...एकटी मी !(ही)

आमचे प्रेरणास्थान : प्रदीप कुलकर्णी यांची सुंदर कविता ...एकटी मी !

मज कधी करशी सवाशीण...एकटी मी !
फार झाले फक्त भाषण...एकटी मी !

नाचसी केव्हा सख्या तू भोवताली
ऊठ अन्‌ बसशील तू माझ्याच ताली
भास हे सारेच रे पण...एकटी मी !

जो गडी येई, हवासा भासतो रे
एकटीला पाहतो अन्‌ हासतो रे
पाळते तरिहि मी श्रावण...एकटी मी !

काय माझी चूक...केला मी पिझा तर ?
आठ दिस तो रोज तुजला वाढला तर ?
काय हे रुसण्यास कारण
...एकटी मी !

काय माझा 'लूक' हल्ली आवडेना ?
'फिगर'ही माझी तुला का पाहवेना ?
सवतिचे नक्कीच जारण...एकटी मी !

एकटेपण खायला उठले मला जर
विनवुनी नाहीस तू आला सख्या तर
मी दुजा गाठीन साजण...एकटी मी !

रोज कांगावा तुझा मी पाहते रे
रोज तव लांडी-लबाडी पाहते रे
रोजचे आहेच भांडण...एकटी मी !

- खोडसाळ

(मोडतोडकाल : १२ सप्टेंबर २००७)

प्रेरणा : एका दिवसाचे स्वप्न

एक दिवस वरण व्हावे
तेलासोबत भातावर पसरावे

एक दिवस शेंग व्हावे
किती दिवस भोपळा राहावे

एक दिवस पवन व्हावे
अंत:पुरातून अदृश्य हिंडावे

एक दिवस वमन व्हावे
पोटदुखीतून मुक्त व्हावे

एक दिवस नारळ-खण व्हावे
सुवासिनीच्या पदरी पडावे

एक दिवस हे थांबवावे
कवींचे किती हे अंत पाहावे

एक दिवस प्रशासक व्हावे
खोडसाळाला गप्प करावे

वायफळ

प्रेरणास्रोताचा उगम : पानगळ

प्यावेसे वाटते सूप बोकडाच्रे
पाया-सूपा हवे खूर ते मिळेना
ताजे ताजे कसे रक्त-मांस होते
खाल्ल्यावाचून मज आज राहवेना
आधी नास्त्यातही मत्स्यरूप येई
आता स्वप्नातही मत्स्य आढळेना
झाली मदिरा जशी डोह मृगजळाचे
आहे डोळ्यापुढे, प्यावया मिळेना
मुर्गी अन्‌ चिकन ते वेगळे चवीला
नवखा समजा जया फरक आकळेना
अमुच्या या मैफिली फक्त खवैय्यांच्या
ज्यांच्या उदरातली आग शांतवेना
नाही या भावना, प्रेमचित्र नाही
आहे खाबूगिरी, सत्य हे लपेना
कवितेचा बाज अन्‌ साज ल्यायलेल्या
ओळी 'रुचिरा'तल्या, ज्याविना जमेना
तावांचा वायफळ 'खोडसाळ' वापर
असला लेखनकहर रोज वाचवेना

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds