वाकला

जो वाकला, जो टेकला
नवरा असे तो चांगला

रुसवे तुझे, फुगवे तुझे
खर्चात टाके मामला

अष्टौप्रहर म्हणसी कशी
"कसला अवेळी चोचला!"

करता सुखाचे बेत मी
तो बाळ छद्मी हासला

"वा, वा" कधी केले कुणी?
जो तो मला कंटाळला!

पायात जो होता म्हणे
मोजा मला ना गावला

माझाच तो होता जरी
कुत्रा मला का चावला?

खरडेन मी ओळी पुन्हा
हा मोह मजला जाहला

झालो कधी नि'वृत्त' पण
हसतील ना सारे मला?

का खोडसाळाला तुम्ही
वाळीत आहे टाकला?


मूळ जमीन : दाखला
जमिनीचे मूळ मालक : जयन्ता५२
आमच्या आधीचे कुळवाडी : केशवसुमार (पाहा चावला)

वीट - २

प्रेरणास्रोत : मिलिंद फणसे यांनी आणलेला वीट

रुदनभरल्या शायरीला मागणीचा पेच येथे
अन् विडंबन चाळण्याला होत रस्सीखेच येथे

रोजचा छळवाद यांच्या रोजच्या भडिमार गझला
वाचताना लागते मज नेहमीची ठेच येथे

मी कधीचा बेवड्यासम सोम-प्याले पीत आहे
का तरीही वारुणीचे डोह भरलेलेच येथे?

यत्न मी आजन्म केला माणसांशी बोलण्याचा
ते कधी बोलू न शकले, ते सुद्धा नवरेच येथे

मयसभा ही अप्सरांची, काय त्यांचे रूप सांगू
चेहरे एकाहुनी ते एकसे दिलखेच येथे

शेर तो घेऊन आला हे तुझ्या आहे भल्याचे
त्यातले काव्यांश पुरते 'खोडसाळा' ठेच येथे

कळेना

आमची प्रेरणा - पुलस्ति यांची गझल कळेना

मुलांना कसे वाढवावे कळेना
कशाने तयां झोडपावे कळेना

ज़नाना पहा सर्व बुरख्यात आहे
सख्यांना कसे ओळखावे कळेना

नको माहिती ही, नको अज्ञ सल्ले
कुणाला कधी गप्प व्हावे कळेना

किती टिप्पणे अन्‌ किती तज्ञ हल्ले
कुणाला कसे तोंड द्यावे कळेना

विजेवीण उत्सव करू साजरा हा
कपातीस का त्या डरावे कळेना

विचारी उमा,"सांग ना चंद्रमौळी
तुला वश कसे मी करावे कळेना"

बरी जीन्स्‌ अंगी, बरी की बिकीनी
कसे शेवटी मॉड व्हावे - कळेना

पुन्हा आणले शेर तू खोडसाळा
किती वाचकांना छळावे कळेना ?

सांगणे

आमचे प्रेरणास्थान - संपदा यांचे चांदणे

सिगरेट फुंकली मी, हुक्क्यास ओढले मी
धूरास आज साऱ्या छातीत कोंडले मी

भांडण कसे करावे अन्‌ वाद मी स्वत:शी?
नाते अता पतीशी म्हणुनीच जोडले मी

वैराग्य झूल घाली अनुराग सांड लुब्रा
संसार-जोखडाला त्यालाच जोडले मी

खाऊन घट्ट झाली यांची तुमान जेव्हा
शिंप्याकडून काही टाक्यांस सोडले मी

येईल राजपुत्र, जपली उरात स्वप्ने
आलास तू कपाळी, भाग्यास खोडले मी

लिहिलेस तू कवाफ़ी ते खोडसाळ होते
भिंतीवरी शिराला वाचून फोडले मी

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds