आमचे प्रेरणास्थान : श्री. इलाही जमादार यांची अप्रतिम गझल अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. भीमराव पांचाळेंच्या आवाजात ती गझल इथे ऐका.

अंदाज तारखांचा चुकला जरा असावा
मधुचंद्र फार केला मी साजरा असावा

अंदाज बापसाचा वाटे खरा असावा
शेजारचाच चालू तो छोकरा असावा

जखमा कधी सुगंधी असतात का कुणाच्या?
कविराज काव्य रचता टल्ली जरा असावा

नाही अखेर कळले बोका कुठे पळाला
घेऊन मात्र गेला तो म्हावरा असावा

का आळ खंजिरावर घेता उगाच माझ्या
तुमच्याच एअरगनचा घुसला छरा असावा

काठावरी उतरली वसने खुशाल त्यांनी
चोरून पाहणारा का लाजरा असावा?

खेटून बायकोला बसुया, विचार केला
दारात दत्त म्हणुनी का सासरा असावा?

दारात ती उभी अन अधरा करून चंबू
तेव्हाच, हाय, भरला मी तोबरा असावा!

माझ्यावरी असावे ओझे विडंबनाचे
आडात काव्य तुमचे, मी पोहरा असावा

हा 'खोडसाळ' चेंडू घेई विकेट कवींची
हा ऑफब्रेक नाही, हा 'दूसरा' असावा

प्रियतमा!

प्रेरणा : प्रदीप कुलकर्णी यांची सुंदर कविता संभ्रमा!


......................................
संभ्रमा!
......................................

चंद्रमुखी होशील कसी तू...
तुझा चेहरा किती जाडसर
म्हणावेत हे कसे गुलाबी?
फुकून झाले ओठ काळसर!

नव्हेसही तू तशी बावळी...
मवाळ किंवा मुळी लाजरी
खमकी बाई अशी कशी तू
जीभ तुझी ती असे कातरी!

लालबुंद तव या डोळ्यांना
मोतिबिंदुचा रंग जरासा...
तशात जडली रांजणवाडी
पापण्यातुनी स्राव झरासा...!

प्रसन्नता तुज ठाऊक नाही
स्वभाव आहे जरा मिजासी
कशी तुला मी धनीण केली...
घरी आणली विकत उदासी!

काय हवे ते, लग्नाआधी
कळले होते तुला नेमके
शोधत आहे तुझे अता मी
वर्णन करण्या शब्द शेलके!

टुकार कोणी; भिकार कोणी
तुझी पसंती ना कळणारी
शेजार्‍यांच्या उंबरठ्यावंवर
सदैव तू तर घुटमळणारी!

कधी इकडची, कधी तिकडची...
कधी अशी तू... कधी 'तशी' तू...
नवरा-परका तुला सारखा...
मला पाडले पुरा फशी तू!!

अशी चंचला नको प्रियतमा
कुठून, वाटे, तुला पाहिली...
निघून तू गेलीस न्‌ सुटलो...
करेन पत्नी अता वायली!

- खोडसाळ
......................................
रचनाकाल ः २३ डिसेंबर २००८
......................................

(कूजन)

आमच्या प्रेरणेचे उगमस्थान : कुमार जावडेकर यांची गजल कूजन


(प्रियकरावर घालसी बंधन कसले?
हे दर्‍या-झुडुपातले कूजन कसले? )


ओढ ना ज्याला तुझी, ते मन कसले?
जवळ तू असता असे लंघन कसले?

बंद तू केलेस सारे दरवाजे...
चालले आहे छुपे प्राशन कसले?

चालले आहे मना चिंतन कसले?
सासरे आहेत रे कर्झन कसले...

तेच गाणे ओळखीचे येते, पण-
आदळे कानी नवे फ्यूज़न कसले!

खूप आहे घातलेले 'जीवन' पण
ज्यात नाही तेल ते मोहन कसले

खूप झाले घालणारे किरीट, पण-
ज्यास नाही 'क्वीन' ते राजन कसले?

फिरत बसशी तू सदाच्या नाकावर...
(चालले श्लेष्म्यात संशोधन कसले? )

सर्व येथे वाचण्या कविता तत्पर
खोडसाळा, केले विडंबन कसले?

(ओठी तुझ्या)

प्रेरणा : जयन्ता५२ यांची गझल ओठी तुझ्या

ओठी तुझ्या सहल माझी
बघ कुठवरी मजल माझी

तव काळजाच्या किनारी
जाते नजर सखल माझी

हल्ले किती त्या सखीचे
सुजली किती शकल माझी

सुटले जरा पोट माझे
ही भोजने सफल माझी

दुनिया सह्या का न समजे?
हस्ताक्षरे सरल माझी

नजरेत खोडसाळाच्या
झाली हझल गझल माझी :(

आमचे प्रिय कविमित्र श्री. अनिरुद्ध अभ्यंकर यांच्या हसले होते निरोप घेऊन निघताना ने प्रेरित होऊन...

हसले होते निरोप देऊन वळताना
सुटकेचा निःश्वास टाकुनी पळताना

आठ जणांची गर्दी झाली दाराशी
काल मला खोलीत एकटी बघताना

तशीच असते खोली अस्ताव्यस्त तुझी
शिव्या घालते तुला रोज आवरताना

हसता डोळे फडफडून मी सगळ्यांशी
दिसायचा तू गोड किती जळफळताना

सांगत होते तुझ्या चहाड्या उशीस मी
तळमळते मी अन तू घोरत असताना

सांग कुठे या मित्रांना मी लपवावे
अवचित येता घरात तू ते असताना

गोष्ट खाजगी जगास का मी सांगावी
कार्य काय घडतात घरी तू नसताना

(नवनीत)

प्रेरणा : मिलिंद फणसे यांची गझल नवनीत

भावना नाहीत माझ्या, शब्दही नाहीत माझे
अन् तरी सर्वांस वाटे ढापलेले गीत माझे

मस्त हा एकांत, गाणी, वारुणी, साकीचि संगत
बहरले सारे कवित्व याच सामग्रीत माझे

कल्पनांची कामधेनू कोठली नशिबात माझ्या?
ती वळूरूपी कवींची, दैवही विपरीत माझे

सर्प माझ्या वैखरीचा चावला असल्यामुळे का
पाहुनी असतात मजला दोस्तही घाईत माझे

स्पर्शता परतत्त्व, भरते लेखणीला हुडहुडी अन्
ताप येतो, चोंदते मग नाकही सर्दीत माझे

वाचता परकाव्य, गाते लेखणी उत्स्फूर्त गाणी
एरवी दबकून असते बोलणे भयभीत माझे

सांग का शब्दांस येतो आद्य धारेचाच परिमल?
"तोंड मी घालून असतो रोज त्या सुरईत माझे"

जे दिसे की पद्य आहे त्यास का नाही म्हणू मी ?
खोडसाळा, रेवडीचे कार्य हे तेजीत माझे

उपास

प्रेरणा : प्रवास

सोसत नाही उपास तोवर चेपत जाणे
चरणे म्हणजे खुशाल ढेरी फुगवत जाणे

उदरम्‌ भरणम्‌ कधी कधी घासांनी आणिक
तोंडामध्ये कधी बकाणे कोंबत जाणे

पक्वान्नांशी क्षणोक्षणी गुजगोष्टी करणे
पोटामधल्या प्रखर अग्नीला विझवत जाणे

कसले लंघन, कसल्या गप्पा उदरशुद्धीच्या
देहाला का फुका उपाशी ठेवत जाणे ?

उपवासाला असेल जर काजूची फेणी
खाण्यासोबत 'खोडसाळ' ती प्राशत जाणे

नाही

मराठी गझल कार्यशाळा-२ जाहीर झाल्याचे कळले व आम्हाला हर्षवायू का काय म्हणतात तो झाला. मात्र तिथे जाऊन बघतो तर

* ह्या कार्यशाळेत हझल (हास्य-गझल) स्वीकारली जाणार नाही

ही "No Entry"ची पाटी! साऱ्या उत्साहावर विरजण पडले. मग काय, आलो माघारी. कार्यशाळेत विद्यार्थी म्हणून देण्यासाठी रचलेल्या ओळी वाकुल्या दाखवीत होत्या.
(स्वगतः खोडसाळा, एकूण तुझ्या भाग्यात कार्यशाळेचे मार्गदर्शन नाहीच. गुरूजन तुझा एकलव्य करून सोडणार. आंगठा मागत नाहीत हे नशीब समज.)


कार्यशाळेचे मला बक्षीस नाही?
काय शब्दांचा बरा हा कीस नाही?

बांधलो 'नाही' रदीफ़ाला जरी मी
काफ़ियाला राहिलो ओलीस नाही!

वृत्त ते सांभाळता दमछाक होते
आणि यमकाची मला प्रॅक्टीस नाही... :(

चालवू म्हटले तरी चालीत नाही
कोण म्हणतो काफ़िया डॅंबीस नाही?

हट्ट का धरता अलामत पाळण्याचा?
शायराला फार ही तोशीस नाही?

घ्याल का, संयोजकांनो, गझल माझी?
स्पष्ट सांगा, यात घासाघीस नाही

मान्य, हौशाचे असे हे कवन नवखे
बनचुक्यांच्या पात्र हे माफीस नाही

खोडसाळा, कविवरांना राग आला
हात त्यांच्या घातला दाढीस, नाही?

थांबवा गाडी

आमचे प्रेरणास्थान : आदरणीय जयंतरावांची सुंदर गझल 'थांबवा हे जग'


थांबवा गाडी, मला उतरायचे आहे
साखळी ओढा, इथे थांबायचे आहे

जा कुठेही आज, राणी, तू निजायाला
आज मजला रात्रभर घोरायचे आहे

एक हाताचीच बोटे ती पुरे झाली
सज्जनांचे गालफड शेकायचे आहे

रद्द झाल्या का अचानक सवलती साऱ्या?
कर्ज बॅंकेचे अजुन फेडायचे आहे

फार केल्या कविजनांच्या विनवण्या, आता
वर्म कवितांचे मला शोधायचे आहे

मूळ गीत : "जीवनात ही घडी अशीच राहू दे"

बेवड्यास दो घडी नशेत राहू दे
देशि पाज थोडिशी, शिवास राहू दे ॥धृ॥

रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडत्या साकींचे मस्त नाचणे
बारातिल चांदण्या निवांत पाहू दे ॥१॥

बहुत पेग घेण्याचा छंद लागला
चकण्याचा अन्‌ वरती खर्च वेगळा
दोस्तांचे हात तंग सैल होऊ दे ॥२॥

राहू दे असाच मला नित्य ढोसता
जाऊ दे असाच काळ धुंद राहता
'तास मोदभारला'* अनंत चालू दे ॥३॥

* :- 'Happy Hour'

आमची प्रेरणा : कवितेशिवाय कविता


................................
खोड्यांशिवाय कविता...!
................................

शोधून सापडेना माझ्यातला कवी!
केव्हा तरी सुचावी मज कल्पना नवी!

मी तीच तीच दु:खे सांगायची किती?
कंटाळलेत सारे, वाचायची किती?
वाचून आजची ती मागील आठवी!

कविता करून झाली हे बोललो जरी...!
कविता निदान थोडी वाचायची तरी...!
मुरडून नाक वाचक पण पान उलथवी!

शब्दांपलीकडे मी जाईन का कधी?
मी अर्थपूर्ण गाणे गाईन का कधी?
खोड्यांशिवाय कविता पाडायला हवी!

- खोडसाळ


................................
खोड्याकाल ः ८ सप्टेंबर २००८
................................

(जिंदगी)

प्रेरणेचे उगमस्थान : मिल्या यांची गझल जिंदगी

विना निंद,तळमळू लागली
आळसावली,चळू लागली

उपोषणाने दीड वाजता
भुकी पल्लवी गळू लागली

ष्टोची ज्योत ही पेटवली अन
मासळीस सवतळू लागली

चिंबोरी, बघ, तुडुंब भरली
शिजवताच दरवळू लागली

कशास झंपर तिने घातला?
ठेच काळजा हळू लागली

जरी बावळट तरी तिची मज
नेत्रपल्लवी कळू लागली

गंध असा वाऱ्यावर आला
दूर माणसे पळू लागली

अशी जन्मभर जेवली सखी
इथुन-तिथुन डचमळू लागली

पाय रोवता, खोडसाळ, ती
भली भली चळचळू लागली

येऊ कसा तुमच्यात मी ? हा श्रीयुत योगेश वैद्य यांना पडलेला प्रश्न आम्हालाही पडला. सुदैवाने उत्तरही लवकरच मिळाले.


येऊ कसा तुमच्यात मी? बोलू कसा तुमच्यात मी?
ही काळजी नाही मला, तरबेज हा घुसण्यात मी !

आले मला शोधावया ताई तुझी, भाऊ तुझा
बांधून हा आहे उभा बाशिंग हे गुडघ्यात मी

मी कोंडले वासास त्या, कोणास ना जाणू दिले
हे एवढे जमते मला, नसलो जरी सुस्नात मी

वाटे किती, खेटू तुला, घालू तुला मी मागणी
का राहतो मागे तरी ? का नेहमी भीष्मात मी ?

नोटा मुळी ना थांबल्या, हे मोजणे ना थांबले
खादाडणे माझे जगाने पाहिले, भ्रष्टात मी

चाल : "देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा... "

फाटक्या विजारी, बटणहीन लेंगा
घेतलास का रे, मूर्खा, बायकोशी पंगा ? ॥ध्रु॥

असे खास भितींवरला आरसा टपोरी
तरी लाज सोडून बाया उभ्या त्यासमोरी
तास तास पतिराजांना दाखवून ठेंगा ॥१॥

पिते दूध रत्तल रत्तल माय बायकोची
सुरस त्याहुनीही आहे कथा सासऱ्याची
जावयाघरी दारूची उपसतोय गंगा ॥२॥

काय मेहुण्याची सांगू थोरवी तुम्हाला
काल त्यास पोलीसांनी तडीपार केला
चंट मेहुणीच्या मागे लागतात रांगा... ॥३॥

मूळ जमीन : अतिशय प्रसिद्ध त्यामुळे ओळखायला अत्यंत सोपी.

ठग हे सारे बाळा
ठग हे सारे बाळा ॥ध्रु॥

कुणी न येथे भला-चांगला
जो तो बेरड मेला ॥१॥

जो तो द्रव्यामाजी जखडे
नजर न धावे तयापलीकडे
बाजारातिल परी सटोडे
घालीत टोपी त्याला ॥२॥

कुणा न माहीत नफा कधी ते
नुकसानीचे चित्रच दिसते
जळ्ळे मेले दलाल-अडते
जो पडला तो बुडला ॥३॥

मूळ जमीन : इथे (पान १) आणि इथे (पान २)पाहा.


साहित्याशी जडले नाते बोरूघाशाचे
विडंबन झाले कवितेचे ॥धृ॥

कविराजांनी धनू उचलिले गझल-रुबायांचे
पूर्ण जाहले विडंबकाच्या हेतु अंतरीचे
उडू लागले शब्दकावळे छचोर काव्याचे ॥१॥

वक्र टाळकी कसुन वाचती काव्य अर्थवाही
नयनांमाजी एकवटुनिया काकदृष्टि पाही
फुलू लागले फूल हळू हळू निजल्या मज्जेचे ॥२॥

सोकावुनिया जरी विडंबन पाडत तो राही
तडिताघातापरी भयंकर वाद तोंच होई
कविराजांच्या तक्रारीचे, बोल कोपल्याचे ॥३॥

अंगारुनिया आले डोळे, चरफडले राजे
मुक्त हासऱ्या प्रतिसादांचे बघुन सडे ताजे
पडू लागले तृतीय लोचन अमुच्यावर त्यांचे ॥४॥

हात जोडुनी म्हणे विडंबक तो कविराजासी
"आज विडंबन अर्पियले मी अपुल्या चरणासी"
संतापाने मिटले डोळे क्रुद्ध का कवीचे? ॥५॥

देवाज्ञेने स्फुरे अम्हाला रोज शब्दक्रीडा
अधिर लेखणी, अधिर तीहुनी डोक्यातिल कीडा
अर्थहीन हे चरण लावती लेबल पद्याचे ॥६॥

काव्याकाशी कशी भरावी उषःप्रभा लाल
उगी राहिलो वामांगी शब्देविण कंगाल
कवन रचुनिया धनी जाहलो शरसंधानाचे ॥७॥

नाही उरला राम, चालले ते वनवासाला
कविराजांच्या हात घालसी का कासोट्याला
त्यांच्या वर्मी घाव बैसले खो खो हास्याचे ॥८॥

खोडसाळ सांगाल अम्हाला का कविता लिहिता?
कविराजांचे सूर हरवले विडंबने बघता
साहित्याशी कसले नाते तुमचे डोंबलाचे? ॥९॥

...........................
या पोरट्या झणी
...........................

ही सोबती निशा...
गेली कुठे दिशा...?
करती रिता खिशा... होतात वेदना!

कपडे खरीदती...
खातात सागुती...
देतात मागुती... त्याची बिलं मला!

या पोरट्या झणी
अंधारल्या क्षणी
होतात ढेकणी... चावा कुठेतरी!

सांगू तरी कसे...?
झाले जगी हसे...!
गालावरी ठसे... वाटे तरी हव्या!

बाहेर खातही...
खाती घरातही...
नि येत-जातही... नाही म्हणू कसे?

नसतात या घरी...
डिस्कोत, पार्लरी...
ही व्यर्थ वैखरी... बोलू कुणासवे?

या त्याच त्या व्यथा
कविता यथा तथा
रंगाविना कथा... सांगायची कशी?

सरबत कधीतरी...
देतात त्या जरी...
द्राक्षासवे खरी... देतात साथ ना?

मी कोकरू कधी...
मी शिंगरू कधी...
मी वासरू कधी... हाकीत सारख्या!

लांबऽऽण लावतो...
अन् अंत पाहतो...
सारेच वाचतो... डोळे मिटून मी!

दीक्षा परी असे...!
रक्षा परी असे...!
शिक्षा परी असे... सोसायची मला!

अज्ञात वास हा...
नाकास त्रास हा...
घेताच श्वास हा... वांती ढसाढसा!

- खोडसाळ

.....................................
कालबाह्य
.....................................

जिज्ञासू

आदरणीय ज्येष्ठ स्नेही विलासराव यांच्या सूचनेचा व आमचे परम-मित्र चित्त ह्यांच्या अपेक्षेचा मान राखून आम्ही स्वतंत्र कल्पनेवर आधारित रचना जमते का हे बघण्याचा प्रयत्न केला. 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता' गळलेले 'तेल' खाली देत आहोत. त्याला यथावकाश खमंग व खरमरीत प्रतिसादांची फोडणी मिळेलच .


हाती प्याला, ओठी हासू
शय्यी पिसवा रक्तपिपासू
समजो वा ना समजो कोणा
लेखन आहे अमुचे ढासू
भवभूती अन् ग़ालिब आम्ही
बोरू घासू, शाई नासू
मारावा पद्याचा धोंडा
अर्थाचे टोके अन् कोंडा
ओळींच्या ह्या दळणामधुनी
शोधीत बसले ते जिज्ञासू
शत्रू आम्ही गांभीर्याचे
साहित्यिक त्या व्यवहारांचे
कवितेच्या हमरस्त्यावरती
उभे टपोरी, लुब्रे वासू
शब्दांच्या ठिकऱ्यांशी खेळू
नाही काळू, नाही वेळू
जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी
कवितेचा करतो आभासू

आमची प्रेरणा : स्वप्न उन्हाचे...!


............................................
यत्न उल्हासाचे...!
............................................

फाल्गुनातला
उल्हास
घेतला
पेग
जरासा...
घेता
घेता
त्याचे
सोनेरीपण
डायल्युट
झाले...!

त्याच
क्षणी
कर टूर,
टूर वर
मेष
कापले...
मुलगी
घेते
ऊन
सावळी
भरीत
खाल्ले...!!

त्या
पेगातच
उल्हास
मणभर
अगदी
मणभर
यत्न
खोडकर
भोचक
केले...!

हिरवी
पिवळी
क्षितिजा होते
रूप
पाहुनी
नटरंगीचे
प्रच्छन्नतेने
जे
पाहिले...!!


- खोडसाळ

............................................
रंगारीकाम : ०४ ऑगस्ट २००८
............................................

रती

मूळ रचना : मृण्मयी यांची सती

भार माझा वाहणारा कोण आहे?
लीलया मज उचलणारा कोण आहे?

वर्षणारी मेघना असता घरी मी
बारमध्ये ढोसणारा कोण आहे?

हो, सखे येतात मदतीला हजारो
चान्स हा नाकारणारा कोण आहे?

मी रती होऊ कुणासाठी कशाला?
मदन मजला शोभणारा कोण आहे?

फार शब्दांना नको ताणूस इतकी
श्लेष येथे जाणणारा कोण आहे?

खोडसाळा भीत होते कैक आले
काव्य येथे टाकणारा कोण आहे?

प्रेरणास्रोत : प्रदीप कुलकर्णी यांची कविता 'अपशकुनाची घार!'

..................................................
मोसंबीची धार!
..................................................

सर्व आहेत तर्र तेथे
अन्‌ खुले क्लबाचे दार
अंगणातल्या गुत्त्यावरती
मोसंबीची धार!

नायकिणींचा अमोल वावर
उंबरठ्याच्या आत
"मुंगळा मुंगळा" धून कधीची
असते कोणी गात!

मध्येच उठते कधीतरी
अन्‌ ठुमका घेते एक
फडफड करते ती डोळ्यांची
मग होतो उद्रेक!

"खलास!" अंगण होते सारे
मदहोशीतच चूर
आणिक जातो मिळून त्यातच
"बिडी जलै ले"धूर!

टपून असतो खोडसाळ मी
कधी उघडते दार
अंगणातल्या गुत्त्यावरती
मोसंबीची धार!!

- खोडसाळ
..................................................
रचना आज : २४ जुलै २००८
..................................................

प्रवृत्ती

आमचे परममित्र व विडंबनव्यवसायबंधू श्रीयुत केसवसुमार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला याचे आम्हांस खूप दुःख झालेले आहे. केशाचा असा अचानक श्री श्री केशवानंद महाराज झाल्याने विडंबन क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. संन्यास घेताना त्यांनी आम्हांस "संसारात ऐस आणि विडंबनं करीत राहा" हा आशीर्वाद दिला. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून आम्ही आमची मूळ प्रवृत्ती कायम ठेवणार आहोत. खालील रचना श्री श्री केशवानंदांच्या चरणार्पण.

छळले मज त्या सर्व कवींना स्मरतो आहे
सूड घ्यावया रोज विडंबन लिहितो आहे

वा व्वा टाळ्या मिळो ना मिळो मज रसिकांच्या
हातुन माझ्या रोज कुणी भादरतो आहे

कवी अडकता प्रतिभेच्या जाळ्यात माझिया
चिरून त्याला माशासम मी तळतो आहे

मित्रांना ही सावध केले होते मी की
दोस्तांचीही शत्रूंसम मी करतो आहे

डोक्यामध्ये कवड्याच्या मी पाहू शकतो
म्हणून कविवर मज इतका घाबरतो आहे

शब्दांच्या ज्यांनी कोलांट्या खूप मारल्या
विदूषकाचे सोंग घेउनी छळतो आहे

जरा मोकळे साच्याच्या पिंजऱ्यातुन व्हा हो
तेच तेच वाचून रोज कळवळतो आहे

साद घालतो खोडसाळ नाठाळ कवींना
हेच मागणे, हीच विनवणी करतो आहे...

स्फूर्तीस्रोताचे उगमस्थान : मुमुक्षू यांची कविता बाळ थांबला कधीचा..


कसे नेसावे तयास, कसा सांभाळावा व्यास..
मिणमिणता उजेड अन् धोतराची कास.

येथ सर्वत्र गर्दुल्ले, कोण शुद्धीत कळेना..
हुक्का ओढण्याच्या जागी, दरवळतोय वास.

कसे अफुत रमले जन सोकावल्यावाणी..
डोळे तारवटलेले, लागे खोकल्याची ढास.

दिन-रात एक सारे, त्यास पिण्याच्या क्षणात..
बाळ थांबला कधी का, तया ढोसण्याचा ध्यास.


खोडसाळ

श्री. प्रदीप कुलकर्णी यांच्या एकमेवाद्वितीय दिवलीने आमच्या तामसी मनात पाडलेल्या प्रकाशात आम्हीही थोडे लेखन करून घेतले.



....................................
... खोडसाळ आहे दिवटी!
....................................
मी रोज कशाला वाचू?
शब्दांचा असला चकवा....
त्यांना ही गाणी रचुनी
येईना कैसा थकवा!

ती जखम काळजामधली
मज रोज नका हो दावू
प्रतिसाद देउनी त्यावर
मी लेप कितीदा लावू?

थिजलेल्या गाण्यासाठी
का श्वास ताणवत जाई?
सांगून संपले सारे
हे त्यास जाणवत नाही?

टाकाया सज्जच होते
भय ना त्यांना पाट्यांचे
अवतार असावे बहुधा
चिपळुणकर वा माट्यांचे!

वाचल्याविना पण का हो
भाळावर पडल्या आठ्या
कवितावाचन मी करता
का गायब झाल्या पोट्ट्य़ा?

सक्तीचे-आसक्तीचे
मज प्यारे वादळवारे
गजबजले जे ललनांनी
पाहिलेत सर्व किनारे

मी दूर फेकला जावा
बेटावर निर्जन कुठल्या
हा नवस बोलती कविवर
मजविषयी उठल्या-सुठल्या!

सुटकेचा क्षण येईना
ही पानभराची शिक्षा
पाहतो देवही बहुधा
वाचकहो, सत्त्वपरीक्षा!

ओलांडिन सहजगत्या मी
या कविपंक्तींच्या राशी
खोडसाळ आहे दिवटी
अभिव्यक्तीची मजपाशी!

- खोडसाळ

....................................
रचनाकाल : १७ जुलै २००८
....................................

आमची प्रेरणा : प्रसाद शिरगांवकर यांची सुंदर कविता 'अधीर ओठ टेकता'

अधीर ओठ टेकता तयास मारतेस तू
मिठीत पण सुधीरच्या झकास लाजतेस तू!

चिडून नारीजात ही उभी तुझ्याच अंगणी
उगा पतींस सर्व का अशी खुणावतेस तू ?

तुलाच पाहण्या उनाड रोमियो उभे किती
गवाक्ष उघडुनी खुशाल रूप दावतेस तू

अता कुठे जरा जराच रंगतेय प्रीत ही
अशात हाय प्रेमिकास दूर सारतेस तू?

सखे तुझ्या मिठीत लाच खोडसाळ मागतो
उगाच लाजतेस अन उधार ठेवतेस तू...

[त्याचा रचना]

आमची प्रेरणा - मिलिंद फणसे यांची माझ्या रचना

गरुड नाही, कावळ्याची झेप आहे
पुनपुनः ही वाजणारी टेप आहे

पायवाटेचा चिखल उडवीत येसी
बस, महामार्गास हा आक्षेप आहे

कोवळ्या वाचून झाल्या सर्व रचना
झोंबरा प्रतिसादरूपी लेप आहे

वाचताना काव्य मी विव्हळू किती रे?
काव्य कसले, काफियाविक्षेप आहे!

ही रदिफ, हा काफिया अन् ही अलामत
गझल नाही, फक्त तैसा 'शेप' आहे

हे विडंबन आणि टीका व्यर्थ सारे
खोडसाळा, तो तवा निर्लेप आहे...

आमचे प्रेरणास्थान : कविवर्य सुरेश भट यांची गझल "माझी उदास गीते"

माझी भकास गीते तू ऐकतोस का रे ?
अन्‌ आसपास माझ्या रेंगाळतोस का रे ?

येताच तू समोरी मी जर पळून जाते
कुत्र्यासमान मागे तू धावतोस का रे ?

माझा मुका मिळावा, का छेडतोस म्हणुनी ?
थोबाड तू स्वत:चे हे पाहतोस का रे ?

एकांत थेटराचा अंधारला असू दे
तू 'अंतरा'त माझ्या डोकावतोस का रे ?

कवितेचे सर

आमच्या प्रेरणेचे उगमस्थान - श्री. प्रमोद बेजकर यांची सुंदर कविता 'हलकीशी सर'.

कवितेचे सर आले आणि पकवून गेले
बाबा आदमची गाणी पुन्हा उकरून गेले

निळ्या टि-शर्टात मेघा सावळी पातली
वर्गातल्या मोरांची नजर आनंदाने लकाकली
बाळोबांचे लक्ष कवितेवरून उडून गेले.....कवितेचे सर आले

दुसऱ्या दारातून आली गौरांग भार्गवी
साऱ्या वर्गास तजेला, हृदयी कालवाकालवी
उल्हसित मुलांचे वारू उधळून गेले.....कवितेचे सर आले

पोरे टपोरी पाहून का तरण्या बहकल्या
खोडसाळ झाले धुके वाट साऱ्या हरवल्या
शीळ पाखरांना कोण कवी घालून गेले.....कवितेचे सर आले

प्रेरणा : कविवर्य सुरेश भट यांची नितांतसुंदर, अजर गझल "केव्हातरी पहाटे"

पोहे, चहा, बटाटे घेऊन आत गेली
पिठले चुकून मजला देऊन आत गेली

कळले मला न केव्हा फुटली बशी कपाची
कळले मला न केव्हा उचलून आत गेली !

सांगू तरी कसे मी वय नासक्या दुधाचे ?
रोखून श्वास रबडी ठेवून आत गेली !

उदरात येत काही आवाज कावळ्यांचे...
बदमाश ताट माझे उचलून आत गेली !

पाडावयास आली माझ्याच दंतपंक्ती
मग बोळके मुखाचे बनवून आत गेली !

आता बशीत नाही ते पापलेट माझे...
(सामीष ताट माझे बदलून आत गेली)

अजुनी सुगंध येई खोलीस मोगऱ्याचा...
गंगावनास येथे विसरून आत गेली !

आमचे मित्र, श्री. मिलिंद फणसे, यांच्या प्रेमभंगाविषयी वाचून आम्हास फार वाईट वाटले. चार समजुतीच्या गोष्टी वहिनींना सांगून त्या दोघांच्या प्रेमाची घसरलेली गाडी परत रुळावर आणण्याकरीता आम्ही तडक वहिनींच्या घरी गेलो. परंतु तिथे आम्हाला जे कळले त्याने आम्हास आश्चर्याचा धक्काच बसला. मिलिंदरावांनी आपल्या कवितेत वस्तुस्थितीचे अतिशय एकांगी व एकतर्फी चित्रण केलेले आहे. किंबहुना जे घडले त्यास त्यांचीच वर्तणूक कारणीभूत आहे. सत्य परिस्थिती वहिनींच्याच शब्दात आपणा सर्वांच्यापुढे मांडत आहे. त्या म्हणतात :

चुंबने सगळ्यांस तो देऊन येतो
गूण, मेला, गावभर उधळून येतो

भेटते रस्त्यात जी कोणी तिला हा
एक नजरेनी कसा मापून येतो

का नसे माझे बरे लावण्य, मित्रा?
रोज दोस्ताची सखी पाहून येतो

तो जणू श्रीकृष्ण होतो सांजवेळी
गोपिकांशी रास तो खेळून येतो

मागते घरखर्च मी बाई विवाहित
कांक्षिणींना हा रसद पुरवून येतो

लागतो डोळा पहाटे मुष्किलीने
रात्रभर डोळा कुणा मारून येतो?!

रात्र मधुचंद्रातली ती पौर्णिमेची
हा तरीही उकिरडे फुंकून येतो!

वाटते की वीज कायमचीच जावी
हा दिवे नाहीतरी लावून येतो

शाश्वती देऊ नका त्या लोचटाची
सारखा कोणातरी मागून येतो

एकटी मी यापुढे असणार नाही
सोबतीला सवत तो घेऊन येतो...

...ये ना !

आमची प्रेरणा - श्रीयुत प्रदीप कुलकर्णी यांची माउलींच्या आठवणीने व्याकूळ होऊन रचलेली परिपूर्ण, अप्रतिम कविता ...ज्ञाना!


............................
..ये ना !
............................

वासनांनी गांजण्याआधीच राया आज ये ना !
देह हा साऱ्या विकारांच्याकडे नेण्यास ये ना !

तू अता अडतोस का माता-पित्यांच्या आठवांनी ?
लावली होतीस का मग तू मला मेलीस माया ?
गुंतला आहेस निवृत्ती-विरक्ती यात का तू ?
का तुला झाली नकोशी ऐन तारुण्यात काया ?

अधर हे देईन... ज्यांनी अमृताला लाजवावे
घोट तू सारे कटू पेल्यातले ते पचव आधी !
मोगरा फुलला तुझ्या या मनगटी रुजल्यावरी हा -
...पैंजणांच्या लागली तालावरी आहे समाधी !!

उंच तू गगनावरी नेण्या विमाना आज ये ना !

सोड ती दु:खे जगाची ? कोणत्या काळामध्ये तू ?
आजच्या काळी कसे हे वागणे वेड्याप्रमाणे ?
वाढली आहे तुला ही केशरी रंगेल वाटी
थंड का केलेस आगीला असे तू कोण जाणॆ...!

तू रहा वर्षानुवर्षे माझिया हृदयात जागा
अन्यथा हृदयात शिरती माझिया ते चोर भुरटे...!
आजही वर्षाव नोटांचा तुझा तो आठवे अन्
बाकीचे असतात सारे...रोजचे षौकीन फुकटे !!

जन्मभर का वाट पाहू ?...तू कुठे मेलास ? ये ना !

............

त्याग संसारी सुखांचा का असा केलास ? ये ना !
............

- खोडसाळ

.....................................................
वैराग्यकाल - २९ मे २००८
.....................................................

प्रेरणा : चैतन्य दीक्षित यांची गझल ठेवणे ठरवून काही!

एवढ्या साऱ्या पऱ्यांना मी जरा ओशाळतो

ठेवतो ठरवून काही, बोलता ढेपाळतो !

काम करण्याशी तसे काही न माझे वाकडे

टाळण्याचे काम माझे, काम करणे टाळतो !

ना कुणाशी वैर माझे, पाहतो साऱ्यांस मी

पोरगी येवो कुणीही, मी तया न्याहाळतो !

मी समीक्षांचाच होतो लक्ष्य झालो एकटा

टिप्पण्या नि टोमण्यांची आज पाने चाळतो

मी न इतरांच्या मुक्यांच्या फार आशा ठेवल्या

पाहुनी ही सोबतीची चांदणी चेकाळतो !

भूतबाधेशी घरोबा, चेटकीशी सख्यही

खोडसाळा, पोरही तव भासतो वेताळ तो !

ठेवतो ठरवून काही, बोलता ढेपाळतो !

(प्रवास !)

मूळ कविता : प्रदीप कुलकर्णी यांची कविता प्रवास !


.....................
प्रवास !
.....................

खेटले सारे कसे हे
लाज सोडोनी प्रवासी...?
पाठपोटी लगटले अन्‌... बिलगले काही पदासी !

चेहऱ्यावर साळसुदकी
त्यातले नसल्याप्रमाणे
पाहती येथे-तिथे त्या गावचे नसल्याप्रमाणे !

यांस कैसी आवरू मी ?
हात कोणाचा धरू मी ?
लोचटांपासून आता कोणती आशा करू मी ?

शेवटी आता अशांशी
चालला हा वाद माझा...
"लावता धक्का मला का ? प्लिज्, सोडा नाद माझा !"

चालली आहेच बस अन्‌
ते असे मस्तीत सारे
खोडसाळा, थांब मेल्या !सँडलीचा मार खा रे !

-खोडसाळ

.........................................
दुर्घटनाकाल : १५ मे २००८
..........................................

आबा, या T20 तील क्रिकेटने आमच्या अभ्यासाची पार वाट लावली आहे. आम्ही व आमच्यासारखे हजारो जरा कुठे शहाण्या प्रथम वर्षीय वैद्यकीय विद्यार्थ्यांप्रमाणे मन लावून शरीरशास्त्राचा अभ्यास करू लागलो, किंवा नृत्याचा अभ्यास करू लागलो की लगेच एखादा फलंदाज षटकार-चौकार मारून त्यात व्यत्यय आणतो. किती समजावले तरी ऐकत नाहीत. यांना काय वाटते, मैदानावर जमलेले सारे यांचा खेळ बघायला आलेले आहेत ? मैदानाच्या कडेला आमची शाळा भरते म्हणून आम्ही येतो. अहो, बारामतीकर साहेबांनी आमच्यासाठी खास गौरदेशातून छान छान शिक्षिका आणल्या आहेत. (अशा शिक्षिका आमच्या देशी शाळांमध्ये असत्या तर? 'अशीच अमुची टीचर असती...' ) त्याही भान हरपून, अंगविक्षेप करून शिकवण्यात दंग असतात आणि तेव्हढ्यात कोणीतरी *** विकेट घेतो आणि आम्हा मुलांचे लक्ष अभ्यासावरून उडते. नाव न सांगण्याच्या अटीवर काही शिक्षिकांनी याविषयी आमच्याकडे नाराजीही व्यक्त केली आहे. "आम्ही सामाजिक कर्तव्य समजून सतासमुद्रांपलीकडून तुम्हा आबालवृद्ध भारतीय विद्यार्थ्यांना एनॅटमी आणि शास्त्रीय नृत्य शिकवायला आलो पण आमच्या अध्यापनात या क्रिकेटमुळे सारखे अडथळे येतात. अशाने पोर्शन पूर्ण कसा होणार? "

आबा, काही नतद्रष्ट म्हणतात की या वयात इतका (आणि असला) अभ्यास आम्हाला झेपणार नाही. अहो, माणूस शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी असतो हे शाळेत जायला लागल्यापासून ऐकत आलोय आम्ही. आता ते आचरणात आणतो आहोत तर नाकं मुरडून , "शोभत नाही हो या वयात ! " हे ऐकवण्याची काही गरज होती का ? आबा, आम्ही तर म्हणतो, प्राचार्य बारामतीकरांची परवानगी घेऊन व शिक्षणमंत्री पुरक्यांना सांगून आमची रोज परीक्षाही घ्या ! मग सगळ्यांना कळेल आम्ही किती मन लावून अभ्यास करतो ते.

पण आबा, आमचा अभ्यास नीट होण्यासाठी या T20 तील क्रिकेटवर ताबडतोब बंदी आणा. नाही, नाही, T20 वर बंदी आणा असे नाही म्हणत आम्ही. फक्त त्यातील क्रिकेटवर.तरुण पिढी बिघडते म्हणून तुम्ही डान्सबारवर बंदी आणलीत. आता महाराष्ट्रातील (देशाचे जाऊ द्या, देशात अजून राष्ट्रवादीचा गृहमंत्री यायचाय. काय म्हणता, साहेब लवकरच पंतप्रधान होणार आहे ? अहो, पण दहाच खासदार ना तुमचे ? असो, नाहीतरी आम्ही राज्यशास्त्राचे नाही, एनॅटमीचे विद्यार्थी आहोत.) आमच्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य तुमच्या हातात आहे. आमच्या या शिक्षिका वैतागून नोकरी सोडून मायदेशी जाण्याअगोदर साऱ्या खेळाडूंना घरी बसवा व आम्हाला एकाग्र चित्ताने शिकू द्या. आबा, आमच्यासाठी इतके कराच.

आपला,
ललित मोदींच्या शाळेतील एक विद्यार्थी

(आरसा)

जयन्ता५२ यांची अप्रतिम गझल आरसा वाचून आम्हालाही त्या आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाडावेसे वाटले.


लाडका स्त्रीचाच आहे आरसा
आणि पुरुषा जाच आहे आरसा

मी कधीचाच फुगलो, पोट सुटले,
सांगतो, कुजकाच आहे आरसा

जागचा तो हालला नाही कधी
सुस्त तो भलताच आहे आरसा

ओळखीचे हासला लोचटपणे
हा जरा लुब्राच आहे आरसा

उष्ण वाफेने तयाला झाक तू
हा जरा 'तसलाच' आहे आरसा

रोज पाही रूपसुंदर देखण्या !
जाऊ दे, घरचाच आहे आरसा...

हासुनी बघता कधी मी त्यामधे
फिसकनी हसलाच आहे आरसा

खोडसाळा का फिदा यावर मुली ?
रोमियोचा 'बा'च आहे आरसा

(किंमत)

प्रेरणेचा मूळस्रोत : अनिरुद्ध१९६९ यांची सुंदर गझल किंमत


कारने होतो निघालो जायला
चांदणीच्या बारला पाहायला

बार हा साधा न होता पण तरी
वेळ थोडा लागला शोधायला

मी तरी सर्वांमुखी हे ऐकतो
खूप किंमत लागते मोजायला

काळजी माझी नका इतकी करू
माल पुष्कळ आणला उडवायला

छंद मी केले पुरे उधळायचे
लागली नोटांस ती वेचायला

"हो पुढे", म्हटलेस तू, "आलेच मी"
मी खुळ्यागत लागलो वागायला

भाव मी बालेस त्या इतका दिला
लागली शेफारुनी चालायला

'खोडसाळा' फेकले रस्त्यावरी
ताळ होता लागला सोडायला...

मायना


आमची प्रेरणा : मिलिंद फणसे ह्यांची गझल यातना


फोटोतुनी तुझ्या मी रंगास ना समजलो
तुज, सस्यश्यामले, मी गौरांगना समजलो

साठीत जीवनाच्या, धुंदीत मी सुरेच्या
चष्म्याविना तुला मी नवयौवना समजलो

पाहून तू मला का मिटलास एक डोळा ?
मिटण्यातली धिटाई प्रस्तावना समजलो !

माझेच नाव देसी चिल्लापिलांस अवघ्या
हा डाव का तुझा मी आधीच ना समजलो ?

समजून राम धरले जेव्हा उरी तिने मज
मी अर्थ मत्सराचा, रघुनंदना, समजलो

कळले न आतड्यांचे दुखणे मुळीच त्याला
पाहून डॉक्टराचे बिल वेदना समजलो

झाली क्षमाशिला ती तेव्हाच जाणले मी
परमेश्वरा, खरेदीची योजना समजलो

"सरला", वसंत वदले, "आहे तुझ्यात काही"
"पाहूनिया लिफाफा, मी मायना समजलो"

स्फूर्तिस्थान : माझे अभावाचे विश्व...!


.....................................

माझ्या स्वभावाचे अश्व...!

.....................................

काल होतीस प्रेयसी
आज झालीस वहिनी
रोज संख्या वाढे, वाढे
मला किती रे भगिनी !!

अता का ग भेटलीस...?
केलीस का बडबड?
भंगलेल्या हृदयाची
पुन्हा झाली पडझड !

प्रौढपणा जरी तुझा
माझे बरे ना लक्षण...
पोर तुझ्या खांद्यावर
माझे चालू सर्वेक्षण !

होती तुझ्या कडेवर
बाळी एक रडणारी...
तिला लागलेली भूक
भोकाडून सांगणारी !

कधी खोटे रुकारणे
कधी जाणे ते रुसून
कधी मोहक कटाक्ष
सारे गेली विसरून !

प्रेयसीत का वहिनी ?
वहिनीत का प्रेयसी...?
परस्त्रीस का रे मना
अशा तऱ्हेने पाहसी ?

तुला भेटून बघून
मला काय लाभ झाला ?
जसा तेव्हा तसा आता
माझा पोपटच झाला...

तुझ्या मस्त दर्शनाने
आज भलतेच झाले...!
माझ्या स्वभावाचे अश्व
वारे प्याल्यागत झाले...!!

- खोडसाळ

......................................................

मोडतोडकाल : ०१ मे २००८ (जय महाराष्ट्र)

......................................................

(शरपंजर)

आमचे स्फूर्तिस्थान : पुलस्ति यांची सुरेख गझल शरपंजर


भावोजींना चढला बघ ज्वर
ताइटले, नवऱ्याला आवर

मेहुण्यांच्या गर्दीत हरवतो
घोवावरती ठेव तू नजर

नीळरंग त्या गोपी होता
राधे, चरफडशी कान्हावर

दे नवऱ्याला तसेच उत्तर
फ्लर्ट करुनी दे प्रत्युत्तर !

इतरां देता नयनांचे शर
'खोडसाळ' येई ताळ्यावर !

माउली

प्रेरणास्रोत : गगनगिरी यांची सावली...


मी स्वतः:च्या माउलीला घाबरतो

जेव्हा मी नापास ठरतो...

माउली किरकोळ शरीराची

पण तिंबते कणीक माझ्या पाठीची...

माउलीस नाही अश्रू, माउलीस नाही दु:ख

शरीर बुकलते सारे आणि घेते वर तोंडसुख...

माउली ओरडते गुणपत्रिकेचे रकाने बघून

भोपळे बघून तिच्यावर मग आग येते माउलीतून...

येतो निरोप शिक्षिकेचा, निजे 'खोडसाळ' वर्गात मजेत

तरी स्वप्न पाहते उगाच डिस्टिंक्शन मिळण्याचे साखरझोपेत...


खोडसाळ...

(निरोप)

प्रेरणा : मिलिंद फणसे यांची कविता निरोप . त्यांची कविता संपते त्याच्या काही वर्षांनंतरचा काळ या 'कविते'त सापडेल.


थांबा थोडे, दीर तिथे पेंगुळला नाही
जावेचाही तिरपा डोळा मिटला नाही...
कुठे संपले भांडण श्वशुरांचे सासूशी?
रंग वन्सने तोंडाचा उतरवला नाही...
चाळकऱ्यांनी कुठे लावली दारे घरची ?
आडोशाचा अजून पडदा सरला नाही...
धीर धरा हो, जरा आवरा तुमची वळवळ
चिंगी जागी आणिक बंड्या निजला नाही...
अजून काही आले नाही नळास पाणी
तशीच पडलित भांडी,ओटा धुतला नाही...
किती बोलता उच्चरवाने भलत्या गोष्टी
अर्थ नकाराचा लटक्या का कळला नाही ?

(रंग...)

प्रेरणा : अजब यांची गझल रंग...


बघताना मी झालो होतो दंग
बघुन रूप तव हो‍उ कसा निःसंग?

तू नसताना सवती त्या असतातच!
तू नसताना हो‍उ नये बेरंग...

उठून धावू नकोस खुर्चीवरुनी...
अल्प वस्त्र तव आणिक त्यावर तंग!

रोज शिलाई पत्नीसाठी करतो;
शिवुन होइतो अजुन वाढते अंग...

का स्वप्नी 'ही' नेहमीच मज पुसते-
"कुणा संगती चालू रंग न्‌ ढंग?"

कधी प्रतीक्षा, कधी मनीषा असते;
मनात चालू अनितेचा व्यासंग!!

इथेच असतो 'खोडसाळ' लपलेला
कवी-कुलाचा करायास रसभंग...

बऱ्याच दिवसानंतर चित्त यांची गझल मनोगतावर वाचावयास मिळाल्यामुळे आम्हांस वाटले बरे किती काय सांगू ? ती सुंदर गझल वाचून आम्हालाही एके काळी भेटलेले काही चेहरे आठवले.


भेटती लपून फटफटीत चेहरे किती!
सोबतीस आणती सख्यांस फत्तरे किती!


मी अजूनही दूरून चेहऱ्यास पाहतो
लाजल्याशिवाय भेटण्यास चाचरे किती!


प्रश्न हा विचारतात सेल्स गर्ल्स नेहमी
राहतात बायका अशी इथे घरे किती?

झोपड्यांत राहणे ठरेल फायद्यातले
आलिशान बांधतात त्यात टॉवरे किती!


आपले ऋणानुबंध जोडले तरी मला
घडवलेस तू उपास सांग लाजरे किती?


गोड गोड बोललीस, वाटले बरे किती
थाप त्यातली किती नि त्यातले खरे किती?


दार लावुनी उभा तुझ्यासमोर ठाकलो
अन्‌ तुला फिकीर पाहतात सोयरे किती!


बोहल्यावरी चढायच्यात चार कन्यका
मी चढायचे अजून, हाय, उंबरे किती?


गांजतील मैफलीत डास आज, पण उद्या
चारशील त्यांस धूळ, क्षुद्र मच्छरे किती!


खोडसाळ चित्त हे किती दिसात बोलले
लाभले तुला चविष्ट काव्यतोबरे किती!

आभास २

प्रेरणा : सुवर्णमयी यांना झालेले आभास


आभास तू पतीचा, मी शोधले कितीदा
शोधून रोज तुजला कातावले कितीदा

जुल्फे झडून गेली, कुंतल उडून गेले
टोपीस घट्ट धरुनी तू ठेवले कितीदा

लग्नात बायकोही तुज ओळखू न आली
मुंडावळ्यांत मजला गुंडाळले कितीदा

मॉडेल नवीन होते, पठ्ठा तयार होता
बाहूत घेतल्यावर ओशाळले कितीदा

घेऊन साथ फिरणे होते तुला नफ्याचे
नांदावयास नेणे तू टाळले कितीदा

होते किती जणांच्या यादीत खोडसाळा
घालून माळ तुजला पस्तावले कितीदा

(अर्पण...)

ही रचना अजबरावांना सविनय अर्पण...


तुलाच आहे केले पाकिट अर्पण
तुझ्यामुळे पैशाची कायम चणचण...

तुझी तोफ तर अखंड चालू असते
तुझ्यामुळे हे डोके होते भणभण

वरण भात अन्‌ जूनच भाजी आहे
अन्‌ कढी त्यावरी बुरसटलेले शिक्रण...

काळ लोटला जरि कर्णपटल फुटल्याला
आठवणीत आहे बोंबलल्याची ठणठण...

उत्तर होते चुकलेलेच नवऱ्याचे
समजता पत्नीला करे पतीला ताडण

अजब 'खोडसाळा' सवय तुझी ही भारी
तू प्रतिभा केलीस सारी विडंबनार्पण

इतिहासाचार्य अनिरुद्ध१९६९ यांच्या इतिहासापासून प्रेरणा घेऊन आम्हीही इतिहास रचण्याची स्वप्ने बघू लागलो. त्याचीच परिणती खालील पुनर्लिखित इतिहासात झाली.


मीही लिहीन म्हणतो कविता जुन्या नव्याने
संदर्भ चोरलेले कळतील पण अशाने


उकरून काढले मी इतिहास, वाद सारे
झाले जिवंत सारे कंपू पुन्हा नव्याने


काव्यास आज माझ्या का ती बघून हसते
जुंपेल खास अमुची केव्हा तरी अशाने


दमलो जरा सकाळी मी वाद घालताना
सुचले नवीन मुद्दे आता नव्या दमाने

होणार हे असे मज ठाऊक काय नव्हते
बदनाम पार केले मम नाव तोतयाने


ढापू कुणाकुणाच्या ओळी मला कळेना
चाळून पाहिल्या मी कविता क्रमाक्रमाने


ओढून ताणले मी शब्दांस एव्हढे की
फाटून अर्थ सारे गेलेत त्या बळाने


नाही प्रकाशकाने छापावयास नेली
माझी भरून झाली कित्येक तावदाने


फाडून टाक त्यांना, होईल त्रास त्यांचा
वाचू नये दुज्याचे साहित्य लेखकाने


आतून येत आहे आवाज मत्सराचा
समजूत, खोडसाळा, काढू तुझी कशाने ?

...व्हा असे

आमची प्रेरणा : जयन्ता५२ यांची गझल ...का असे?

का अबोला, का दुरावे?...व्हा असे
दूर राहुन का झुरावे?...व्हा असे

प्रीत माझी टाळता का राजसा?
मी किती हो आतुरावे?...व्हा असे

बीज स्नेहानेच पडते, त्याविना
ते कसे हो अंकुरावे?...व्हा असे

ठेवली मी बाज सजवुन अन्‌ तुम्ही
मागता कसले पुरावे?...व्हा असे

खोल भरले श्वास मी छातीत या
फूल हे कोणी चुरावे?...व्हा असे

खोडसाळा जर उद्या नसणार तर
आज थोडे फुरफुरावे!...व्हा असे!

(मोजणी) २

आमची प्रेरणा : आमचे परममित्र व विडंबनव्यवसायबंधू रा. रा. केशवसुमार यांची (मोजणी)

हल्ली गझल मला का कोणीच देत नाही ?
कोणी चुकून सुद्धा जोखीम घेत नाही !

आश्वासने कवी ते देऊन कैक गेले
मी भादरेन म्हणुनी पण काव्य देत नाही

सारे विडंबनांने पोळून लांब गेले
डसलो तयां असा की जवळीच येत नाही

'धिक्कार' खास अमुचा, अभिप्राय रोज तिरके
मज मोजदाद त्यांची अजिबात येत नाही

काव्यास केशवाच्या खरपूस भाजतो तो
का लाडवास त्याचा आस्वाद येत नाही ?

मी श्वास घेतला तर दचकू नका कवींनो
मानेवरी बसाया मी भूतप्रेत नाही

केला समीक्षकांनी नाहीच पुस्तकात
उल्लेख एक माझा प्रस्तावनेत नाही

माझ्या विडंबनांचा घेऊ नकात धसका
मिश्किल झरा असे हा, हा पानशेत नाही

नाहीस खोडसाळा गणतीत तू कवींच्या
संमेलनात अथवा त्यांच्या सभेत नाही...

जटायू २

हे विडंबन नाही. पुलस्ति यांच्या जटायू या गझलेची जमीन वापरून (परवानगी न घेता! पुलस्तिजी, क्षमस्व.) वेगळ्या विषयावर केलेली रचना आहे.


का 'अटल'चे नाव घ्यावे वाटते ?
'मुखवट्या'मागे लपावे वाटते ?

एकदा "जिन्ना निधर्मी" बोललो
आजही त्यावर रडावे वाटते!

पाजतो कॉफी सिन्योराला अता
क्वॉटरोचीला भुलावे लागते

रोग गुढगीचा, तरी आहे उभा
हो, घरी 'त्या'ने बसावे वाटते!

प्रश्न माझा नागपुरला एवढा
का जटायू मज करावे वाटते?

काय माझा दोष? कसली ही सजा?
...हाच की पी.एम. बनावे वाटते?

तोच मी अन त्याच त्या रथयात्रा
का मला पुस्तक लिहावे वाटते?

मी बनावा, 'तो' न व्हावा वाटते
यात का आयुष्य जावे वाटते?

जाणतो मतदान नाही दूर पण
ते अचानक आज व्हावे वाटते...

प्रेरणा : प्रदीप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता ने पुन्हा मज माउली...!

..................................................
ने पुन्हा मजला मुली...!
..................................................

सोसवेना ही उन्हे; छायेत ने, शेतात ने !
ने पुन्हा मजला मुली, तू मस्त काळोखात ने !

भेटली येऊन लेले; जीव पण रमला कुठे ?
भेटली नेने नि चित्रे; मेळ पण जमला कुठे ?
डाव शेवटचाच...दुसरीस वरण्याच्या आत ये !

जेवुनी खानावळीचे यापुढे जगणे नको !
खाउनी पोहे-चहा हे उपवधू तगणे नको !
घाल मजला माळ; मज तू अन्नदरबारात ने !

ताट वाढावे असे की संपता संपू नये !
संपता पोऱ्या कुणी मज बिल कधी देऊ नये !
टिप न लागो द्यावया; घरच्याच हॉटेलात ने !

एवढे उपकार माझ्यावर जरा करशील का ?
काक पोटातील माझ्या शांत तू करशील का ?
न्यायचे तर ने यमा, भरपोट पण स्वर्गात ने !
* * *

हाय, जन्माला कसा आलाय सूकर हा पुन्हा...
जो कधी करणार नाही स्नान करण्याचा गुन्हा...!!
सोसवत हा गंध नाही; मज जरा हौदात ने !

घाल जन्माला विडंबन खोडसाळा तू पुन्हा...
जे कधी ठरणार नाही काव्यजगती या गुन्हा...!!
खंत अथवा खेद नाही; मज काव्यबाजारात ने !

* * *
मस्त काळोखातुनी तू मज सखे सज्जात ने !!

-खोडसाळ
..................................................
विमर्दनकाल :१९ ते २१ मार्च २००८
..................................................

स्फूर्तिस्थान : श्वास स्वातीचा यांना झालेला दृष्टी भ्रम

दृष्टी भ्रम १




कित्येकदा गेले दिवस
मला ते....
जडसे वाटत होते.
मग
पायावर सूजही दिसे.

आता पाहते तर,
वाढलेले वजन.

उद्या कदाचित!!
तुलाही दिसेल.
पुढे पुढे,
वाढू लागलेले पोट.
किंवा मग
खाईन काही...
आंबटसं....
रोज



खोडसाळ............०५-०३-२००८

काव्यघास...

खोडसाळाला काही मधुर रात्रीची सोबत-बिबत मिळत नाही. त्यामुळे चांदण्या रात्रीही लेखनकामाठीतच वाया घालवाव्या लागतात.


सांगा कुणी लेखकास

सोड हा यमकांचा ध्यास

मिसळले त्यात अनुप्रास

निसटली कवितेची कास

भुणभुणती शब्दांचे डास

एकेक ओळ लिहावी एकेक तास

असे वाटे साऱ्या वाचकांच्या मनास

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास

पाडल्याचा येत आहे वास

खोडसाळाला मिळाला काव्यघास...

खोडसाळाला मिळाला काव्यघास...

अभिमान

प्रेरणा : मिलिंद फणसे यांची कविता नेपथ्य

का असे विडंबन मम काव्याचे होते ?
माझेच फक्त की ज्याचे त्याचे होते ?

ठेचते, विखुरते तुकडे इकडे तिकडे
हे असेच का माझ्या हृदयाचे होते ?

लागते वळाया नजर षोडशीमागे
त्यामुळे मग हसे वार्धक्याचे होते !

कंचुकी कशाला दिलीस तू परिटाला ?
भलतेच रंगले चित्त तयाचे होते

सोडवे हवाई-मार्गमोह ना मजला
चोरटे प्रलोभन पवनपऱ्यांचे१ होते

मज लोभ, मोह अन् हाव असे स्वर्गाची
पण काय करू, भयही मरण्याचे होते

वेगळे मुंबई- आणि पुणेकर२ कोठे ?
असलेच फरक तर अभिमानाचे होते !

कवितागुण तुजला खोडसाळ ना दिसती
का वेध फक्त तुज वैगुण्याचे होते ?

१ : या लेखाशी या 'कविते'चा असूयाग्रस्त पोटदुखी व्यतिरिक्त कोणताही संबंध जोडल्यास सदरहू लेखक त्यास जबाबदार राहणार नाही.
२ : अत्यंत आगाऊ (इथे आगाऊ शब्दात श्लेष नाही!तो ज्या अर्थाने समोर येतो त्या अर्थानेच घ्यावा.) सूचना :- पुण्य -> पुण्यकर पुणे -> पुणेकर. समस्त पुणेकर व्याखेने (by definition) पुण्यवान असतातच, नाही का?

प्रसाद यांनी आपल्या हार्ड हिटिंग (यासाठी कोणीतरी मराठी प्रतिशब्द सुचवा रे) आणि अप्रतिम गझलेत जरी नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी असे म्हटले असले तरी खोडसाळाची विडंबकाची जात काही जाता जात नाही. तेव्हा...


नोकरांना खाज सुटली, घर्म फुटला शेटजी
घोरतो लावून एसी मात्र टकला शेटजी!

एक वाटी उंदियोची सांडली रस्त्यावरी
अन तिथे रस्त्यावरी बैसून चरला शेटजी...

का जुन्या मालाप्रमाणे नाव सिन्हा लावता ?
का पटेलांचा, शहांचा भाव पडला शेटजी ?

का रिकामी पाडता रेशनदुकाने आमची ?
हाय, गोदामात सारा माल दडला शेटजी...

पाहता 'तसल्या' सुखांच्या जाहिराती रोज का ?
काय शेठाणीस तुमचा जीव विटला शेटजी ?

भाविकांची बोंब आणिक कर्णकर्कश आरत्या
मंदिरी येऊन बहिरा देव बनला शेटजी

ढोकळे, फरसाण, गाठ्या, अन बियरच्या बाटल्या
टंच मदिराक्षीस बघता नाच म्हटला शेटजी

रोज कोल्ह्यांच्या परी करता तुम्ही साळसुदकी
त्याच त्या करता कशाला रोज नकला शेटजी ?

चार क्विंटल ? आठ क्विंटल ? वाढवा ढेरी जरा...
एवढ्या वजनात कसले थंड पडला शेटजी ?

भुक्त आहे मी, जगी सर्वत्र कवितावानवा
खोडसाळा कोण देई रोज गझला शेटजी ?

प्रेरणा : आमचे प्रतिभासक्त डोळे दिपवणारी एक कूल कविता जिने आमच्यावर करणी केली. चाणाक्ष वाचकांना अधिक सां न ल.


...................................................
मी कवींस छळण्यासाठी गातो गाणी ...!
...................................................

मी खोडसाळशी घेऊन आलो वाणी !
मी कवींस छळण्यासाठी गातो गाणी !

ओढून इथे मज कुणी आणले नाही
राहण्यास आलो, शिकार करण्यालाही...
स्वादिष्ट खाद्य मज मिळेल याच ठिकाणी !

आनंद कवींना निखळ मिळू ना दिधला...
दुग्धात विडंबनखडा प्रत्यही पडला
वाचून तयांची सूरत उदासवाणी !

साधीच अपेक्षा...पूर्ण कुठे पण झाली ?
कविकुळात कोणी नाव न माझे घाली...
प्रतिसादयाचना केली केविलवाणी !


प्रेयसी ही किती किती समंजस माझी...
ही शांत राहते...सखी भेटता माझी
चोंबडी सखीही झाली आज शहाणी !

काहूर आतल्या आतच माझ्या दाटे...
वातूळ अन्न उदरात करी बोभाटे !
यापुढिल ओळखा तुम्हीच कर्मकहाणी !

सावळीच आहे बरी...सोबतिण माझी
रात्रीत येतसे...घरा सोबतिण माझी
आवाज न करता...येते ती अनवाणी !

वेशीवर माझी लाज मीच का टांगू ?
मी काय, कुणाला, कशास आता सांगू ?
अळिमिळी गुपचिळी, साऱ्यांचीच कहाणी !

मी कवींस छळण्यासाठी गातो गाणी...!

...................................................
- खोडसाळ
...................................................

लुडबुडकाल : १५ फेब्रुवारी २००८

गज़ल१

प्रेरणा : माणूस१ यांची गझल गज़ल

मस्त ढाचा, रूपवैभव, माज होता
चालण्याचा काय तव अंदाज़ होता !

घालतो मोहून त्याला रोज दाणे
पारवा तो, हाय, कुर्रेबाज होता !

वाटले मीही करावे प्रेम थोडे
काढला गाली तिने आवाज होता

आग अंगातील विझली पूर्ण माझी

उतरला झटक्यात यौवनमाज होता

तोंडदेखी वाहवा ही करत नाही
वाचका, का बैसला आवाज होता ?

न्यून का दडते कधी आभूषणांनी ?
नाक नकटे, वर नथीचा साज होता !!

खोडसाळा रोजचा होतोय घाला
मूळ लेखक केव्हढा नाराज होता

आमची प्रेरणा अदितीताईंची सुंदर कविता/गझल काल सांगावा मिळाला.... आणि केशवसुमारांचे मजेदार विडंबन सोड असले नाद सगळे...

रोज डोळ्यांतून जाती
लाव त्या पाण्या कपाती !

थोरली नाकारली मी
धाकटी डौलात पाती

संपवे ना स्नान त्यांना
सोबतीने जे नहाती

ना जमाना सज्जनांचा
लाच ती सारेच खाती

आज कांगावा कशाला
काल जर आलीस हाती ?

लेखिकेचे काव्य पडले
खोडसाळा दैत्य हाती !

--खोडसाळ
(माघ शु.२ शके १९२९
९ फेब्रु. २००८)
(हाही प्रयत्न खोडसाळ आहे हे वे‌ सां न ल)

प्रेरणा : अजब यांची रोटी, कपडा...(गजल)

पार्श्वभूमी : एका अंमळ जास्तच काळ उपवर राहिलेल्या मुलीचा आपल्या आईशी संवाद :

बेटी, हुंडा, मकान दे
जावयास तू गुमान दे...

बहिणींना दे सायकल तू
अम्हा उडाया विमान दे...

दार लोटते, अता तरी
जरा प्राय्वसी निदान दे!...

चढून ये पर्वती जरा
घरी मोकळेच रान दे!...

लक्ष वेधण्यासाठी मज
एक तंगशी तुमान दे...

पारध 'त्यां'ची करावया
भुवयांची मज कमान दे...

उपवर झाली कन्या तव
मुहूर्त पाहून दान दे...

नकोच पोकळ छातीचा
पती मला पैलवान दे...

पाठ सोड ना माते तू
सोबत 'ह्यां'ची जवान दे...

कृपा करी देवा, त्यांच्या
नजरेला ती बया न दे!...

आनंदाने जगेन मी
भ्रतार ताजा-तवान दे...

विडंबनं टाळण्या, अजब
जमीन तू गायरान दे!!...

भले नको देऊ प्रतिभा
खोडसाळ मज जबान दे!...

प्रेरणास्थान : वा. न. सरदेसाईची सुंदर गझल जे कधी न जमले मजला

जे कधी न जमले मजला, इतरांना जमले होते...
माझ्यासम तेही प्याले, पण ते ना वमले होते !

ती लाट तुझी बघताना, केसांची डोळ्यांवरली
नुसतेच न शिणले डोळे, तिरळ्याने नमले होते !

त्या जत्रेमध्ये तुजला जी झाली धक्काबुक्की
भ्रमरांचे ते कुसुमावर गर्दीतुन हमले होते

कोंबडी शिजेतो तू-मी, त्या मिटक्या मारत असता,
बघ सुवास त्या रश्शाचे घरभर घमघमले होते !

एकांती ऐकू आली तिज सावधतेची वाणी
भलतेच मनी रचलेले त्याने तर इमले होते !

तू कार घेउनी जेव्हा आलीस अंगणी माझ्या
मज असुयेच्या वाताने उदरी टमटमले होते !

मी गझल हुडकुनी त्याची यमकांना जुळवत होतो..
'खोडसाळ' वाचुन सारे कंटाळुन दमले होते !

नववर्षाचे स्वागत करणारी प्रदीप कुलकर्णी यांची सुंदर कविता ...ये नववर्षा मला फार आवडली. सर्वप्रथम मनोगतावर कवितांची पंचविशी गाठल्याबद्दल प्रदीपरावांचे हार्दिक अभिनंदन. त्यांच्या ...ये नववर्षा या कवितेने प्रेरित होऊन मीही येणाऱ्या (आता खरं तर आलेल्या म्हणायला हवं) वर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ लिहायला बसलो. पण ते सकारात्मक का काय जमत नाही हो, काही केल्या ! असो.


तुझ्या स्वागतासाठी करतो कर्कश ठणठण...ये नववर्षा !
तुझ्या स्वागतासाठी होतो भाट नि चारण...ये नववर्षा!

नव-आशांची, नव-स्वप्नांची गाजर फसवी दावत ये तू
नव्या सुखांच्या इंद्रधनूचे लोणी मजला लावत ये तू
गतसालाच्या कार्ड-बिलांची करीत पखरण...ये नववर्षा !

दहा दिशांना नव-चॅनल्स्‌चे किरण कोवळे उधळत ये तू
घरांघरांतून सांस-बहूंचा जुनाच काढा उकळत ये तू
अशीच राहो त्यांची प्रतिभा कायम गाभण...ये नववर्षा !

ये प्रेमाचा ऋतू हो‍उनी...न्हात न्हात गंधाळत ये तू
नवरात्रीला कुमारिकांचा तोल परी सांभाळत ये तू
ये माझ्याही दारी घेउन सनई-तोरण ...ये नववर्षा !

जे जे वाचक आणि समीक्षक, असेच त्यांना हसवत जा तू
'खोडसाळ'से काव्य वेगळे त्यांच्यासाठी प्रसवत जा तू
कुरकुरणाऱ्या जीवनगाडीला दे वंगण ...ये नववर्षा !

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds