नायगारा

प्रेरणा - पुलस्ति ह्यांचा नायगारा

दिसताक्षणीच गात्री उठतो कसा शहारा
मी आवरू कसा हा खोलीतला पसारा?

कोणास का दिसावा हा मूर्तिमंत कचरा
लत्ता-प्रहार करुनी कोनात लोट सारा

मी गौरकाय रमणीच्या कल्पनेत रमता
डोळ्यात बायकोच्या पातेल नायगारा

बसवा जनित्र मोठे गालावरी प्रियेच्या
वाया न घालवाव्या अक्षय्य अश्रुधारा

कुणि सार बौध्दिकाचे जाणून प्राशितो का ?
कुणि 'खोडसाळ' निघतो शाखेत ओढणारा !

येवुनी स्वप्नात माझ्या छानसे तू गुणगुणावे
की असे कानात माझ्या मच्छरासम भुणभुणावे ?

दीक्षितांची माधुरी वा टंच सोनाली असू द्या
सर्व शेलाट्या मुलींनी लग्न होता 'टुणटुणा'वे !?

मस्करी करतो ज़नाना ब्रह्मचाऱ्याची कशाला ?
कॅबरे त्या अप्सरांनी का करोनी मज छळावे ?

लोकहो पळता कशाला पाहुनी 'प्रेमा'स अमुच्या ?
भाळुनी कोणीतरी, हो, आज तिज घेऊन जावे

बंद हा सुटता सुटेना, वेळ घाईची असे ही
तोडुनी ह्या दुष्ट गाठी खोडसाळा तू पळावे

प्रेरणास्थान - स्नेहदर्शन ह्यांची गझल येवुनी स्वप्नात माझ्या

मन जाहले...

मन जाहले दिवाणे
ऐकावयास गाणे

दिडकी खिशात नाही
मुजऱ्यास काय जाणे ?

मनु पंढरीस जाते
तनु शोधते सटाणे

खाण्या खमंग पोहे
आले मुली पहाणे

लठ्ठांस उपरती दे
सोडी तुपाळ खाणे

दिवसा कमलहसन अन
रात्री रती उधाणे

त्यज आरशातुनी हे
चोरून मज पहाणे

करतात म्याव हल्ली
मागील वाघ ढाणे

चालेल काय खोटे
तव खोडसाळ नाणे ?


प्रेरणा - जयन्ता५२ ह्यांची गझल मन जाहले...

मी कुठे दिसलेच तर पटवा मलाही
रुक्मिणी मी, कृष्ण व्हा, पळवा मलाही

एरव्ही मी ठेवते कोठे दुरावा?
शोभतो केव्हातरी रुसवा मलाही

पंचपक्वान्नांतली मी पट्टराणी
भोजनाच्या सोबती गटवा मलाही

काय म्हणता? भेटला तो कीर्तनाला?
भेटला माडीवरी परवा मलाही

ही पहा मी लावली ओठांस लाली
व्हा लिफाफा, स्टॅंपसम डकवा मलाही

ठेव बॅंकेतील आहे बायको अन
चेक मी बेअर्र, सख्या, वटवा मलाही

काळजी का फक्त ताईची तुम्हाला?
पाठच्या आहोत मग उजवा मलाही

आमची प्रेरणा - वैभव जोशींची गझल मी कुठे दिसलेच तर

भासते त्यांना गुळाचा घास मी
मुंगळ्यांचा सोसते मग त्रास मी

जे नको ते चुंबिते हमखास मी
खात असते त्यामुळे मुखवास मी

वेळ इतका का बरे तुज लागतो?
मोजते आहे पळे अन तास मी

फ्लॉपले 'उमराव'ही अन 'डॉन'ही
त्यापरी पाहीन पुन्हा 'श्वास' मी

गायचे होते तिला, ती रेकली
लावला म्हणुनी तिला गळफास मी

का हिडिंबा वाटते मी स्थूलशी
आजवर केला कुठे उपवास मी

काय भूगोलास माझ्या पाहसी
जाणते सारा तुझा इतिहास मी

सोडवू मेल्या कशी गणिते तुझी
कैकदा विषयात त्या नापास मी


आमची प्रेरणा - प्रसाद ह्यांची गझल वेदनांची मांडतो आरास मी

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds