'अजब' ह्यांची गझल खूप सोसले आयुष्याचे बंधन मी वाचून सुचलेल्या काही ओळी :

खूप सोसले हे लग्नाचे बंधन मी
करीन म्हणतो दुज्या फुलांवर गुंजन मी

तिला पाहण्या तिच्या घरी गेलो जेव्हा
फक्त पाहिले तिचे बाह्य अवगुंठन मी

सहानुभूती तिच्या गोड चेहऱ्यास अन
कुरूप आहे म्हणून केवळ दुर्जन मी?

कुणा न ठावे वहाण लागे मला कुठे
उगाच का करतो आहे आक्रंदन मी?

तिच्या ठिकाणी बघतो स्वप्नी टंच नट्या
कधी बिपाशा, कधी रवीना टंडन मी

पित्त अताशा होते मजला कधी कधी
मळमळ करतो व्यक्त कुठेही पटकन मी

पाणावू व्यर्थ 'खोडसाळा' नको नयन
आवरली कायमची माझी भुणभुण मी

मायबोली ह्या अग्रगण्य मराठी संकेतस्थळावर गझलवैभव श्रीयुत वैभव जोशी ह्यांनी मायबोली गज़ल कार्यशाळा -1 आयोजित केली आहे. हे शुभकार्य हाती घेतल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांच्या या योजनेमुळे अनेक तरुण मराठी गझलेकडे आकृष्ट होतील, त्यांना मराठी गझल लेखन-वाचनाची गोडी लागेल, ताज्या दमाचे गझलकार मराठी सारस्वतास लाभतील ह्याविषयी आम्हांस तीळमात्र शंका नाही. त्यामुळे आम्ही अत्यंत आनंदात आहोत. अर्थात हे एकच कारण नाही हे मान्य करायलाच हवं. वैभव ह्यांनी लावलेल्या ह्या रोपट्यास एकदा गझलरूपी फळं येऊ लागली की आमचा कच्च्या मालाच्या तुटवड्याचा प्रश्न कायमचा निकालात निघेल हा स्वार्थी विचार मनात डोकावत नाही असं कसं म्हणू? कालच आम्ही आणि आमचे परममित्र केशवसुमार मनोगतवर घटत चाललेल्या गझलसंख्येविषयी चर्चा करीत होतो व ह्यामुळे होणाऱ्या आमच्या कुचंबणेचं दु:ख एक-एक पेग नेस्कॊफीत बुडवीत होतो (सूर्य अस्ताला गेला नसल्यामुळे आम्हाला दुधाची तहान ताकावर भागवावी लागली! सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.)आम्हास खात्री आहे की विडंबनाचे मनोगतावरील भीष्माचार्य माफीचा साक्षीदार हेही आमच्याशी सहमत असतील.

मायबोलीसारख्या संकेतस्थळावरील सुविद्य, सुसंस्कृत, साक्षेपी, प्रतिभावंत सदस्यांच्या मध्ये अस्मादिकांसारखा टपोरी लेखकु अजिबात शोभणार नाही ह्याची आम्हास पुरेपूर जाण असल्यामुळे तीव्र इच्छा असूनही आम्ही उपरोल्लेखित कार्यशाळेत भाग घेण्यापासून स्वत:ला रोखले आहे. ऋतू येत होते, ऋतू जात होते अशी पहिली ओळ गझलवैभवांनी कार्यशाळेत सहभाग घेणाऱ्यांसाठी दिलेली आहे. भाग घेत नसलो तरी त्यावरून आम्हास सुचलेल्या काही द्विपदी इथे देण्याचा मोह मात्र टाळवत नाही. आमच्या ह्या ब्लॊगझोपडीला चुकून कधी जर वैभवांचे पदकमल लागले तर त्यांनी इस्ला(दुरुस्ती) जरूर करावी ही नम्र विनंती.

ऋतू येत होते, ऋतू जात होते
निजे दुष्ट तो, मी ऋतुस्नात होते

सुगंधाळता मी तया होय पडसे
विवाहित जरी मी, अनाघ्रात होते

घरी बायको अन् सखी रंगसदनी*
असे षौक 'ह्यां'चे पिढीजात होते

असे काळ आता सख्या-साजणांचा
निघाले पती ते निकालात होते

नका ना, सख्यांनो, विचारू खुणांचे
कुठे ओठ होते, कुठे दात होते

निघाले तुला भेटण्या खोडसाळा
उभे नेमके 'हे'च दारात होते

* - खोडसाळाच्या कनिष्ठ मध्यमवर्गीय मनाची भरारी कविकल्पनेतही महालापर्यंत जाऊ शकत नसल्यामुळे रंगमहालाऐवजी रंगसदन!

पळुन मी गेलो जसा, आधी कधी पळलोच नाही
रामदासांच्या परी मी मागुती वळलोच नाही

जन्मभर पत्नीस माझ्या मी दिले नाना बहाणे
जायचे सवतीघरी पण मी कधी चुकलोच नाही

कैकदा कैफास माझ्या घेतले मी टीममध्ये
विश्वचषकालाच नेऊ, हाय, मी शकलोच नाही ।

रात्रभर माझी-स्मिताची बालके सांभाळली मी
शेवटी निजलो असा की मग पुन्हा उठलोच नाही ।

स्मरतही नाहीत आता चेहरे ते मैत्रिणींचे
एवढे स्मरते कधीही अडकुनी पडलोच नाही ।

वाटले चुंबन मिळावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत
दिसत होती रोज ती पण मी तिला दिसलोच नाही ।

सबब आहे खोडसाळा आंधळ्या कोशिंबिरीची
झोंबण्याचा एकही मोका कधी चुकलोच नाही ।

आमची प्रेरणा - कविवर्य सुरेश भट ह्यांची गझल 'जगत मी आलो असा की...'

आमची प्रेरणा - 'माफीचा साक्षीदार' ह्यांची कविता "परके झाले बाबांचे घर"


पडके झाले बाबांचे घर
सासरलाही लागे घरघर

सासू गेली, श्वशुर वारले
दीर-नणंदा जातिल लवकर

छप्पर गळके, उंदिर घरभर
सुस्त मांजरी गाभण त्यावर

दिवसा-रात्री ढोसून असतो
घोरत माझा पतिपरमेश्वर

जवळ कधी ना घेई मजला
ऐसा कसला माझा हा नर?

विहिरीवरती पाटील खुणवी
आधी चिडले, भुलले नंतर

वेळ झाली

आमची प्रेरणा : सुवर्णमयींची सुंदर गझल वेळ झाली.

ढापण्याने ढापणीला पाहण्याची वेळ झाली
कंद-पोहे अन चहा मी ढोसण्याची वेळ झाली

गा सखे, बेसूर गाणे ऐकण्याची वेळ झाली
कर्णपटलाला जरासे फाडण्याची वेळ झाली

खा सखे तू, वजनकाटा मोडण्याची वेळ झाली
ये सखे, उपवास माझा सोडण्याची वेळ झाली

वेळही झाला कितीसा डास हा मारून राया
एवढ्यातच ढेकणांना मारण्याची वेळ झाली?

सांजवेळी परवच्याला रटून घ्या माझ्या मुलांनो
शिकवले तुम्हास जे ते घोकण्याची वेळ झाली

घेतली हातात पुन्हा लेखणी अस्मादिकांनी
खोडसाळाला नव्याने सोसण्याची वेळ झाली!

आमची प्रेरणा -अजबरावांची गझल आकाशीचा चंद्र...

आकाशीचा चंद्र कुणाच्या हाती लागत नाही
इथे भूतळी परी चंद्रिका खडूस वागत नाही

काळ बदलला, तिचे वागणे सोबत बदलत गेले
कपडे आता ठरवुन पूर्वीसमान घालत नाही

काय फायदा, नजरेलाही झाला सराव त्याचा
अंगभराच्या साडीची सर त्याला लाभत नाही

अनोळखीही सर्व झोंबती तिजला डिस्कोमध्ये
हात कुणाचे कोठे ठरले, पत्ता लागत नाही

खोडसाळही चोरुन बघतो, सांगू खोटे कसे?
हाय! अताशा मनाची सुद्धा लाजच वाटत नाही !

संपत नाही

ऐका हो ऐका! मनोगत पुन्हा, मर्यादित स्वरूपात का होईना, सुरू झाले आहे. आम्हा विडंबकांना नव्या कवितांचे खाद्य उपलब्ध झाले आहे. मृण्मयी ह्यांच्या अनंत ह्या गझलेने आम्ही उपास सोडत आहोत.

तुझे हुंगणे संपत नाही
तुझ्यासारखा लंपट नाही

झगे तोकडे असतानाही
तुझे वाकणे संपत नाही

मनी मागुती बोका होउन
जगी कोण जो हिंडत नाही?

कितीदा निघे ती माहेरी
पुन्हा परतणे खंडत नाही :(

पुरे, खोडसाळा, तव 'कविता'
अता यामध्ये गंमत नाही

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds