सोड आता

आमची प्रेरणा : कवी सारंग ह्यांची गझल सोड आता

सखे ये जवळ, लाजणे सोड आता
दुरोनी मला चिडवणे सोड आता

नको तार सप्तक तुझा ऐकवू गे
नळावर असे भांडणे सोड आता

तुझे पाय वाटेवरी घट्ट राहॊ
इथे अन तिथे घसरणे सोड आता

दिवे दोन जैसे तुझे नेत्र राणी
डबल बॅटरी, ढापणे, सोड आता

खुळे, लाट पोळ्या, उपाशी असे मी
चुलीशी उगी राहणे सोड आता


माझे प्रेरणास्थान : कवी चित्तरंजन भट ह्यांची गझल पाऊस कोसळू दे .

पाऊस कोसळू दे
छपरातुनी गळू दे

दे, प्रेम दे तुझे पण
सखया जरा हळू दे

जावेस तळतळू दे
सासूस मळमळू दे

चोरून वन्स पाही
पाहून तिज जळू दे

मजला मिठीत घे पण
आधी तया टळू दे

कर फोन पोलिसांना
साऱ्यांस चळचळू दे

जेलात चोंबड्यांना
जात्यावरी दळू दे

मी काय चीज आहे
सटव्यांस आकळू दे

भरात आहे

कवी 'मानस६' ह्यांची मूळ गझल 'भरात आहे' इथे वाचा.


सुमनात गंध कोठे जो खेटरात आहे
बैसून गर्दभावर माझी वरात आहे

बाईल जी दुज्याची, का पूजिता तियेला?
ही खूण लंपटाची साऱ्या नरात आहे

चंद्रास रोहिणी ही भेटावयास आली
सवतीसवे तयाची ज्वानी भरात आहे

मी खोदतो कधीचा खड्डा तिच्याचसाठी
बुडण्यास खोल पाणी कुठल्या थरात आहे?

घ्या आज बायकांनो नवऱ्यांसवे जराशी
मदमस्त जागण्याची " 'रम'णी "य रात आहे

काढाच धिंड माझी, तो खोडसाळ वदला
खोडी विडंबनाची मम अंतरात आहे

तुला पाहिले

कवी 'प्रवासी' ह्यांची मूळ गझल "तुला पाहिले" इथे वाचा.


कडमडताना तुला पाहिले
लुडबुडताना तुला पाहिले

हात तिचा मी हाती धरता
चरफडताना तुला पाहिले

मेघ जाइना निरोप घेउन
बोंबलताना तुला पाहिले

सृजनशीलता भींतीवरती
खरवडताना तुला पाहिले

नदीकिनारी तिची पातळे
खळबळताना तुला पाहिले

कंठ दाटला, शब्द फुटेना
खाकरताना तुला पाहिले

कुंथत होतो प्रतिभेसाठी
डरडरताना तुला पाहिले

मोह दाटता पंचा सुटला
सावरताना तुला पाहिले

धीर धरी रे खोडसाळ तू
धसमुसताना तुला पाहिले

Newer Posts Home

Blogger Template by Blogcrowds