(पोच)

प्रेरणा : "पोच"

वाचण्याचा त्रासही घेतोच आहे
अन्‌ तुझे वाचूनही जगतोच आहे

दीप विझले सर्व खोलीतील, सखये
अंतरे का घन तमी? मी 'घो'च आहे

चुंबनाचा नूर काही और आहे
हाय, अधरांच्या ठिकाणी चोच आहे!

का तुझ्या नजरेत ओळखही नसावी ?
नासिकेवर जाड चष्मा तोच आहे

गारुडी कित्याक आले आणि गेले?
मल्लिकेचा "हिस्स" तर पडतोच आहे

शेवटी शृंगारही गपगार झाला
केवढा वातानुकूलित कोच आहे!

केवढी शृंगारली कविता कवीने
खोडसाळाला कुठे पण पोच आहे ?

डॉ.कैलास गायकवाड यांच्या "वाटतो जरी प्रसन्न मी वरुन" या गझलेने प्रेरित होऊन...

वाटतो जरी प्रसन्न मी वरुन,
दु:ख साचलेय आयकर भरुन

झाकले उघड कसे करायचे?
"सीनची गरज" असे जगा म्हणुन !

पाहिली असंख्य सौख्यसाधने
मी घरी बसून दुर्बिणीमधुन  

धूम्र वात सोडतो उरातले
नि तसाच खोकतो पुन्हा भरुन

ढोसणेच ज्ञात जाहले मला
जीवनात तर्र मी असे पिउन

डास चावले.......... मलेरियासवे
घाम का फुटे उगाच दरदरुन?

लग्न-ताप काय जाणल्यावरी
दु:ख जाहले मुलास "हो" म्हणुन

बाळ व्हायची अवेळ जाहली
खूप पाहिले स्वत:स आवरुन 

--खोडसाळ

(बेफिकीर)

प्रेरणा : डॉ. कैलास गायकवाड यांची कसीदासदृश रचना 'बेफिकीर'.

कधी न करितो उशीर तू; बेफिकीर मित्रा ?
कसे म्हणावे अम्ही तुला वक्तशीर मित्रा ?

तुझे कवाफ़ीत संपले तास चार आता 
कशास त्यावर अलामतीची जिकीर मित्रा ?

तुझी गझल वा तुझी द्विपदी किती अवास्तव
कशास माबोवरील केले शिबीर मित्रा ?

सुडौल पुरुषात, सांग, गणना कशी करावी ?
तुपास खाऊन देह करितो फुगीर मित्रा

गुमान काढून ठेवले जात काप ज्याचे
असा मटण-कोंबडीतला तू पनीर मित्रा

तुझे नि माझे घनिष्ट नाते विडंबनाचे
कशास "खोड्या" जगी असेस्तव फिकीर मित्रा ?

प्रेरणा : "गजला घरात माझ्या"

गझला पुराप्रमाणे घुसल्या घरात माझ्या
पडला उजेड नसता; कानात वात माझ्या

कानास छेदणार्‍या बारा बघून गझला
त्यांनी मला विनविले गाण्या मनात माझ्या

उद्रेक वाचकांचा होताच त्या क्षणाला
'कंडम' म्हणून गझला नाकारतात माझ्या

रोटीसवे कलेजी खातात दोस्त जेव्हा
का वाढतेस पानी तू दूध-भात माझ्या

मुजरा बघावयाला जाणे पसंत नाही
आणेन नर्तकींना मी हापिसात माझ्या

गझलेमुळे पळाल्या कित्येक प्रेमिका मम
हातावरी तुरी त्या का ठेवतात माझ्या ?

निष्प्राण जीव झाला, झाले अचेत श्रोते
गझला म्हणीत होते बहुधा ज्वरात माझ्या

का? का? असा मुलींचा लागून ध्यास आहे ?
दुसरी घरात आहे, पहिली क्लबात माझ्या

आले उधाण मजला तेव्हा कुणी म्हणाले
का त्याच त्याच गझला रुतल्या घशात माझ्या ?

गझला कशा लिहाव्या सांगेल कोण ठरवा ?
निघतील खास गझला अवसायनात माझ्या

ही "खोडसाळ" आहे इच्छा, मिळोत गझला
बघताक्षणी विडंबन फुलु दे मनात माझ्या

प्रेरणेचा स्रोत : मिल्याची मस्त गझल "अंतरातली व्यथा अंतरी जपायची"

भेट आपली अशी 'वाद'ळी असायची
आत, बाह्य अंगभर...खोल जखम व्हायची

भार केव्हढा तुझा ... श्वास चोंदवीलसा 
देह कोसळायचा अन मिठी सुटायची

भांडण्यास तू मला... मी तुला असायचो
रात्रभर तुझ्यामधे झांटिपी शिरायची

ह्या तिच्या जुन्या त्रुटी... रोज स्नान टाळते
श्वास रोख! अन्यथा... नासिका जळायची

दाखवू नकोस तू सौष्ठवास सारखे
प्रेरणा मिळायची... 'काम'ना करायची

दिवस पाहिले असे... की खरे लिहायचे
सलिल मास्तरासही चाल मग सुचायची

एक नीळकंठ तर पार्वती, सतीमधे
दोन बायकांतली मत्सरी जपायची

मी अखेर जाणले मर्म यौवना तुझे
लक्ष्य ओळखायचे... सावजे टिपायची

एक हेच साकडे खोडसाळ घातले
सोड शेवटी तरी लालसा लिहायची

उतारे

मी बोललो न काही, तू बोलतेस सारे
ह्यालाच नवयुगाचे म्हणतात काय वारे ?

विसरू कसा, प्रिये, मी मधुचंद्र आपला तो
येतो अजून काटा, येती किती शहारे

वाटायचे, करावे तू गप्प चुंबनांनी
तू ऐकवीत बसली गीतेतले उतारे

चाले सरस्वतीचे नर्तन तुझ्या जिभेवर
अन् शब्द संपल्यावर नुसतेच हातवारे

मी नेत्रपल्लवीने 'विषया'स छेडल्यावर
बघसी वटारुनी तू संतप्त नेत्र घारे

पाणी दुज्या तळ्यांचे चाखवयास जावे
तर ठेवतेस कायम माझ्यावरी पहारे

दिसतील काय, देवा, मजला दिवस असेही
'खोड्या' तिच्या 'अरे'ला जेव्हा करेल 'का रे' ?

(ठिगळ)

प्रेरणेचे उगमस्थान : मिलिंद फणसे यांची गज़ल "ठिगळ"

इतके कुणी कुणाच्या जावे जवळ कशाला
लगटून झोंबण्याला कारण सबळ कशाला

चोरून पाहण्याची संधी पुन्हा उद्याही
की-होल शोधण्याची ही धावपळ कशाला

खड्ड्यात चाक रुतणे चुकते इथे कुणाला
प्रारब्ध पावसाळी ठरते अटळ कशाला

सारी पिऊन झाली, उरली न औषधाला
मी अन्यथा कुणाशी बोलू बरळ कशाला

पत्नी-समीप सारे असतात रोज राती
मी एकटाच राहू आईजवळ कशाला

कोणी लिहोत काही, बसणार स्वस्थ आता
दिसताच काव्य, खोड्या, ढवळाढवळ कशाला

(अखेर!)

आमची प्रेरणा : प्रदीप कुलकर्णी यांची गजल अखेर!

........................................
(अखेर!)
........................................

हात आताशा तुला आलो कुठे लावून मी?
क्लांत झालो शेवटी नुसताच न्याहाळून मी!

कोण जाणे झापते का सारखी पत्नी मला
दाखवावे शौर्य; अंधारात वेडावून मी!

बांधुनी ठेवायचे पदरी असे त्याला किती?
...दावणीला ठेवला मग दादला बांधून मी!

खायचे किंवा कसे; ठरवायचे आहेस तू...
ठेवले आहे शिळे तुज कालचे वाढून मी!

ओळखू येती न आता गाल माझेही मला
घेतले आहे किती रस्त्यात थोबाडून मी!

आणतो जोशात प्राणी एवढासा कंद हा
पाहिल्या कंदर्पपाकाच्या वड्या खाऊन मी!

वारसा माझा पुढे नेला कुणी हा? कोण हा?
वाचतो आहे असा कोणास कंटाळून मी?

राहिला नाही कवीचा अर्थ आता एकही...
शब्द त्याचे टाकले आहेत उलथावून मी!

एवढेही भक्ष कोणीही मला देऊ नये...
लेखना टाकीन सार्‍यांच्याच फस्तावून मी!

- खोडसाळ
................................................
पुनर्रचनाकाल : ८ ऑगस्ट २०१०
................................................

प्रेरणा : आमचे परम-मित्र काव्यानिरुद्ध तथा अनिरुद्ध१९६९ ह्यांची गज़ल "हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा" .

माबो, मिपा, मनोगताचा दोष असावा 
शब्दस्फितीचा भस्मासुर इतका वाढावा ?

कधीतरी हातांची भाषा मला कळावी
कधीतरी मुस्कटातला लाफा उमजावा

भात-वरण ह्या दोन वितीच्या पोटी मणभर
भरल्यावर आमांश कसा सांगा चुकवावा ?

युगे बदलली काळ बदलला कार्तिकस्वामी
एक आयडी शादी डॉट कॉमवर उघडावा

किती खोल मी अजून जावे कर्णी माझ्या
कधीतरी मळ मला अता हाती लागावा

उगाच चर्चा मी तेव्हा केली पत्नीशी
"चुकले तुमचे", रोजचाच निष्कर्ष निघावा

अता एकदा संपावी काव्याची दैना
खोडसाळ हा शब्दांचा दंगा थांबावा

आमचे प्रेरणास्थान : चित्त यांची अप्रतिम गझल "कोणत्या चिमटीत मी त्याला धरू ?"

कोणत्या नाक्यावरी त्याला धरू ?
हिंडते गल्लीत जे फुलपाखरू

तू अता बघशील वाता - हत खरी
लागले पाणी-पुरीने डरडरू

गायही तेव्हाच गोठा सोडते
लांबुनी जर बैल लागे हंबरू

खुणवती सार्‍या पुरातन 'ओळखी'
पाहुनी लागे नवी ही कुरकुरू

सुळसुळाया लागली झुरळे किती !
केवढी दिसतात, चल कल्ला करू

चालवू माझे विडंबन - हल किती ?
केवढे लिहितात हे कविकुलगुरू

---------कलम १ -----------------

खूप पल्लेदार आहे माल पण
वाचताना श्वास लागे घरघरू

आपल्या दोघांमधे कोणी नको
ये मिशी कापू, जरा वस्त्रा धरू

ढापण्यांनी रूप आहे देखले
यंग कुठले सांग आहे पाखरू ?

ओठ, बांधा, केस, बाहू अन्‌ कटी
(हे धरू की ते धरू की ते धरू)


१. मराठीत किंवा - नाही, फक्त मराठीतच - विडंबकाला एखादे विडंबन (कितीही ओळींचे) करायचे असते तेव्हा त्या ओळींच्या वर किंवा मध्ये किंवा दोन ओळींच्या मधल्या मोकळ्या जागेत किंवा जिथे जागा मिळेल तिथे   हे चिन्ह ठेवून खालील ओळी ह्या विनोदी समजाव्यात, असा विडंबक निर्देश करतो. मराठी विडंबनात ही पद्धत न राबवल्यास विडंबकाची लेखणी कलम केली जात असल्यामुळे मला कलम हा शब्द किंवा क हे अक्षर प्रस्तुत वाटते. कलम ह्या शब्दाचा एक अर्थ तुकडा करणे किंवा पाडणे. आणि दुसरा अर्थ परिच्छेद किंवा विशिष्ट आयटम ('तसला' आयटम नाही हो!) असाही आहे.  (ह्याबाबतीत मार्गदर्शन केल्याबद्दल मी उर्दू-फारशीचे माझे जाणकार मित्र श्री. चित्त ह्यांचा अत्यंत आभारी आहे. )     

प्रेरणा : जयन्ता५२ यांची गझल "माझ्या तुझ्यात काही, काही असे घडावे"

माझ्या तुझ्यात काही, काही असे घडावे
सांगू नये जगाला, चुपचाप निस्तरावे

पंचांग म्हणत कुठले की आजची अमावस ?
'दाते' न 'कालनिर्णय', बहुधा 'टिळक' असावे

आडून चौकशी का होते जनांकडूनी
इतक्यात सर्व लफडे त्यांच्या पुढ्यात यावे ?

अफवा कशा पसरल्या गावात जाणतो मी
बघुनी मुले तुझे ते रेंगाळणे असावे

माझ्याच बायकोची ही काय राजनीती ?
सोडून कक्ष माझा मजलाच घालवावे

"माझ्याच कुंकवाची ही काय कार्यरीती ?
संघात दक्ष आणिक कक्षात सुस्त व्हावे"

-----------------------------------

खोडसाळ

आमची प्रेरणा : अनिरुद्ध१९६९ यांची सुंदर गझल "आज अचानक तुझी आठवण का यावी"

आज अचानक तुझी आठवण का यावी
विजार सारी ओली माझी का व्हावी ?

भात, डाळ या गोष्टी का झाल्या नाही
पुर्‍या लाटल्या असतील, चटणी वाटावी

जुन्या वहीची पीत वेष्टनातिल पाने
अकस्मात पत्नीने येउन उघडावी

बरेच काही घडले ह्या मधल्या काळी
तुझी निशाणी जगा कशी मी दावावी ?

अर्थ उतरण्या शब्दांमध्ये घाबरले
भीती इतकी कवड्याची का वाटावी ?

तुझ्याच साठी शिकलो मौनाची भाषा
किती मुक्याने परंतु कटकट सोसावी ?

हिशोब केला तुवा दिलेल्या पोरांचा
समजत नाही कुठे पौर्णिमा मांडावी

पुन्हा तोच तो ऊस उगावा कवितेचा
पुन्हा त्याच चरकातुन यमके काढावी

गझल पाडणे अशक्य आहे थांबवणे
तरी वाटते तुला उपरतीही व्हावी

मनात आहे खोडसाळ दडला माझ्या
आज उडी अनिरुद्ध कवींवर मारावी

प्रेरणा : कोहम्‌ ह्यांची कविता "प्रेरणे, देऊ तुला चावी कशी ?"

प्रेरणेला, सांग, पटवावी कशी ?
टांग त्या कवितेस मी द्यावी कशी ?

स्वच्छ कागद नासतो बाळापरी
अक्षरांची धिंड काढावी कशी ?

आदळी जर हिमनगावर कल्पना
शब्दटायटॅनीक वाचावी कशी ?

काय ह्या अवजड विचारांचे करू ?
लेखनाची सूज उतरावी कशी ?

चालवूही शब्दवरवंटा अम्ही
काव्यचटणी फार वाटावी कशी ?

आतला लेखक असे जर संपला
वाचकांनी वाहवा द्यावी कशी ?

खोडसाळा, बेकरीला ये जरा
पाव, खारी त्याविना खावी कशी

आबाद

प्रेरणा :  'बहर' यांची मनोगतावर पदार्पणात "नाबाद" खेळी.

महाजालावर हा माझा पहिलाच प्रयत्न नाही. कृपया काही चुकल्यास टीकेचे दगड मारावेत.

रात्र होती.. नेहमीचा वाद होता
शांतता कसली, तुझा उच्छाद होता..

चोंदले होते तुझे की नाक माझे ?
एवढ्या साठीच का हा वाद होता?

केस होते, खोवलेले फूल होते..
शेपटा माझा कधी आपाद होता

लाच द्यावी लागली मज चुंबनाची
लाच देण्याचा मलाही नाद होता..

भूत हा खोड्या असावा पिंपळाचा
वारला होता तरी आबाद होता !

(डोळे)

मृण्मयीताईंचे "डोळे" इतके जुल्मी की रोखुनी पाहताच आम्हालाही डोळे आले. "(डोळ्यांत) वाच माझ्या तू गीत भावनांचे" असे आमच्या मनीचे मनोगत ग. दि. माडगुळकर आधीच लिहून गेलेत.  (अण्णा, उत्तम ते सगळं तुम्ही लिहून गेलात आणि आमच्या वाट्याला ही विडंबनं आली.  )

जालावरती शिकार करणे शिकू लागले डोळे
कवीकुळाचे मज खाऊ की गिळू लागले डोळे

सलज्ज झुकणे ताकाला जाउनी लपवणे भांडे
उघड उघड बरणीला आता भिडू लागले डोळे

नको नको ते खूप वाचले, अधू जाहले डोळे
मोतीबिंदू झाला, आता पिकू लागले डोळे

सही गुलाबी गालांची अन्‌ रूपरंग देखणे
तिला पाहता पटकन डावे मिटू लागले डोळे

मुक्ताई वा जनी नव्हे मी, शीघ्रकवी खोड्या मी
काव्य पाहुनी लगेच हे शिवशिवू लागले डोळे   

वि(चित्र)

या खोडीची गंगोत्री : मिलिंद फणसे यांनी चितारलेले चित्र.

सुमार झाली काव्यावस्था, पसार वाचक झाले
कवीस नाही गणती, हतबल किती प्रकाशक झाले

उगा, उगा नवकवितेची तू कितीक कवने रचली
हुरूप आला कवड्यांनाही, किती विडंबक झाले

महाग झाला आहे वाचक अशी वदंता आहे
सरस्वतीपूजक होते, लेखकू प्रचारक झाले

नव्या पहा त्यांच्या कविताही शिळ्याच धरतीवरती
जुनीच सारी जाती-वृत्ते दळून लेखक झाले

कशी कधी येथे कंपू-मंडळी जमवली आम्ही ?
कसे टिकाकारांचे जत्थे असे अहिंसक झाले ?

अशा कुणाच्याही चित्राच्या नकोस खोड्या काढू
तुझे विडंबन कित्येकांना अपायकारक झाले

(फांदी)

आमचा प्रेरणास्रोत : प्रदीप कुलकर्णींची सुंदर गझल "फांदी".


मस्त शब्दांची सुरू आहे लगोरी !
त्यावरी हे काव्य खोड्याचे अघोरी !

केवढी पोरे तिथे ही चाललेली...
देखण्या आहेत की नाहीत पोरी ?   ;)

वाचता अक्षर मला एकेक आले...
तू मला लिहिलीस पत्रे पाठकोरी !

मी तुझी केलीच आहे ना टवाळी ?
तू तरी केलीस का ही शब्दखोरी ?

वाचली कविता तुझी एकेक जेव्हा...
जागला माझ्यातला लेखक टपोरी ! 

रांग कार्ट्यांची तशी ही ओळखीची...
पोरगे माझे-तुझे, अपुल्याच पोरी !

बोच शब्दांची तुला ही ओळखीची...
पाहता गांभीर्य, मज सुचते छचोरी !

काजवे का एवढे चमकून गेले ?
बाधली ना शेवटी तुज भांडखोरी ? 

मी तुझ्या खाण्यास कंटाळून गेलो...
हा वडा कितवा, तुझी कितवी कचोरी ?

पँटच्या बाहेर आली एक मांडी...
ही खिसेकापू कला आहे अघोरी

आणखी एक अभंग

( आमची प्रेरणा ..प्रसाद गोडबोले यांचा  "एक अभंग" .... आणि संदर्भ  विडंबन विषयक नवीन धोरण   ...
   कोणावरही वक्र टीका करण्याचा हेतू नाही , दुखावले गेल्यास माफी करावी )

नको 'खोड'दासा खोड्याला झोडपू
कानाला खडा मी लावलाहे

कोंबड्यांनी आता व्हावे चिंतामुक्त
उपरती जाहली मजला, देवाऽ

तुज हे न ठावं दिसे 'खोड'दासा
बुवा असे खोड्या, नाही बाई

वैतागू नकोसऽ  असा खोडदासऽ
घेई खोडसाळास हृदयात

---------------------- 'जंत' खोडसाळ

( अवघड शब्दांचे अर्थ : लावलाहे - लावला आहे, उपरती -  रतीची धाकती बहीण व सवत, मजला - खोडसाळाचा वरचा व कायम रिकामा असणारा अवयव)

मनोगतावर विडंबने प्रकाशित करण्याविषयी प्रशासकीय धोरणात मूलभूत फेरफार झालेला दिसतो आहे. आज मी एक विडंबन प्रकाशित केल्यावर त्यास १३ मिनिटांत प्रशासकांचा पुढील प्रतिसाद आला :

"मूळ लेखन प्रकाशित झाल्यावर दोन दिवस होऊन जाणे किंवा त्यावर किमान पाच प्रतिसाद येणे ह्यातले जे आधी होईल तोपर्यंत त्या लेखनावर विडंबन प्रकाशित करण्याचे थांबावे."

त्यानंतर काही मिनिटांत विडंबन प्रतिसादासहित अप्रकाशित करण्यात आले. या धोरणात्मक बदलाची माहिती मनोगतावरील इतर विडंबकांना असावी व असा प्रसंग त्यांच्यावर अनवधानाने येऊ नये यासाठी हा पत्रप्रपंच.
इतक्या वर्षांनंतर अचानक मनोगतच्या प्रशासकांनाही इतर काही संकेतस्थळांप्रमाणे विडंबनाची ऍलर्जी निर्माण व्हावी ह्याचे वैषम्य वाटते. असो. "तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे"...

(मारला गेलो)

आमची प्रेरणा : कैलास गायकवाड यांची गझल 'मारला गेलो'

परळला जायचे होते तिथे मी खारला गेलो

बसायाचे जिथे होते तिथे मी मारला गेलो


जिणे संपायला आले तरी ना बोहला चढलो

किती तरुणींकडोनी आजवर नाकारला गेलो


असा कवटाळुनी होतो दुज्यांच्या पट्टराण्यांना

दुपारी पाचला आलो, पहाटे चारला गेलो


गबाळ्यासारखा होतो परी पोरीस पटवाया

न होतो हॉट मी , कैसा तरी शृंगारला गेलो


अलभ्यच लाभ मी वदलो जरी आल्या श्वशूराला

तरीही बायकोकडुनी सदा फटकारला गेलो


तसा गोंडस नसे 'खोड्या' तरी मिष्किल स्वभावाने

किती 'केल्यात' मी कविता तरी गोंजारलो गेलो

प्रेरणा : "मल्मली तारूण्य माझे तू पहाटे पांघरावे"

वल्कली वार्धक्य माझे तू कशाला पांघरावे?
मोजक्या केसात माझ्या का जिवाला गुंतवावे?

लागुनी  थंडी गुलाबी, शिरशिरी आली तरीही
घेउनी ब्लॅंकेट तू अन्‌ मी दुल‍इमाजी निजावे

कापर्‍या माझ्या तनूची तार झंकारू न द्यावी
जे समेवर येत नाही, गीत ते का आळवावे?

रे तुला रात्रीस माझ्या, लोळण्याने जाग यावी
मी तुला जागे करावे, अन्‌ स्वत: घोरत पडावे

(पंढरी)

आमचे प्रेरणास्रोत : मिल्या ह्यांची गझल पंढरी

वदंता वाटते आता.. कहाणी जी खरी होती
कधीकाळी इथे प्रत्येक मुलगी लाजरी होती

तुझे बॅंकेतले खाते जरासे वेगळे होते
रिती होती तिजोरी.. नोटही प्रॉमीसरी होती

सखे, नव्हताच चिमटा काढला मी खाच-खळग्यांचा
तुझ्या अंगातली कुर्तीच थोडी चावरी होती

तिच्या श्वासातले आव्हान इतके दरवळत होते
जणू नुकतीच लसणीयुक्त खाल्ली काचरी होती

म्हणे मारेल ती झुरळास ऐसे ऐकले होते
उडाली उंच सोफ्यावर... मनाने घाबरी होती

कधी यावे, कधी जावे, कधी कॅंटीन गाठावे
अरे, सरकार-दरबारातली ती नोकरी होती

तिला सांगूनही कळलाच नाही अर्थ प्रीतीचा
उफाड्याची तरी.. ती पोर अल्लड परकरी होती

कधी कवितेस 'खोड्या' भेटला का रिक्त हातांनी ?
तिच्यावर चालवाया सज्ज लेखन-कातरी होती

आमची प्रेरणा : 'बेफिकीर' यांची गझल  "केवढे चालणे हे मजल दरमजल..."

कैकदा वाचली पण सुटेना पझल...
काय जाणे असे ही गज़ल की गझल

मी कितीदातरी शीळ घालायचो
अन कपोलावरी व्हायचे मग बदल

मी कितीदा तिला शीळ घालायचो
बोलली, "लै महागात तुजला पडल"

घातली झेप तू ही गझल पाहता
का अशी नित्य करतोस माझी नकल ?

खूप थैमान पार्लरमध्ये घातले
पाहण्यासारखी पण न माझी शकल

घाल मागून पोनी... मरो स्टेपकट
काढ आधी उवा आणि गुंते उकल

कंठ शुष्कावल्यासारखा वाटता
पेग थोडे घशाखालती तू ढकल

खवचटासारखी लेखणी बोलते
सोड नाठाळपण, खोडसाळा, बदल...

(रात्र)

प्रेरणा : रात्र

सुमनांचा दररोज ऐकला नकार रात्रीने
लाइन मारुन पाहिली जरी चिकार रात्रीने

नुकती कोठे नार लाजरी धिटावली होती
केली हातोहात कामिनी पसार रात्रीने

उरली नाही भीड, रास्कला, तुझी तिला आता
लढण्या रजनीकांत घेतला उधार रात्रीने

नाही औदासीन्य तीस अन् मुळी न कंटाळा
रुचिपालटण्या फिल्म बदलली त्रिवार रात्रीने

अविरत मागोमाग फिरतसे किती मुलांच्या ती
खोड्या, तुजला मात्र कळवला नकार रात्रीने 

मूळ जमीन : तात गेले, माय गेली  (अण्णा, बालकास क्षमा करा.)

तात, सांगा, सांग आई, राहिले मी पोर का?
आठवा, आहे तुम्हाला एक उपवर कन्यका

ऐन ज्वानीची उभारी, हाय, मजला जाचते
अन् मदाचा भार कोमल काय माझी सोसते
लग्न करणे शीघ्र माझे हे नसावे शक्य का ?

लोकरीती हेच सांगे - थोरली उजवा झणी
सान ती उंडारते का, मी घरी का बैसुनी ?
दान करता धाकटीचे थोरली आधीच का ?

घेतला मी वेष मुलिचा, सोडला गणवेश तो
शोभते साडी, बिकीनी, काय माझा दोष तो ?
एव्हढा कमनीय बांधा, आणि म्हणता बालिका ?

कन्यका ही ठेविता का दावणीला बांधुनी ?
नोकरी करवून घेता गाय दुभती मानुनी
एकताची ही तुम्हाला वाटली का मालिका ?

जावयाची चरणचिह्ने येऊ द्या अपुल्या घरी
लाज-लज्जा सोडुनी वा जाउ मी कोठे तरी
सासराचे गाव कुठले, कोणता अन् तालुका ?

घालवीते काळ, नाथा, वरुन तुम्ही नेइतो
मोजिते संवत्सरे मी लग्न अपुले होईतो
नांदते स्वप्नात, होते रमणि आणिक सूतिका

सांगुनी वेळी न आले पाहण्या जर आज ते
उघड, आई, पान पुढचे, नाव पुढचे वाच ते
ही पहा उपवर मुलांची आणली मी पुस्तिका

आमची प्रेरणा : जयश्री अंबासकर यांची गजल ...... पुन्हा पुन्हा!

दावतेच त्या मुला, ठोकते पुन्हा पुन्हा
चोरुनी बघू नये, शिकवते पुन्हा पुन्हा

चांदणी कधी अशा पोरट्यास भाळते?
'तो' अमेरिकेतला शोधते पुन्हा पुन्हा

कासवे न पाळली मी कधीच पांगळी
रेस मी तयांसवे हारते पुन्हा पुन्हा

मान ही जुनीच, शिरही जुनेच आमचे
नाक तेच, पण तरी चोंदते पुन्हा पुन्हा

हां...कबुल उन्मनी चाळिशीत लाभली
वळुन पण विशीकडे पाहते पुन्हा पुन्हा 

हात जोडुनी उभा खोडसाळ मजपुढे
काव्य मम वहीत मी लपवते पुन्हा पुन्हा

खोडसाळ 

चॉइस

प्रेरणा : पाऊस

तू आणि मी...
बघत होतो लग्नाचं...
पण तुझा चॉइस वेगळा होता,
नि माझाही चॉइस वेगळाच ....
चॉइस करताना विवाह-मंडळातून
नाना छायाचित्रं दाखवत होते...
अन तुझा बायोडेटा बघून,
चॉइस तसा मर्यादित,
ठरून जात होता,
खरं सांगता .........

प्रेरणेचे मूळ स्रोत : सोनालीताई जोशी यांची गजल उधाणाच्या मिषाने ही किती झाडे बहकलेली

तुला बोलावतो जेव्हा, उगा करतेस बोभाटा
तुझ्या माझ्यामधे आहे किती अंतर, किती खाटा...

तुझ्या माझ्या कधी झाल्या कुठे गप्पा जिव्हाळ्याच्या ?
जराशी ऊब घेउन का असा केला मला टाटा?

मुलींना त्रास मी नाही दिला ना छेडले त्यांना
कशाला दंश मज केला? कशाला मारला बाटा?

जरा ऐकून तर घे ना म्हणे म्हणणे कुणाचे तू....
(तसे करण्यास माझा सांग आहे ढील का आटा ?)

चुकूनच काल झाल्या एक अपुल्या वेगळ्या वाटा
समर्थांसम मला होता जरी फोडायचा फाटा

उधाणाच्या मिषाने तू किती द्वाडे बहरलेली.............
तुझा सुदृढ बांधा काल होता छान शेलाटा !


        ~खोडसाळ

ज.के.उपाध्ये लिखित "विसरशील खास मला" हे मराठी भावगीतांच्या सुवर्णकाळातील एक गाजलेले गाणे. (इथे उपलब्ध). विरहकाळात प्रियकर इतरत्र गुंतून आपल्याला विसरून जाईल ही प्रेयसीची भीती कालातीत असली तरी गीताची भाषा आजच्या संगणकीय, विश्वजालीय युगात कालबाह्य वाटते. संगणक क्षेत्रात जशी प्रत्येक सॉफ्टवेअर, ग्राहकाची इच्छा व गरज असो वा नसो, सतत अद्ययावत, चुकलो, अपडेट, केली जाते त्याप्रमाणे हे सुंदर गाणेही 'अपडेट' करण्याची आम्हास खोडसाळ लहर आल्यामुळे पुढील पंक्तिप्रपंच. तेच प्रेम, तेच प्रियकर-प्रेयसी, तोच विरह, तेच अधिकृत अभ्यासक्रमाबाहेरील 'विषय', तीच भीड. केवळ रूपकं आधुनिक. तेव्हा सादर आहे 'विसरशील खास मला_ver.2', अर्थात "ट्विटरशीलही न मला"  :

ट्विटरशीलही न मला रेषेआड* होता
पिंगा ह्या ऑर्कुटवर देशि जरी आता**

रेषेआड झाल्यावर सृष्टिही निराळी
मैत्रिणिही विविध, प्रणय-विषय भोवताली
गुंतता तयात कुठे, पिंग आठवीता

स्वैर तू अनंग, विश्वजाल विहरणारा
वशहि वशीकरण तुला गुगल, याहुद्वारा
पिंगशील केव्हा मज कॉन्फ-चॅट करता

वॉल आणि स्क्रॅप तुला दाखवू कशी मी
वेबकॅम चॅटनेच पिंगपूर्तता ही
याकरता रेषेआड होऊ नको नाथा

* : offline
** : ऑर्कुटवरून फेस्बुकवर बढती घेतलेल्यांनी ही ओळ
'पोका ह्या फेस्बुकवर करशि जरी आता'
अशी वाचावी ही नम्र विनंती.

मूळ जमीन : मातीची दर्पोक्ती
(तात्यासाहेब, क्षमा कराल अशी आशा करतो. )

घनघोर मार्चचा पाहुनिया यरएंड
त्या तृषार्त शास्त्यांच्या हाताला कंड
उन्माद तया, अफवांचे पीक सभोती
थरथरा कापणे करदात्यांच्या हाती

ते मत्त बाबुगण गाउ लागले गीत
कोलाहल घुमला चहूकडे देशात -

करपात्र नागरिक ! आम्हाला अवमानी !
बेनामी खाती उघडुन बँकांमधुनी
त्या मूढ जनांना नच जाणीव अजूनी
आम्हांस शेवटी सर्व माहिती मिळती
लोकांवर चढणे खूप नवे कर अंती !

किमतीस भिडूद्या गगनाला गर्वात
ठाकुद्या महागाई दारी उन्मत्त
पोरटी असूद्या तुमची भूक्त, अशक्त
हो, तरिही घालू धाडी अर्ध्या राती
लोकांवर चढणे खूप नवे कर अंती !

पाहतो स्वतःचे अम्ही रूप सर्पात
'स्कृटिनि'त ओढतो सावजास विळख्यात
निर्दोष मांडुद्या शब्दांचा आकान्त
लावतो 'पेनल्टी', व्याजही अन् त्यावरती
लोकांवर चढणे खूप नवे कर अंती !

कित्येक बिलंदर कर चुकवुनिया गेले
कित्येक फॅक्टरीवाले जरी निसटले
कित्येक कागदी तोटा दावून गेले
स्मृति मात्र आमची दीर्घ नि तल्लख होती
लोकांवर चढणे खूप नवे कर अंती !

पाहून हसू ये विवरणपत्र धमाल
अन् खर्च किती तो ! आय किती लपवाल ?
शेकडो अकाउंटन्ट आणिक लाख दलाल
होतात सर्वथा लीन आमुच्या भेटी
लोकांवर चढणे खूप नवे कर अंती !

धनवंत असूद्या, असुद्या दीन भिकारी
आम्हास असूद्या खाबू, भ्रष्टाचारी
समसमा वागतो सर्वांशी अधिकारी
'खात्या'त आमुच्या कसली नीति-अनीती
लोकांवर चढणे खूप नवे कर अंती !

'बारा'त नेउनी कराल इच्छापूर्ती
कमनीय कामिन्या चित्त प्रफुल्लित करती
लाभेल तयांची अन् कनकाची प्रीती
ते तपास, 'क्वेरी',  मिटवू होता तृप्ती
लोकांवर चढणे खूप नवे कर अंती !

ह्या क्षुद्र फाइली, कोण करी निर्माण ?
बेताल नाचवी, सूत्रधार हा कोण ?
'अर्था'तच आयकर अधिकारी रममाण
स्वामित्व जगाचे अखेर अमुच्या हाती
लोकांवर चढणे खूप नवे कर अंती !

एका नटीची पत्रकाराकडे तक्रार. स्फूर्तिस्थान - सुरावटीवर तुझ्या उमटती


मुलाखतीतुन तुझ्या प्रकटती, अचुक कुणाला केव्हा पटले
नकोस छापू अशा बातम्या, तुझ्यामुळे, रे, जगा समजले
तुझ्यामुळे, रे, जगा समजले

कैक रात्री मी धुंद जागले, आई-बाबा होते निजले
जागरणाचे ठिकाण, कारण, तुझ्यामुळे, रे, जगा समजले

तीन दिवस मी ’लेट’ जाहले, कितिदा तरि मी मोजुन थकले
’उशिरा’मागिल भाव अनामिक, तुझ्यामुळे, रे, जगा समजले

तुला कळाली येणी-जाणी, ’गूज’ खोलवर केव्हा रुजले
’ब्रेकिंग’ केली ’न्युज’ तयाची, तुझ्यामुळे, रे, जगा समजले

चित्रपटांचे क्षेत्र मनोहर, नवरी हो‌उन कितिदा सजले
मधुचंद्राच्या विवाह नंतर, तुझ्यामुळे, रे, जगा समजले

तुझ्या बातमीमुळेच माझे, नटी म्हणोनी भाव उतरले
तुझ्यामुळे, रे, जगा समजले


कविवर्य कुसुमाग्रजांची क्षमा मागून, "समिधाच सख्या या"  या त्यांच्या अप्रतिम कवितेवरून सुचलेल्या ओळी देण्याचे धार्ष्ट्य करीत आहे.

भ्रांतिष्ट कुणीसा कवी करी ही कविता
भेटते जिच्यातुनि त्याची जीवन-वनिता

तडतडे, बडबडे, मुके न दे, फेटाळे
कवी अखंड पाहे वाट प्रेरणेकरिता !

लडिवाळ कान्त तो ही सोडून निघाली
अन्‌ शोधित प्रियकर रानातून ढमाली
नच रम्य बांधणी, सुडौल अथवा घाट
तोंडावर तुरळक लव अंकुरुनी आली !

नव-कवितेच्या या फसव्या शब्दांखाली
ही कॉंग्रेस गवतापरि बहरली, व्याली
वाचे न कुणी, छापे न कुणी संपादक,
"या जळोत कविता -- यांस कुणी ना वाली !"

कविता न कराव्या; हट्ट अता सोडावा,
कोठून कथेपरि पैसा त्यात मिळावा ?
जात्याच भिकारी, एकच मज आकांक्षा,
ना मिळोत पैसे, क्षणभर व्हावी "वा, वा !"

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds