नायगारा

प्रेरणा - पुलस्ति ह्यांचा नायगारा

दिसताक्षणीच गात्री उठतो कसा शहारा
मी आवरू कसा हा खोलीतला पसारा?

कोणास का दिसावा हा मूर्तिमंत कचरा
लत्ता-प्रहार करुनी कोनात लोट सारा

मी गौरकाय रमणीच्या कल्पनेत रमता
डोळ्यात बायकोच्या पातेल नायगारा

बसवा जनित्र मोठे गालावरी प्रियेच्या
वाया न घालवाव्या अक्षय्य अश्रुधारा

कुणि सार बौध्दिकाचे जाणून प्राशितो का ?
कुणि 'खोडसाळ' निघतो शाखेत ओढणारा !

येवुनी स्वप्नात माझ्या छानसे तू गुणगुणावे
की असे कानात माझ्या मच्छरासम भुणभुणावे ?

दीक्षितांची माधुरी वा टंच सोनाली असू द्या
सर्व शेलाट्या मुलींनी लग्न होता 'टुणटुणा'वे !?

मस्करी करतो ज़नाना ब्रह्मचाऱ्याची कशाला ?
कॅबरे त्या अप्सरांनी का करोनी मज छळावे ?

लोकहो पळता कशाला पाहुनी 'प्रेमा'स अमुच्या ?
भाळुनी कोणीतरी, हो, आज तिज घेऊन जावे

बंद हा सुटता सुटेना, वेळ घाईची असे ही
तोडुनी ह्या दुष्ट गाठी खोडसाळा तू पळावे

प्रेरणास्थान - स्नेहदर्शन ह्यांची गझल येवुनी स्वप्नात माझ्या

मन जाहले...

मन जाहले दिवाणे
ऐकावयास गाणे

दिडकी खिशात नाही
मुजऱ्यास काय जाणे ?

मनु पंढरीस जाते
तनु शोधते सटाणे

खाण्या खमंग पोहे
आले मुली पहाणे

लठ्ठांस उपरती दे
सोडी तुपाळ खाणे

दिवसा कमलहसन अन
रात्री रती उधाणे

त्यज आरशातुनी हे
चोरून मज पहाणे

करतात म्याव हल्ली
मागील वाघ ढाणे

चालेल काय खोटे
तव खोडसाळ नाणे ?


प्रेरणा - जयन्ता५२ ह्यांची गझल मन जाहले...

मी कुठे दिसलेच तर पटवा मलाही
रुक्मिणी मी, कृष्ण व्हा, पळवा मलाही

एरव्ही मी ठेवते कोठे दुरावा?
शोभतो केव्हातरी रुसवा मलाही

पंचपक्वान्नांतली मी पट्टराणी
भोजनाच्या सोबती गटवा मलाही

काय म्हणता? भेटला तो कीर्तनाला?
भेटला माडीवरी परवा मलाही

ही पहा मी लावली ओठांस लाली
व्हा लिफाफा, स्टॅंपसम डकवा मलाही

ठेव बॅंकेतील आहे बायको अन
चेक मी बेअर्र, सख्या, वटवा मलाही

काळजी का फक्त ताईची तुम्हाला?
पाठच्या आहोत मग उजवा मलाही

आमची प्रेरणा - वैभव जोशींची गझल मी कुठे दिसलेच तर

भासते त्यांना गुळाचा घास मी
मुंगळ्यांचा सोसते मग त्रास मी

जे नको ते चुंबिते हमखास मी
खात असते त्यामुळे मुखवास मी

वेळ इतका का बरे तुज लागतो?
मोजते आहे पळे अन तास मी

फ्लॉपले 'उमराव'ही अन 'डॉन'ही
त्यापरी पाहीन पुन्हा 'श्वास' मी

गायचे होते तिला, ती रेकली
लावला म्हणुनी तिला गळफास मी

का हिडिंबा वाटते मी स्थूलशी
आजवर केला कुठे उपवास मी

काय भूगोलास माझ्या पाहसी
जाणते सारा तुझा इतिहास मी

सोडवू मेल्या कशी गणिते तुझी
कैकदा विषयात त्या नापास मी


आमची प्रेरणा - प्रसाद ह्यांची गझल वेदनांची मांडतो आरास मी

खाज

सांग कैसे खाज येता खाजवावे?
नाव ऍलर्जीस असल्या काय द्यावे?

बाहुल्यांचा माग मजला सोडवेना
घालणे डोळे तयांनी थांबवावे

ही गवाक्षांना असे माझी विनंती
बंद तोंडावर असे त्यांनी न व्हावे!

एकट्याने जागण्याला अर्थ नाही
जोडप्याने प्रहर सारे गाजवावे

ऐकले तू हे कधी घडलेच नाही
मी तरी का तोंड माझे वाजवावे?

खोडसाळा हाड नाही तव जिभेला
काय ह्या लुब्रेपणाला मी म्हणावे?

आमची प्रेरणा - सारंग ह्यांची गझल साज

आठवा मला

प्रेरणास्थान - स्नेहदर्शन ह्यांची गझल आठवे मला

खोडसाळ हे खडे टाकणे पुन्हा पुन्हा
शोभते तुला न हे वागणे पुन्हा पुन्हा

रोज भेट द्यायचा का मला उगाच तू
देत वेगवेगळी कारणे पुन्हा पुन्हा?

रोखले किती जरी, रोज जागवायचे
त्यामुळे हलायचे पाळणे पुन्हा पुन्हा

सूतिकागृहात मी त्रास सोसला किती
अन तरी तुझ्यावरी भाळणे पुन्हा पुन्हा

खेळणी जिथे तिथे, बाहुल्या किती पहा
लेकुरांस त्रासुनी मारणे पुन्हा पुन्हा

खेप ही अखेरची ठरवणे पुन्हा पुन्हा
आठवा मला तरी लागणे पुन्हा पुन्हा

सुटुन जाता त्रास झालो
धोतराची कास झालो

काल मी संसार होतो
आज कारावास झालो

जाहलो मी भक्ष ऐसा
बायकोला घास झालो

मी परीक्षार्थी असा की
काठ शोधुन पास झालो

'एकता' रक्तात भिनली
मालिकांचा दास झालो

चहुकडे घोंघावणारा
चिकुनगुनीया डास झालो

मी तुझ्या ऒठां भिडाया
यमक झालो, प्रास झालो

कालची एकांकिका मी
तीन अंकी फार्स झालो?

साधनेचा तोल जावा
एवढा मी 'खास' झालो?

प्रेरणा : मानस६ ह्यांची गझल मी फुलांची रास झालो

प्रश्न

दोन पेगांची नशा ती रिचवणाऱ्यांना विचारा
आठ पेगांची अवस्था बरळणाऱ्यांना विचारा

खूप दिवसांनी जराशी घेत बसले दोस्त होते
बाटली संपेल केव्हा झिंगणाऱ्यांना विचारा

राख झाले पूर्ण बंडल, खोकल्याची ढास आली
घेतले झुरके किती ते फुंकणाऱ्यांना विचारा

तेव्हढे गजरे फुलांचे मनगटाला माळुनी या
रसिकता त्यातील तुम्ही हुंगणाऱ्यांना विचारा

त्रास पत्नीचा किती ते सांगती नवरे जगाला
एकट्याचे दु:ख कोणी ब्रह्मचाऱ्यांना विचारा

वारसा आहे पित्याचा, खोडसाळा, नाव केवळ
माल कोणावर उधळला तीर्थरूपांना विचारा


आमची प्रेरणा - 'विक्षिप्त' ह्यांची गझल प्रश्न

आमची प्रेरणा - कवी नीलहंस ह्यांची गझल नको आयुष्यभर नात्यांतली घोटीव लाचारी जरूर वाचा.

कशी आयुष्यभर केली शिळीपाकीच न्याहारी
कसा संसार केला मी सवे घेऊन म्हातारी

मुलाच्या चेहऱ्याशी साम्य माझे ना जरी दिसले
तसा विश्वास आहे अन तसे हे सभ्य शेजारी

घसरता पाय थोडासा, करे ती वेगळी शय्या
किती रात्री अता माझ्या नशीबी थंड बेकारी

कशाला बंद सारे बार तू, आबा, असे केले
कुठे शहरातले जातील आता हे सदाचारी

किती चोरून दुसऱ्याच्या कवाफी पाडल्या गझला
कवी मी कोडगा ! राहीन मी आजन्म आभारी

नारिजात

आमचे प्रेरणास्थान : सारंग ह्यांची गझल पारिजात

कालचे वादे मुलींनी पाळले होते
अन फुलांचे ताटवे ओशाळले होते

वाटले मजलाच भेटायास तू आला
पण अबोलीलाच तू कवटाळले होते

एवढे गोंजारले मजला गुलाबाने
का मला पण मोगऱ्याने टाळले होते?

मीलनाच्याही क्षणी मी लाजले होते
आमचे हे पाहुनी चेकाळले होते

अंग सारे शेवटी रक्ताळले होते
नारिजातीने असे सांभाळले होते !!!

आमची प्रेरणा - प्रसाद ह्यांची काबिलेतारीफ़ गझल प्राण थोडासा जळावा लागतो

प्राण थोडासा जळावा लागतो
लाकडे नसता पुरावा लागतो

ताल कुठवर मीच सांभाळायचे?
नाच दोघांनी करावा लागतो

ऊब येण्याला जरा थंडीमध्ये
जीव थोडासा चळावा लागतो

रंगता तारुण्य बाईचे गड्या
तोल मर्दा सावरावा लागतो

सोड चरख्याच्या खुळ्या त्या कल्पना
फाळणीचा मोल द्यावा लागतो

पाकळ्या फुलल्यामुळे माझ्या अता
भृंग लोचट मज सहावा लागतो

प्रेम करतो मी पतंगासारखे
बस जरासा ढील द्यावा लागतो

कोण ही प्रीती? असे खाते कशी ?
रोज प्रेमाला पुलावा लागतो

ठेवता तू कागदावर लेखणी
खोडसाळाला सुगावा लागतो

ट-ला-ट

पुढील विडंबन हे कोणत्याही विशिष्ट गझलेचे किंवा कवितेचे नसून ट-ला-ट प्रवृत्तीचे आहे. गझलेचे सारे तांत्रिक नियम पाळल्याने फार तर तिचा निर्जीव सांगाडा निर्माण होईल. काव्याचा प्राणवायू त्यात फुंकल्याशिवाय त्या सांगाड्याचा उपयोग काय? वानगीदाखल माझा खालील ट-ला-ट उपद्व्याप पहा :

मी मनावर प्रेम केले
तू तनावर प्रेम केले

प्रीत माझी शुद्ध होती
तू जनावर-प्रेम केले

संयमाने प्रेम खुलते
तू अनावर प्रेम केले

प्यार मज होती गरीबी
तू धनावर प्रेम केले

मज किलोने मोद होई
तू टनावर प्रेम केले

आस शहराची मला अन
तू वनावर प्रेम केले



आहे की नाही निरर्थक तुकबंदी ? म्हणूनच कोणीतरी (?विंदा) म्हटले आहे - "कवी थोडे, कवडे फार"

प्रेरणास्रोत : प्रवासी ह्यांची अप्रतिम गझल शोध घेते नजर का अशी वेंधळी?


शोध घेते नजर का अशी वेंधळी?
चारचौघींपरी तू, कुठे वेगळी?

नेहमीसारखी ढिम्म तू राहिली
आज आलिंगनी हो तरी मोकळी

लाजणारी नको घेउ तू ओढणी
पाहु दे ना तुला मोकळी मोकळी

लाटणे घे करी, चार पोळ्या बडव
कोकलू लागली ही उदर-पोकळी

काय झाडूतल्या त्या हिऱ्या बोलल्या
मारली का मला सांग कोपरखळी?

तू मला दे झणी तंदुरी कोंबडी
मी तुला अर्पितो कोवळी मांधळी

कैद करताच तू कंप सुटला मला
रंगरूपास भुललो नि गेलो बळी

द्वाड पोरे तुला शीळ का घालती
चॊकलेटातली त्या दिसे ना अळी?

का विषय काढता इंद्रियांनो असे?
ती व्रतस्था असे सोवळी सोवळी

खोडसाळा जरी पान तू व्यापले
हाय, दुर्लक्ष करतात ना मंडळी !?

सोड आता

आमची प्रेरणा : कवी सारंग ह्यांची गझल सोड आता

सखे ये जवळ, लाजणे सोड आता
दुरोनी मला चिडवणे सोड आता

नको तार सप्तक तुझा ऐकवू गे
नळावर असे भांडणे सोड आता

तुझे पाय वाटेवरी घट्ट राहॊ
इथे अन तिथे घसरणे सोड आता

दिवे दोन जैसे तुझे नेत्र राणी
डबल बॅटरी, ढापणे, सोड आता

खुळे, लाट पोळ्या, उपाशी असे मी
चुलीशी उगी राहणे सोड आता


माझे प्रेरणास्थान : कवी चित्तरंजन भट ह्यांची गझल पाऊस कोसळू दे .

पाऊस कोसळू दे
छपरातुनी गळू दे

दे, प्रेम दे तुझे पण
सखया जरा हळू दे

जावेस तळतळू दे
सासूस मळमळू दे

चोरून वन्स पाही
पाहून तिज जळू दे

मजला मिठीत घे पण
आधी तया टळू दे

कर फोन पोलिसांना
साऱ्यांस चळचळू दे

जेलात चोंबड्यांना
जात्यावरी दळू दे

मी काय चीज आहे
सटव्यांस आकळू दे

भरात आहे

कवी 'मानस६' ह्यांची मूळ गझल 'भरात आहे' इथे वाचा.


सुमनात गंध कोठे जो खेटरात आहे
बैसून गर्दभावर माझी वरात आहे

बाईल जी दुज्याची, का पूजिता तियेला?
ही खूण लंपटाची साऱ्या नरात आहे

चंद्रास रोहिणी ही भेटावयास आली
सवतीसवे तयाची ज्वानी भरात आहे

मी खोदतो कधीचा खड्डा तिच्याचसाठी
बुडण्यास खोल पाणी कुठल्या थरात आहे?

घ्या आज बायकांनो नवऱ्यांसवे जराशी
मदमस्त जागण्याची " 'रम'णी "य रात आहे

काढाच धिंड माझी, तो खोडसाळ वदला
खोडी विडंबनाची मम अंतरात आहे

तुला पाहिले

कवी 'प्रवासी' ह्यांची मूळ गझल "तुला पाहिले" इथे वाचा.


कडमडताना तुला पाहिले
लुडबुडताना तुला पाहिले

हात तिचा मी हाती धरता
चरफडताना तुला पाहिले

मेघ जाइना निरोप घेउन
बोंबलताना तुला पाहिले

सृजनशीलता भींतीवरती
खरवडताना तुला पाहिले

नदीकिनारी तिची पातळे
खळबळताना तुला पाहिले

कंठ दाटला, शब्द फुटेना
खाकरताना तुला पाहिले

कुंथत होतो प्रतिभेसाठी
डरडरताना तुला पाहिले

मोह दाटता पंचा सुटला
सावरताना तुला पाहिले

धीर धरी रे खोडसाळ तू
धसमुसताना तुला पाहिले

Newer Posts Home

Blogger Template by Blogcrowds