प्रस्तावना

      मराठी भाषेला वाहिलेल्या संकेतस्थळांवर व आपापल्या जालनिश्यांवर अनेक प्रतिभावान हौशी कवी आपल्या रचना सादर करतात. त्या वाचून आपल्याला असे काही लिहिता येत नाही याचा मला खूप राग यायचा. सांगू नका कोणाला, पण माझी अवस्था ते काय असूयाग्रस्त की मत्सरग्रस्त म्हणतात ना तशी व्हायची. मग ठरवलं - नाही ना आपल्याला असे काही छान छान, नवनवीन कल्पनांनी नटलेले, साहित्यिक मूल्यांनी ओतप्रोत, इ. इ. लिहायला जमत, मग ठीक आहे. जे लिहितात त्यांची विडंबनात्मक टर उडवायची. कोल्ह्याला द्राक्षं आंबट, दुसरं काय. परत विडंबन करणे तुलनेने बरेच सोपे, खासकरून छंदबद्ध कविता वा गज़लांचे. तयार जमीन, तयार यमकें, रेडीमेड कवाफ़ी. आपण फक्त ओळी जराशा उलटसुलट केल्या की झाले विडंबन तयार. वाचणाऱ्यांनाही गंभीर रचनांचे अर्थ लावत बसण्यापेक्षा 'हसा आणि विसरून जा' छाप विडंबने वाचणे सोयीस्कर वाटते. त्यामुळे आमच्यासारख्यांची चलती असते. कोणी नाक मुरडलेच तर कानाच्या पाळ्या धरून आचार्य अत्र्यांच्या ' झेंडूची फुले' चा वारसा सांगावा. वर अत्यंत आदराने (नाटकं करायला आपलं काय जातय) ' क्व सूर्यप्रभवो वंश: क्व चाल्प विषयामति: ' वगैरे वाक्यं टाकावी. एकाच वेळी आपला विनम्रपणा आणि सु'संस्कृत'पणा दाखवण्याची संधी का सोडा? (संस्कृतातील ओ की ठो काही येत नसले तरी गाठीशी अशी दोन-चार वाक्य पाठ करून ठेवली आहेत मी. भाव मारण्याच्या कामी येतात.) अशी काही विडंबने इथे देण्याचा मानस आहे. खरे तर 'टाकणार आहे' लिहिणार होतो पण 'देण्याचा मानस आहे' कसे भारदस्त वाटते, नाही? मूळ रचनांचा दुवाही देईन. विडंबन आवडो न आवडो, वाचकहो, त्या मूळ रचना जरूर वाचा ही मात्र खोडसाळाची कळकळीची विनंती आहे. त्या प्रतिभावंतांची थट्टा करण्याच्या माझ्या पापाचे यामुळे थोडे तरी परिमार्जन होईल.


ता.क. ह्या नोंदीची तारीख बघून चक्रावून जाऊ नका. ही प्रस्तावनास्वरूपी नोंद ब्लॉगच्या सुरुवातीसच रहावी म्हणून भविष्यकालीन तारीख घातली आहे.

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds