आमचे प्रेरणास्थान : एका तळ्यात होती बदके पिले सुरेख.
आमच्या प्रेरणास्थानाचे प्रेरणास्थान : The Ugly Duckling

एका घरात होत्या बाया कजाग दोन
होता पुरूष तिथला धारून फक्त मौन

कारण लहानसेही भांडावयास चाले
आई व बायकोचा नेहमीच वाद चाले
दोघी तयास टोची, दिसतो हताश, दीन
होता पुरूष तिथला धारून फक्त मौन

पुरुषास दु:ख भारी, भोळा रडे स्वत:शी
पोरेहि ना विचारी, सांगेल तो कुणाशी
कर्तेपदास त्याच्या देती मुळी न मान
होता पुरूष तिथला धारून फक्त मौन

एके दिनी परंतु पुरुषास त्या कळाले
संकोच, लाज सारे वार्‍यासवे पळाले
चाले घराघरातुन डिट्टो असाच सीन
त्याचेच त्या कळाले सारे पती समान...

प्रेरणा : "उरी भावनांचा महापूर आहे"

उरी यौवनाचा महापूर आहे
परी आड येतो, पदर क्रूर आहे

तिचे नाक फेंदारणे चालते पण
तिच्या नासिकेला सदा पूर आहे

तिची गाठ घेऊन घालीन डोळा
मिठीचा विषय अद्यपि दूर आहे

तिचे दात पाहून फिटलेत डोळे
परी दंतमंजन मुखातूर आहे

दिवे लावण्याला पुढे नेहमी तू
नयन‍अश्व उधळून चौखूर आहे

मना, लाभले काय लुब्रेपणाने ?
जवळ तो तिच्या, मी उभा दूर आहे

मना, लाभले काय खोड्या करोनी ?
चुडेवज्रमंडन न मंजूर आहे

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds