प्रेरणा : वैभव जोशी यांची गझल ह्या कशा उबदार ओळी


ह्या कशा चवचाल ओळी, शब्द हे ’तसले’ पुन्हा
हाय!बच्चा कंपनीवर बाप खेकसले पुन्हा

ह्या कशा रचल्यास ओळी, शेर हे फसले पुन्हा
हाय!कच्च्या शाहिरा उस्ताद खेकसले पुन्हा

"सासरा, दारू, मुली, लफड्याविना कविता कशी?"
वाचणारे चेहरे झटक्यात खसखसले पुन्हा

हुडहुडी भरली तनाला, गालफडही तापले
काय बोटांचे ठसे गालावरी ठसले पुन्हा

अजुन त्यांची ठेवली नाहीच का पत्रावळी ?
कावळे झाडावरी जाऊनही बसले पुन्हा!

मज न चुंबन प्रेयसीने, अन्‌ न पत्नीने दिले
"संपला मधुचंद्र, आता चोचले कसले पुन्हा?"

मी नझल लिहिली तरीही वाजल्या टाळ्या किती
नाव माझे पाहुनी का लोकही फसले पुन्हा ?

"मायला!असला चुना का लावला कोणी कधी?"

खोडसाळा साफ हे बोलू नको असले पुन्हा

गंड

मी कवी नाही, मला हा गंड आहे
यमकबाजीची तरीही कंड आहे

'र' पुढे 'ट' ठेवुनी उजळून जातो
व्योम कविता; आणि मी मार्तंड आहे!

वाचल्यानंतर शिव्या घालो कुणीही
छापला नुकता दहावा खंड आहे

वृत्त अन् बाराखडी झेपे न जेव्हा
मुक्तछंदातून केले बंड आहे

व्याप्त कवितेच्या जमीनी झोपड्यांनी
पण विडंबन मोकळा भूखंड आहे

काळजी निवृत्त होण्याची कशाला ?
काफ़ियांची बँक आहे, फंड आहे

बोलले काका, विडंबन हे नसावे
ऐकुनी ते, गर्व मम शतखंड आहे

प्रौढ अन् गंभीर कविता शीक, लेका!
लांबले, खोड्या, किती पौगंड आहे...

(साहसे!)

स्फूर्तिस्थान : प्रदीप कुलकर्णी यांची गझल ’साहसे!


.................................
साहसे!
.................................

विडंबन जाहले नाही कसे काही?
कुणीही वाचले नाही जसे काही!

प्रयासाने किती ही लाभली कविता...
सुचू लागेल आता द्वाडसे काही!

गडे, या काफ़ियांना चालवा आधी...
असू द्या ओढले, बेजारसे काही!

उन्हाळा सोसण्याला पाहिजे संत्री...
दिसे देशी समोरी 'बार'से काही!

सखा घेईल कोणी माग डोळ्यांनी...
सखे, तू नेस लुगडे छानसे काही!

तशी वायाच गेली भेट दोघांची...
'तसे' करता न काले फारसे काही!

कुणाच्या बायका सोडूनही गेल्या...
इथे का होत नाही रे तसे काही?

बघू या पाडता येतात का कविता...
मला दे शब्द तू बंबाळसे काही!

नको रे कोपर्‍याच्या सीट तू शोधू...
घरी दिसतील आईला ठसे काही!


- खोडसाळ

.................................
पुनर्रचनाकाल ः २ जुलै २००९
.................................

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds