आजही...

आमची प्रेरणा - जाऊ द्या हो, हल्ली प्रेरणास्रोताचा नामोल्लेख केला की (शाब्दिक) दगडफेक होवू लागते. आमची 'निर्विष थट्टा' सेन्सॉरच्या कचाट्यात सापडते व अनुमतीच्या प्रतीक्षे ला "Waiting For Godot" चे रूप येऊ लागते. त्याला आपापसात ही स्थान मिळत नाही. तेव्हा तूर्तास या पंक्तिंना आपण 'स्वतंत्र रचना' म्हणूया. सुज्ञास अधिक सांगणे नलगे.


दुमडुन बसलो
लिहिण्या बाही
आजही...

पुढल्या ओळी
सुचल्या नाही
आजही...

गझल अपूरी
पडून राही
आजही...

कविता त्याची
बनवुन पाही
आजही...

रतीब माझा
सुरूच राही
आजही...

अनंत ढवळे यांची "इतके धुळकट रस्ते इथले" ही गज़ल व त्यावर त्यांचा धोंडोपंतांबरोबर रंगलेला प्रतिसाद-रूपी कलगी-तुरा वाचण्याचे सौभाग्य आम्हास आजच प्राप्त झाले. म्हटलं आपणही जरा ती जमीन वापरून बघावी.

इतके तापट लेखक इथले
देवच जाणे काय बिनसले

बोट ठेवता उणिवांवरती
कविराजांचे पारे चढले

अर्थरिकामे, निव्वळ वारा
शब्द ढवळुनी काव्य प्रसवले

विकार जडतो आहे आता
(नको तिथे हे पाय घसरले)

उठता उठता विझल्या ज्वाळा
वैतागुन तू डोळे मिटले

गझल न कळली 'खोडसाळ' तुज
मक्त्याचे तुज अर्थ न कळले

विरजण

कविवर्य सुरेश भट यांची सुरेश वाडकर यांनी गायलेली गझल "तोरण" सर्वश्रुत आहे. ज्यांनी ती ऐकली नसेल वा ज्यांना ती पुन्हा ऐकायची असेल त्यांनी खालील प्लेयरच्या ।> बटणावर टिचकी मारावी.
Get this widget | Share | Track details


या सुंदर तोरणावर आमच्या खोडसाळ मेंदूने घातलेले विरजण असे :

आता नहायाचे असे माझे किती क्षण राहिले ?
लावावयाचे तेव्हढे अंगास साबण राहिले

येथे ठगायाचे असे माझे किती जण राहिले ?
थांबावयाचे येथ मज काही न कारण राहिले

चुंबावयाला चंद्रमा बाहूत घे ही तारका
माझे तरी माझ्यावरी कोठे नियंत्रण राहिले ?

ते लोक अरसिक, आंधळे टाळून मज गेले पुढे
मी मात्र चोरून पाहते - मागे किती जण राहिले

कवटाळण्या बघती मला दाही दिशांचे टोणगे
सारेच प्रेमाचे जुने लावीत लांबण राहिले

थोबाड माझे जर मुळी नाही बघायासारखे
पतिदेव का तव मजवरी होऊन लिंपण राहिले ?

"हो अष्टपुत्रा" बोलली लग्नात सारी माणसे
ठेवून त्यांचा मान का ना सांग गाभण राहिले ?

धर 'खोडसाळा' धीर तू, पळुनी कुठे मी चालले ?
लावावयाचे तेव्हढे अद्याप विरजण राहिले

बेवडाच मी !

प्रदीप कुलकर्णी यांची एकटाच मी! ही गझल वाचली आणि आम्ही उत्स्फूर्तपणे म्हणालो

नाही उगीच येत वास...बेवडाच मी!
गुत्ताच मम असे निवास...बेवडाच मी!

संपे न एकट्यास हौद दारुचा जरी
माझा पुन्हा पुन्हा प्रयास...बेवडाच मी!

माझी कुठेतरी असेल बाटली इथे...
शोधा, जरा करा तपास...बेवडाच मी!

माझ्या घशात पावशेर रोज उतरते
ना परवडे मला शिवास...बेवडाच मी!

दारूस आठवीत पेंगपेंगतो असा...
घेऊन झोपतो उशास...बेवडाच मी!

होतो नशेत मी परी न एकटा कधी -
पडलेत दोस्त आसपास...बेवडाच मी!

येऊ नका कुणी सुधारण्यासही मला...
घेऊ नका उगीच त्रास...बेवडाच मी!

नाही मला कुणीच 'कोरडा' सवंगडी
'घेण्यात' सोबती झकास...बेवडाच मी!

नाही कुणास 'खोडसाळ' मी विचारले ?
देशील काय एक ग्लास...बेवडाच मी!

नाते

आमची प्रेरणा - प्रदीप कुलकर्णी यांची गझल नाते.

वाटे उकडल्यासारखे
घामात भिजल्यासारखे

ओठांवरी मिसरूडही
आले ढकलल्यासारखे

दाढी मिशा काटे जणू
आहेत खुपल्यासारखे

सोडून नको गाणे जरी
वाटे चिरकल्यासारखे

बघणे तुझे माझ्याकडे
सावज गवसल्यासारखे

का वाटते सरणावरी
लाकूड असल्यासारखे

आयुष्य झोंबू लागले
मजला पटवल्यासारखे

बोन्सायच्या झाडापरी
वाटे खुरटल्यासारखे

देहावरी वसने जणू
लक्तर उसवल्यासारखे

नित चूळ भरसी का अशी
दाती अडकल्यासारखे ?

घेतेस माझे नाव तू
कडुनिंब प्याल्यासारखे

मी तेच ते बोलू किती
रेकॉर्ड अडल्यासारखे

लाली कपोली, ओठही
रंगात बुडल्यासारखे

माझे-तुझे नाते जणू
सवती बनवल्यासारखे

का 'खोडसाळा' काव्य हे
वाटे उबवल्यासारखे ?

कधी कधी

आजच ज्योती बालिगा-राव यांची नितांत सुंदर गझल कधी कधी वाचनात आली आणि आम्ही खडबडून जागे झालो ("झोपेत होता तेच बरं होतं" असं कोण म्हणाला? त्याला ताबडतोब तोफेच्या तोंडी देण्यात यावे.) आणि लिहू लागलो.('कधी कधी' आम्हीही लिहितो म्हटलं). ज्योतीताईंची गझल वाचून सुचलेल्या ओळी अशा :

कारणाशिवाय मी बोलते कधी कधी
नेहमीच बोलते, ऐकते कधी कधी

घोळक्यात शोधते मी मुलींत त्यास अन्
समजुनी लसूण मी ठेचते कधी कधी

टाळुनी मला सख्या चालला कुणाकडे?
चोर तव मनातला पकडते कधी कधी

मानते पती तुला, (पाडव्यास देवही
)
अन तुलाच दासही मानते कधी कधी

कोणत्या न अंगणी फूल वेचलेस तू?
रोज हे बरे नव्हे, शोभते कधी कधी

एकटेपणातही स्पर्श आठवे तुला
अन मिठीतही तुला बोचते कधी कधी

जागते अजूनही बाळ आपले मध्ये
रात्र आपुली अशी संपते कधी कधी

खिजवते कधी कधी, रिझवते कधी कधी
'खोडसाळ' खोड तव काढते कधी कधी

मुलाहिजा

गणीत काय, मी करीनही इजा बिजा
मदत करा कुणीतरी, सुटेच ना त्रिजा

जमायचे न एक मज स्वत:स रोखणे
म्हणून सॅंडली मला करायच्या इजा

किती किती चळून मी बघायचो तिला
करील काय ती कधीतरी मुलाहिजा ?

जिथेतिथे सुसज्ज स्वागतास वधुपिते
टपून बैसतात हेरण्यास सावजा

किती स्वत:च माळशील हार अन् फुले ?
थकु नकोस, काम हे अम्हास देत जा

कसे सुरेख वाटतात गोड चेहरे
करीत गुदगुल्या हळूच विद्ध काळजा

अशी, सखे, तृषार्त ना सरो पुरी निशा
"न मेघ वर्षणार, 'खोडसाळ', जा, निजा!"

आमचे स्फूर्तिस्थान - चित्तरंजन भट यांची गझल मुलाहिजा

आजही

खरडल्या दो-चार ओळी आजही
भाजली काव्यात्म पोळी आजही

मी कधीचा "तख्लिया" म्हणतोय पण
घेरुनी आहेत दासी आजही

कोणत्या जन्मातला अनुबंध हा
बाटली आहे उशाशी आजही

आजही दिसतात स्वप्नी अप्सरा
स्वप्न मुंगेरी बघे ती आजही

जन्मला होता कवी केंव्हातरी
सांडतो आहेच शाई आजही

काफ़ियांची तीच संततधार अन
तीच ती "वा वा" जनांची आजही

'खोडसाळा' काळजी कसली तुला ?
खूप तुकबंदीस तेजी आजही

आमची प्रेरणा - अनंत ढवळे यांची गझल-आजही

गझल ?

मूर्ख होतो किती मागताना तुला
सोसले मी किती नांदताना तुला

दुष्ट आकाश फसवून गेले मला
काय मी पाहिले पाहताना तुला ?

धावणे संपले, जाहलो कैद मी
गाळल्या मी किती माळताना तुला

शब्द ते पार आटून गेले तुझे
आज मी पाहिले कुंथताना तुला

रूप हे कोणते, कोणता रंग हा
लोक किंचाळती पाहताना तुला

हे कवाफ़ी जुने अन रदाफ़ी जुन्या
जाल कंटाळले ऐकताना तुला

ते कवी कंपले,'खोडसाळा', पहा
होत ढवळाढवळ वाचताना तुला...

मूळ रचना - अनंत ढवळे यांची गझल

मनाची आग

मनाची आग कैसी शांतवावी ?
तिला ना, हाय, अभिलाषा कळावी!?

फरक ना आमच्यामध्ये जरासा
जुळ्या भावांत पत्नी गोंधळावी

मनाचे श्लोक ना आर्या न भारुड
कशी आम्हास ही कविता कळावी ?

न पहिली दार उघडे ना दुजीही
कुठे ही रात्र आता घालवावी ?

शहर परके, न कोणी ओळखीचे
कुणाची लाज आता बाळगावी ?

नसे संवेदना तुज 'खोडसाळा'
अशी ढवळाढवळ का तू करावी ?

आमचे प्रेरणास्थान - अनंत ढवळे यांची गझल "मनाची आग"

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds