी ?
जे कधीच नव्हते त्यांची वाट का पहावी ?
कडू कारल्याच्या जिभेवरी जर पखाली ! ॥१॥

रोज घाव करिते पत्नीची जिह्वा कट्यारी;
रोज वंश सासरचा ती समूळऽ उद्धारी !
आम्ही गप्प ऐकत असतो आमुची खुषाली ! ॥२॥

अंत:पूर केले आहे बंद आम्हासाठी
ओसरीवरी ती धाडे निजावयासाठी !
आम्ही ते पती की ज्यांना बायको न वाली ! ॥३॥

उठा-बशा काढत काढत संपल्या उमेदी !
असा कसा झालो माझ्या घरी मीच कैदी ?
मी अपार दु:खी, माझी चालली हमाली ! ॥४॥

उभा फ्लॅट झाला आता एक बंदिशाला
जिथे सिंह ताटाखालिल मनी-माऊ झाला !
कसे पुरुष दुर्दैवी अन्‌ स्त्रिया भाग्यशाली ! ॥५॥

धुमसतात अजुनी उदरी भुकेचे निखारे !
अजुन अन्न मागत उठती रिक्त पोट सारे !
दूषणेच पत्नीची ती आम्हाला मिळाली ! ॥६॥

बरसतात ’खोड्या’वरती जिभेचे निखारे !
अजुन रक्त काढत बसती शब्द बोचणारे !
आम्ही महिषरूपी राक्षस; भासते ती काली ! ॥७॥

खेळा खो खो रे

मूळ जमीन

खेळा खो खो रे, खेळा खो खो रे
खो देउन त्या पुढे पळाल्या, तू मागे धाव रे!

कट्ट्यावरल्या चिमण्या, साळू
माझ्या राजा नकोस पाहू
पिकल्या पाना, तुझ्या, जाहली अब्रूची लक्तरे!

"पुरे खेळणे", वदली बाला
थांबव चाळा, थांबव लीला
गुमान येऊन घरी भेट तू माझ्या बापा, रे!

केस पांढरे त्यांचे झाले
नातवंड मांडीवर आले
ललनांनी ज्या कधी मारले तुज डोळे घारे!

(बाळ्या!)

आमची प्रेरणा : भूषण कटककर यांची कविता बाळ्या!


प्यायले चकण्याविना त्याला उगाचच
त्रास देते पेय ते आता उगाचच

शब्द माझे मोडले मी शांत निजता
काढला काटा कुणी, माझा उगाचच

बिल तसे ठेवून गुत्ता सोडतो मी
मित्रही म्हणतात फुकटा का उगाचच ?

पचवले नाहीस हे लक्षात येते
ढवळवे उदरास हा वारा उगाचच

आपली बाळी म्हणे, " बाळ्या, शहाण्या"!
घालतो आहेस का गाद्या उगाचच ?!

भासलो नाही कवी मी एकदाही
जे नसावे ते कसे भासा उगाचच?

आमची प्रेरणा :- जयशी अंबासकर यांची कविता अशक्य केवळ


कशास वावर मनात केवळ ?
भ्रतार असला अशक्य केवळ

नको अता तुज वरणभात मी
हवी काकडी खमंग केवळ

तुझ्यामुळे ही सुषुप्त गात्रे
सदा घोरणे तुझेच केवळ

जरा तरी तुज हुक्की यावी
कसे करावे उपास केवळ

हवी नव्याने सख्या उभारी
किती कराव्या खोड्या केवळ ?

प्रदीपपंत कुलकर्णी यांच्या "स्मरेना चेहरा आता...!" या कवितेने प्रेरित होऊन ...!...........................................
स्मरे का चेहरा म्हणुनी...!
...........................................

किती हा काळ विरहाचा; तुझ्या कायम मनाईचा
स्मरे का चेहरा म्हणुनी मला दुसर्‍याच बाईचा ?

घशाची शुष्कता शमवायला शोधू कुठे टपरी ?
मला देशील का थोडा चहा तू दाट साईचा ?

कितीदा वाक्य उच्चारी, "तुझ्याशी लग्न का केले ?"
"कशाला ऐकला सल्ला न मी तेव्हाच आईचा ?"

जुन्या त्या भांडणांच्या तारखा का शोधशी आता?
इरादा फौजदाराच्याकडुनी सरबराईचा ?

कळीचा प्रश्न कानाआड केला पांडुरंगाने...
"तुझ्या नावात पांडू अन् तुझा का रंग शाईचा ?"

तुझ्या नावामुळे झाली कशी रंगीत ही जादू ?
फिकटले चेहरे सारे...म्हणाले, "फोन ’भाई’चा !"

असा आतून-बाहेरून काटेरीच आहे मी...
कुणी घेण्यास पंगा येत नाही लाल माईचा !

सफाईदार साबण लावला आहेस तू आधी...
सरावाने अता जमतो तुला स्मश्रू सफाईचा!

जमे हे काव्य थोडे; तोच होई वेळ ’खोड्या’ची
कुणी पत्ता दिला याला कवींच्या या सराईचा ?

- खोडसाळ
.............................................
पुनर्रचनाकाल ः २१ मार्च २००९
.............................................

(अज्ञेय)

आमचे प्रेरणास्रोत : कोहम् यांची गझल अज्ञेय

कविवर्यांचा वाटेवरला वृश्चिक आहे
म्हणून माझा जालावर बदलौकिक आहे

भक्ष्यासाठी वणवण करतो जालावरती
इलाज नाही, विडंबनाचे आह्निक आहे

तिला भेटण्या असेन गेलो अनेकदा मी
अंगाला ती कुठे लावते, नॉन्स्टिक आहे

मिठी सोडता घोरत पडतो खुशाल मेला
नवरोबांची ओळख ही सार्वत्रिक आहे

हात तिने हातात दिल्यावर नकोस थांबू
वाटायाचे तिला किती हा अरसिक आहे

कसल्या गप्पा लग्नाच्या तो कवी मारतो
करार हल्ली सौख्याचा नैमित्तिक आहे

नाही कौतुक, नाहित वाचक, 'अर्थ'ही नाही
जरी खोडसाळाची रचना मार्मिक आहे

आपल्या सर्वांच्या मायमराठीने सोडलेला सुटकेचा निश्वास सध्या मराठी जालविश्वात सर्वत्र ऐकू येत आहे. तिच्या या आनंदाला कारणही तसेच आहे. गेली काही वर्षे तिला पीळ पीळ पिळून घेतल्यावर श्री. मिलिंद फणसे यांनी आपली मेहेरनजर (पक्षी : वक्रदृष्टी) यावनी भाषेकडे, चुकलो, ज़ुबानकडे, वळवली आहे. (कोण आहे रे तो "बुरी नज़रवाले तेरा मुँह काला " म्हणणारा ?!) हे ऐकून मायमराठीस जरी हर्षवायू झाला असला तरी उर्दूअम्मी रडत रडत अश्फ़ाक़ परवेज़ कियानी व मुल्ला ओमरकडे गेल्याची खात्रीलायक बातमी ISI मधील आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

तद्दन बाजारू हिंदी चित्रपटगीते ऐकण्यापलिकडे हिंदी/हिंदुस्तानी/उर्दूशी कोणताही संबंध आलेला नसताना मिलिंदमियाँना त्या भाषेत शेर लिहिताना (की कहताना ?) बघून आम्ही जलकर खा़क न होतो तर नवल ! लाहौल विलाकुवत ! अरे, चार-दोन हिंदी सिनेमे आम्हीही पाहिले आहेतच की. तो राजकुमार का कोण म्हणतो ना, "जानी, हम किसीसे कुछ कम है क्या?! हम हम है, बाकी सब पानी-कम है!" तेव्हा मिलिंदमियाँपासून स्फूर्ती घेऊन म्हणा किंवा जलकर खा़क हो‍ऊन म्हणा, आम्हीही ठरवले - यवनांवर नाही तर नाही, निदान यावनी(भाषे)वर तरी प्रभुत्व मिळवायचेच! देखना है ज़ोर कितना बाजू-ए-खोड्यामें है...


जिस ओर देखता हूँ कितनी बिमारियाँ हैं
हैज़ा, मलेरिया या सीनें धुवाँ धुवाँ हैं

बिजली को गुल कराके पूछें अवा़मसे वह
माथेंपे क्यों पसीना, क्यों बंद बत्तियाँ हैं ?

आए करीब इतने हम प्यार के सफ़रमें
गुस्सा मुहाफ़िजोंने दी खूब गालियाँ हैं

वह रूठनाभि, यारों, मेंहंगा हमें पडेगा
दीदारेअश्रफ़ी क्या जब चार बीवियाँ हैं ?

सायें हैं ज़िंदगीपर गुजरी हुई शबोंकें
हड़तालपर है बीवी, बच्चों को छुट्टियाँ हैं

लो, शाम आ गयी है उनकी शिकायतोंकी
इल्ज़ाम रातभर अब, मैं हूँ, सफ़ाइयाँ हैं

(चुंबन)

प्रेरणा : श्री. प्रसाद कोलते यांची कविता चुंबन


प्रियेचे पहिले चुंबन
हाय मजला असे भाजुन गेले
वैशाखातही नसतील भाजले
माळरानावरील दगड आणि धोंडे

तीच्या कम नीयर ओठांची
मजल्या मजल्यावर चर्चा झाली
टुणटुणलाही पालटुन नसती दिसली
अशी रुंदी आज मी बघितली

चुंबन तीचे घेताना
त्राहिची आशा मिटली
निशस्त्र मी शाकाहारी
ती मांसाहारात शिर-शिर-शिरली

तिचे चुंबन तिचे आलिंगन
वाटले नसावे सोसणे याहून काही
जीवन याहुन असावे काय भयंकर
नासावी जीवनाला हि अशी अख्ख्या का ही

(फायदा?)

आमचे प्रेरणास्रोत : आदरणीय भूषणसाहेब कटककरसाहेब यांची रचना "फायदा? "हो न हो, ठेहरूच, देखू ठेहरण्याचा फायदा
ठेहरणे येभी असावा चालण्याचा फायदा

मालकाचा त्रास सोसावा कसा हे जाणले
हा तुझ्या हपिसात आम्ही राबण्याचा फायदा

लीन केव्हा व्हायचे, पत्नीपुढे वाकायचे
जो शिके त्यालाच रात्री जागण्याचा फायदा

घेत गेलो मी मुक्याने बोलण्याचा फायदा
खूप मज झाला असे त्या चुंबण्याचा फायदा

दात तू घासायचे होतेस मित्रा टाळले
दंतवैद्यालाच झाला उपटण्याचा फायदा

रोज कोणी वेगळी पाहून मादक हासते
हाच आहे बारबाला पाहण्याचा फायदा

रोज कोणी वेगळा बापूस पोहे घालतो
हाच उपवर कन्यकांना पाहण्याचा फायदा

केवढा मी क्षुद्र मज कळलेच नसते हे कधी
केवढा हा बायकोशी बोलण्याचा फायदा

जागते पत्नी असे हा घोरण्याचा फायदा
घोर बघता रूप कळतो झोपण्याचा फायदा

फार होता त्रास छोटे पोहता मासे इथे
लाभला पण त्यात काटा काढण्याचा फायदा

घेतला नाहीच आपण नांदण्याचा फायदा
काय असल्या संयमाने वागण्याचा फायदा?

मी तुझी आई तुझी आई तुझी आई तुझी
घेतला आहेस म्हणुनी बडवण्याचा फायदा

खोडसाळा खूप कवितावाचनाचा फायदा
शब्द दुसर्‍यांचे, मिळे मज लाटण्याचा फायदा

प्रेरणा : 'क्षणाचा सोबती' यांची कविता 'संधी आणि मंदी'


मंदी आणि कुंदी

यांची कधी होत नसते ’जुगलबंदी"?

दोघी एकमेकींच्या सवती

घुटमळतात दोघी नवर्‍याच्या अवती भवती

मंदी असल्यास कुंदी पाळत ठेवते

कुंदी दिसल्यास मंदी तिला जळवते

मंदी चुकवता येत नाही

कुंदी रुसली की जवळ येत नाही

मंदी जाता जात नाही

कुंदी येता येत नाही

मंदी जाण्याची वाट बघावी लागते

कुंदी येण्याची वाट बघावी लागते

मंदी असताना चुकून कुंदी आली तर

हे नवर्‍या तिला झापलेसे कर

अन्यथा मंदी तिला खाऊ की गिळू करेल

आणि नवर्‍याची कंबख्ती ओढवेल

एक मंदी पुरे आहे घराला डोक्यावर घ्यायला

मात्रा फक्त एकच योग्य; कुंदी आवश्यक आहे, मंदीला जळवायला...

मंदीला जळवायला...!!

आमचे प्रेरणास्रोत : भूषण कटककर यांची मस्त गझल बोलणे त्याचे मनापासून ते...


ती म्हणाली तेच झाले शेवटी
ढोसली अन्‌ रेच झाले शेवटी

बोलणे बेंबीतळापासून ते
श्रोतृगण बहिरेच झाले शेवटी

एवढा खोटे खरेच्या कच्छपी
की तिला पोट्टेच झाले शेवटी

हालचाली आमच्या थंडावता
व्हायग्रा होतेच, झाले शेवटी

खात मी बसलो अधाशासारखा
आतड्यांचे पेच झाले शेवटी

प्रेम ज्यांचे नाव होते ठेवले
ब्रह्मचारी तेच झाले शेवटी

खोडसाळा, तू जसा देवास त्या
काव्यही प्यारेच झाले, शेवटी

देखणी / लेखणी

प्रेरणा : 'लेखणी'

काय मी सांगू तुला, केव्हा उचलली देखणी
तू घरी कटलास, येथे मी पटवली देखणी

पाहिले गौरांगनांसम चालता तिज रँपवर
मालफंक्शनले वसन जेव्हा घसरली देखणी

पाहिले नव्हते कुणी, शृंगारली ना तोवरी
पाहण्याची रीत नडली, रोज नटली देखणी

अर्थ गुजगोष्टीत नही, अर्थ नाही मीलनी
अर्थ बँकेतील सच्चा अर्थ, वदली देखणी

कोडकौतुक खोडसाळाने तिचे केले तरी
बोहल्यावर, हाय, दुसऱ्याचाच चढली देखणी

------------------------------------------------------------------


प्रेरणा : लेखणीचा उत्तरार्ध

'पिंड गाण्याचा नसे माझा', गरजली लेखणी
का तरीही कुंथुनी कविता चिरकली लेखणी?

फार शाई, फार कागद, लेखका संयम कुठे?
का, प्रभो, त्याची न तू अडवून धरली लेखणी?

काय अन् सांगू किती, होते असे अपचन तिला
शब्द वारा बापुडे अन् वातभरली लेखणी

जी करी चमचेगिरी राजापुढे, "तू ग्रेट बॉ! '
ती पुरी क्षेत्री रिघे, निष्ठा विसरली लेखणी

लादले निर्बंध ज्यांनी 'डायर्'ईया होउनी
हीच निर्बंधाविरोधी काल लढली लेखणी?

रावणासम दशजिह्वा, आयडी हजारो निर्मिले
पाग पाहून खेचरांची हसत सुटली लेखणी

वाचता काही कुणाचे, थांबली नाही कधी
खोडसाळा, काव्यरक्ताला चटवली लेखणी

आमची प्रेरणा : भूषण कटककर यांची बोल्ड ऍंड ब्यूटिफुल गझल 'गंधाच्या उलाढाली'


जरा चुंबावया जाता तिला, मळमळ मला आली
तिच्या तोंडातल्या हुंगून गंधाच्या उलाढाली

तुला जे पाहिजे होते तसे केलेस तू सारे
तुला पुष्कळ मजा आली परी मजला इजा झाली

उभी आहेस तू माहीत आहे पण कुणासाठी ?
कुणी शिट्ट्य़ा तुला मारून जातो खालच्याखाली

रचावे काव्य कोणीही, कुणी मोरीत रेकावे
कुणा थोडे मिळाले मद्य की तो लावतो चाली

रडावे वाचकाने, काव्य वाचुनिया किती वेळा
चला झटकून टाकूयात या अंगावरुन पाली

जरा कोठे निघालो मी, कसा पायास तो ओढी
मराठी माणसाच्या नेहमी का खेकड्या चाली?

पुरेसे काफ़िये केव्हाच माझे जाहले गोळा
नको रे, खोडसाळा, काळजी, कविता, चला झाली!

प्रेरणास्रोत : भूषण कटककर यांची कविता "श्वासात ताल आहे"


बिनधास्त वाजवावी मजला कुणीही येथे
माझा सदाचसाठी उपलब्ध गाल आहे

भक्ती स्वतः:च करतो, मूर्ती स्वतः:च असतो
वरती स्वतः:स नमतो, माझी कमाल आहे

जितका जमेल तितका उपभोग घेत जावा
सध्यातरी दिरांचा मधुचंद्र-काल आहे

मदिरा खराब आहे, आंबूस वास येतो
व्हिस्की न ही, गड्यांनो, देशीच माल आहे

जाते कुठे नि येते, हंसा कुणास ठाउक
भलतीच संशयास्पद हंसाचि चाल आहे

कापू किती किती मी या गीतकार माना
करणार काय सांगा? बकवास माल आहे

रंगित रुमाल पाही नि त्यास खूळ लागे
नजरेत फक्त एका, बकरा हलाल आहे

आजार हा कवींना, जुळवत हजार यमके
वाचू तरी किती मी ? बस हाल हाल आहे

बावीस, हाय, ओळी, चालू असे परीक्षा
केव्हाच लागलेला माझा निकाल आहे

या वाचनात आला ओठांस फेस माझ्या
जडला विकार उदरी, गोटा जमाल आहे

झाले कथून तरिही सोडून जात नाही
ही खोडसाळकीची कसली कमाल आहे !

(विश्राम)

प्रेरणा : मिलिंद फणसे यांची गझल "विश्राम"


मान्य, गर्दी फार येथे पण तरी विश्राम आहे
रोजच्या वाटेवरीचा बार हा निजधाम आहे

छेडणे तिज सोडले पाहून अनुजाला तिच्या मी
रेशमाचा भाउ हल्ली वाढला बेफाम आहे

खूपसे हितशत्रू आणिक वानवा नाही रिपुंची
तेव्हढ्यासाठीच माझा चालला व्यायाम आहे

अत्तरे लेऊन अंगी भेटलो होतो तिला मी
चारुगात्रीला, परंतू, वाटले तो घाम आहे

चार खांदे शोधण्यासाठी निघाले प्रेत माझे
बोलले, "शववाहिनीचा फार सध्या दाम आहे"

'मूर्ति'पूजेचा गुन्हा चुकला कुणा; सारेच 'तसले'
पूजती कांता कुणी, इतरत्र कोणा राम आहे

येउनी टाकून गेला शब्दपाचोळा कवी तो
झाड कवितांगण, तुझे ते, खोडसाळा, काम आहे

आमची प्रेरणा : 'सोबतीचा आव आहे' ही जयंता५२ यांची हृदयद्रावक तक्रार.


भोवती अंधार आहे, साथ नाही
बायकोचा डाव आहे; वाद नाही !

कोणताही खेळ नाही आज सोपा
झोपली अद्याप काही ब्याद नाही

ठेवले नाही खुशीने शस्त्र खाली
हारलो मी, पण दिली तू दाद नाही

भेटण्यासाठी तुला जागाच होतो
घोरणे कानास आले, साद नाही

का अजुन दारात माझ्या माप आहे?
अंगणी येतात सार्‍या, आत नाही

खोडसाळा ती म्हणाली, "बाय, टाटा"
जाउ द्या, नावीन्य काही यात नाही :(

जबरी

प्रेरणा : पुलस्तिंची सुरेल ठुमरी


गालावरचा हात अताशा संगमरवरी नाही
पूर्वी होती तितकी 'ती'ही नवखी नवरी नाही

तिच्या कृपेने असतो दुखर्‍या मी जखमांनी भरलो
रोज प्रॅक्टिकल करते हल्ली, केवळ थिअरी नाही

रात्री विझलेल्या अन बेचव चोथापाणी जेवण
घडते रडके जगणे जेथे पत्नी जबरी नाही

कॉल तिचा आला अन बसला त्यास विजेचा झटका
नवर्‍याच्या हद्दीमध्ये वासूंची टपरी नाही

जगणे आता झापडलेले झाले घोड्यासम ते
खोडसाळकी नाही, बघणे मादक फिगरी नाही

मराठी माणसांच्या दुहीच्या प्राचीन व देदिप्यमान परंपरेनुसार व एका संकेतस्तळावरून फुटून निघून दुसरे काढण्याच्या अर्वाचीन पद्धतीनुसार (आठवा : मायढोली --> मौनगत -->भेसळ खाव) संक्रान्तीच्या शुभमुहूर्तावर फुटून निघालेल्या, आय मीन, स्थापन झालेल्या बजबजपुरीला खोडसाळाच्या हार्दिक शुभेच्छा. ऍमिबांप्रमाणे मराठी संकेतस्थळांची संख्याही विभाजनाने अशीच वाढत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.


खेचराच्या त्रासाने, शुद्धतेच्या जाचाने
मिसळपाव, मनोगत सोडीला
चालले मी आता बजबजपूरीला

नवी कोरी बजबजपूरी चित्त्याची
त्यात सोबत आहे त्याला कर्णाची
कर्णाची, बाई, कर्णाची
केशा आणि धोंड्याही घेतलेत जोडीला
चालले मी आता बजबजपूरीला

आणिबाणी लागू झाली तोर्‍यात
पंत होते गुंतुन पडले होर्‍यात
होर्‍यात जी होर्‍यात
ठसका त्याला काजूचा जोरात की लागीला
चालले मी आता बजबजपूरीला

लाज तात्याला ना आल्यागेल्याची
मुरवत नाही आया बायांची
बायांची हो बायांची
कल्पनेत पाठींना साबण की चोळीला
चालले मी आता बजबजपूरीला

(कविता - १)

कविता - १ मध्ये श्रीयुत दर्शनकुमार नेरकर यांनी केलेल्या प्रेमळ तक्रारीस त्यांच्या प्रियेने पाठवलेले उत्तर :


प्रियकरा,

इतकाही घट्ट

धरत जाऊ नकोस,

की तुझ्या धरण्यापायी

एखादीची गुदमरून हत्या व्हावी....

(रिक्त)

मूळ कविता : श्वास स्वातीचा यांची रिक्त


(रिक्त)
=========================
.
.
काही वात... नुसते,
आतल्या आत ढवळत राहतात..
सरून जात नाहीत.
तटतटल्या पोटामधून...
नुसती आग होत राहते..
साठलेल्या पित्ताची..
जळजळत..
शेवटचा घास जिरून जाई पर्यंत.
पोटाला फक्त जाणवत राहत..
रिक्त होण्या आधीच..
वातूळ रटरटणं..!
.
.
=========================
खोडसाळ..... ११-०१-२००९

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds