वणवा २

मिलिंद फणसे यांच्या अंतरी पेटलेला "वणवा" वाचला आणि आमच्या तथाकथित प्रतिभेनेही पेट घेतला. ("एव्हढी काय घाई झाली आहे लिहिण्याची? काहीतरी वाचता आणि बुडाखाली आग लागल्यासारखे करता!मी एखादं काम सांगितलं तर वेळ नसतो तुमच्याकडे. इथे मी मात्र मर,मर, मरत्येय..." इति सौ. पुढील 'सं'भाषण साऱ्यांना पाठ असल्यामुळे देत नाही.)

जोगवा लक्ष्मीकृपेचा मागतो आहे
सर्व धन घोड्यावरी मी लावतो आहे

रोज मागे वंदनेच्या लागतो आहे
एक डोळा शर्वरीवर ठेवतो आहे

होय, सर्वांशी जरी मी बोलतो हसुनी
खास कोणा एकटीला गाठतो आहे

तीच फुंकर घालते अन्‌ दीप मालवते
आणि वर म्हणते "कशाला पेटतो आहे?"

वाहते देवा फुले पत्नी दिवस-रात्री
अन्‌ उशी नवरा तिथे कवटाळतो आहे

व्यसन मटक्याचे मला आहे असे जडले
लागला नाही कधी पण लावतो आहे

हाय ते पार्ट्यांस जाणे संपले सारे
फक्त दुपट्यांच्या घड्या मी घालतो आहे

मार्ग कैसे वेगळे होतील दोघांचे?
पोटगीचा आकडा भंडावतो आहे!

कोरडे डोळे निरोपाच्या नको वेळी
चोरुनी ग्लिसरीन आधी घालतो आहे

कुकू शिन्दे यांनी मांडलेल्या किंचित एकतर्फी लग्नाआधी......नन्तर... ची दुसरी बाजू मांडण्याचा आमचा हा प्रयत्न. यच्चयावत्‍ पीडित नवऱ्यांना (व खिलाडू वृत्तीच्या बायकांना) आमची बाजू थोडीबहुत तरी पटेल याची आम्हास खात्री आहे.


लग्नाआधी रूप वेगळे,
नंतर दिसती रंग वेगळे...

आधी... लांब रेशमी केस मोकळे

जीव सखे मम ज्यात गुंतला।

नंतर...सखी म्हणे हा त्रास फार मज

करून येते बॉब कुंतला।

आधी...तू आल्याची वर्दी देई

तुझ्या अंगीचा गंध आगळा

नंतर... सेंट प्रियकरासाठीच होते

नवरा मासा लावण्या गळा।

आधी...तू बोलावे, मी ऐकावे,

अंगावरुनी पीस फिरावे।

नंतर...तू बोलावे, तू बोलावे

तू बोलावे, तू बोलावे।

आधी...साखरेविनाही चहास गोडी

तुझ्या हातची अन्‌ अधरांची

नंतर...अगोड चहाही परवडला पण

मिठास यावी कैसी गोडी?।

आधी...तंग तुझ्या त्या कपड्यामधुनी,

तारुण्य तुझे घे नजर खेचुनी।

नंतर...असे बाळसे तू धरले की

कपडे सारे गेले उसवुनी।

आधी...कोमल, हळवी प्रिया तू सुंदर

फुलासारखी जपण्याजोगी।

नंतर...किती जिवाचे कौतुक केलेस

एक असूनही भासे दोघी।

आधी...दमला असशील, थकला असशील

सख्या, पाय मी चुरुनी देते।

नंतर...पुरेत नखरे, स्वप्ने आवर

अस्तन्या दुमड, झाडलोट कर।

आधी...गृहिणी, सचिव मी, सखी एकांती

राजा माझा तूच खरोखर।

नंतर...सम्राज्ञी मी माझ्या घरची

गुलाम तू तर, माझा नोकर।

...आता नको!

आमचे प्रेरणास्थान : प्रदीप कुलकर्णी यांची सुंदर गझल ...आता नको!

नको, डान्सचा बार आता नको
पुन्हा तोच झंकार आता नको

नका साथ नेऊ कुणीही मला
मजा ती मजेदार आता नको

हसू येत आहे अटीचे तुझ्या -
"मुलांचा मला भार आता नको!"

मला प्यार आहेत साऱ्याजणी
अशा दोन वा चार आता नको!

स्वत: मीच जेथे वळू व्हायचो
असा बैलबाजार आता नको!

गटारीस मजला असे वाटते
गळा कोरडा फार आता नको

नको डासविश्वातले हे जिणे...
नि हिंवताप आजार आता नको!

मुक्याचाच भारी मला सोस तो
तुझी त्यास तक्रार आता नको

तुझी वेळ होताच खाशील तू
अवेळी फलाहार आता नको!

तुझा बाप होकार देईल हे
खुळे स्वप्नसंभार आता नको!

गळेखाजव्यांनो कृपा ही करा!
गळ्यातून गंधार आता नको!

करी खोडसाळा विडंबन असे
कुणाचीच तक्रार आता नको!

"कसे जगावे...?" हे आम्हांस शिकवल्याबद्दल आम्ही प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर, यांचे अत्यंत आभारी आहोत. त्यांच्या या ऋणातून काही अंशी तरी मुक्त होण्यासाठी आम्ही खालील ओळी प्राध्यापक डॉक्टर मजकुरांच्या चरणी सविनय अर्पण करीत आहोत.


'कसे लिहावे...?..' भान तिजकडे भटकत राही
लिहू कसे, ती समोर माझ्या मटकत राही

उभा जरी मी पहारेकरी दारावरती
क्षणाक्षणाला मुलगी खाली सटकत राही

पळून गेली कार्टी याचे दु:ख न मजला
हिला न नेले सोबत हे मज खटकत राही

पुसून माझी स्थावर-जंगम क्षेमखुशाली :(
जगास टवळी सांगत सत्ये भटकत राही

जवळ करी ती बंगला, गाडी, पैसा माझा
मलाच केवळ झुरळासम ती झटकत राही

ध्यान माझे

आमची प्रेरणा : अजब यांची सुंदर गझल भान माझे...

हरवले आहे जरी 'हे' ध्यान माझे
चालले आहे तरी पण छान माझे!...

बोलला राहूल "मी मिस कॉल देतो"
ऐकण्या टवकारते मी कान माझे...

राहती खुर्च्या रिकाम्या नाटकाच्या
काळजी नाही, असे अनुदान माझे!...

चेहरा मी शक्य तितका रंगवावा
लपवण्या तारुण्य-पिटिका-रान माझे!...

जिंकली आहेच मी सौंदर्यस्पर्धा
घट्ट आहे जज्जशी संधान माझे!...

आरसा हसतोय पाहून ध्यान माझे
'खोडसाळा' तोकडे परिधान माझे

आमची प्रेरणा : राजगुडे यांची कविता मला प्यायला खूप आवडतं...


मला दमदार साहित्य लिहायला खूप आवडतं...

पण लिहिलेले कुणीतरी वाचायला पाहिजे...

आणि वाचून भरपूर प्रतिसाद द्यायला पाहिजे...

पण प्रतिसाद देण्यासाठी आधी वाचायला पाहिजे...

आणि त्यांनी वाचण्यासाठी मला नियमित उच्च प्रतीचे लिहायला पाहिजे..

आणि उच्च प्रतीचे लिहायचे तर कमी लिहायला पाहिजे...

मला दमदार साहित्य लिहायला खूप आवडतं... म्हणून कमी लिहायला पाहिजे...

पाखरू

आमच्या पाखरास उडण्याची प्रेरणा मिळाली अजबरावांच्या पक्षी कडून.

आज निराळी
सकाळ होती...
एक वेगळे
पाखरु येऊन
बसले होते
कट्ट्यावरती...

सगळी पोरं
जमली होती...
पाखरु त्यातच
रमले होते...

मला वाटले
पाखरास त्या
उडवून न्यावे...
याआधी की
त्या फडक्याने
मध्ये घुसावे...

चौपाटीची
वाट धरावी
चुकवून फादर...
खाऊ घालून
त्यास जरासे
जवळी घ्यावे...

पाखरु पण ते
अवली होते
भोळे नव्हते...
खाऊन - पिऊन
पसार झाले
बघता-बघता...

बोचरा

प्रमोद खराडे यांच्या गझलेने प्रेरीत होऊन सुचलेली आमची ही 'गझल'(शेवटी खोडसाळाची गझलकार होण्याची सुप्त इच्छा समोर आलीच!):

सासऱ्यासाठी असे हा धोतरा
सासुला देतो अळू मी खाजरा

भोवती माझ्या जरी साऱ्या जणी
जागता पण बायकोचा पाहरा

मारकीला कोण सांभाळेच ना
मी दिला गोठ्यात माझ्या आसरा

फक्त हे माझे जरी खाते असे
त्यावरी वीटो 'ति'चा असतो खरा!

दोस्तहो येऊ नका दारेपुढे
हा असे निवडुंग भलता बोचरा

मी न आहे तो, तुम्ही जो वाचता
खोडसाळाच्या पहा ना अंतरा

आमची प्रेरणा (हे वाचून एकता कपूरबाई आमच्यावर चोरीचा खटला तर नाही ना भरणार?) : अजबरावांची गझल कुठे म्हणालो

कुठे म्हणाले मला रांधणे आवडते?
खरे मला हॉटेलींग करणे आवडते...

नकोस सांगू मेनुतल्या किंमती मला
त्या तुझ्या चेहऱ्यात बघणे आवडते...

खिसा सैल तू सोडणार नाहीस कधी
म्हणूनच तुझे खिस कापणे आवडते...

तू असताना वडा-पाव मागवू कशी?
अरे कढी जर तुला भुरकणे आवडते...

'खोडसाळ' ही कसली आहे अजब गझल?
जिच्या फुग्याला तुला टोचणे आवडते...

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds