मूळ कसदार व सुपीक जमीन : दुनिया...
जमीनदार : अजबराव.

शेतमजूर / कुळवाडी खोडसाळ यांनी निढळाच्या घामाने सिंचून उगवलेले काँग्रेस गवत वाचकांना सप्रेम अर्पण :

स्वाद वेगळा आहे की वेगळीच मुनिया?
समजत नाही गुडदा की ही नळीच मुनिया?...

नियम खरोखर किती आगळे मुनियेचे ह्या!
कुणास ताडी, कुणास देते मळीच मुनिया!...

कधी वाटते, मुनिया इतकी वाइट नाही
देते भरताराला जेव्हा जुळीच मुनिया!...

अलगद पळ मी काढू पाहत होतो तेव्हा
बांधे भाळी माझ्या मुंडावळीच मुनिया...

सभोवतीचे काटे सारे टाळतोच मी
तरी टोचते थोडीशी, बाभळीच मुनिया...

कुणाला कधी दूर लोटले नाही आम्ही
गौर असो वा असो तशी सावळीच मुनिया...

कसा करू समझौता मी सांगा मुनियेशी?
देऊ पाहत आहे आज्ञावळीच मुनिया!...

आहे मुनिया 'खोडसाळ' आवडण्याजोगी
अर्धोन्मीलित असे जणू पाकळीच मुनिया...

....दे मजला

आमची प्रेरणा धोंडोपंत यांची कविता हात तुझा हातात......
आणि केशवसुमार यांची मला कसा हा म्हणतो मेला....


भेट तुझ्या अंगातला सखे....झंपर दे मजला
पत्ता दे अन्‌ भ्रमणध्वनीचा....नंबर दे मजला

नकोस बांधू कुंपण कारा सभोवती माझ्या
फुरफुरणारा वारू मी, तू....अवसर दे मजला

भत्ता, बोनस आणिक बढती हाव असे यांची
बंगला, गाडी आणिक वरती....शोफर दे मजला

मनोरथाचे अश्व दौडु दे निलाजरे अजुनी
हात तुझा मुस्कटात सखये....नंतर दे मजला

कसे जमावे माझे परक्या गोऱ्या रंभांशी
माय मराठी जिची असे ती....सहचर दे मजला

किती राहिले सांग अजूनी फुगायचे येथे
प्रभो पुन्हा ती सिंहकटीसम.... कंबर दे मजला

दे ! दे ! सखये,हात तुझा या 'खोडसाळ' हाती
निदान चुंबनरूपी सखये....गाजर दे मजला

वेळच नसतो...

आमचे स्फूर्तिस्थान : अजब यांची सुंदर गझल वेळच नसतो...

मनीमागुती फिरण्यासाठी वेळच नसतो
'स्वप्ना'लाही बघण्य़ासाठी वेळच नसतो...

जयन्त येतो, श्रावण येतो, वाचून जातो
अभिप्राय खरवडण्यासाठी वेळच नसतो... :(

बघावयाला कोणी येवो परंतु तिजला
चहा न्‌ पोहे करण्यासाठी वेळच नसतो...

देणी असलेलेच भेटती लोक मला, पण
बघून त्यांना लपण्यासाठी वेळच नसतो...

खडे तसे मी 'त्यांना' बघुनी मारत असतो
नेम नीट पण धरण्यासाठी वेळच नसतो...

मरण्याआधी सखीस फोटो देउन गेलो
फ्रेम तिला तो करण्यासाठी वेळच नसतो !...

प्रिया चालली म्हाताऱ्या श्रीमंतामागे
'खोडसाळ' ह्या तरण्यासाठी वेळच नसतो...

आमचे परम-मित्र श्रीयुत धोंडोपंत यांच्या अखाडा या गझलेवरून प्रेरणा घेऊन आम्हीही लेखनाच्या अखाड्यात उतरून धूळपाटीवर चार-दोन ओळी खरडण्याचे औद्धत्य करीत आहोत.

बॉस मज बोले कडाडा
"रोज सबबी, रोज खाडा"

तो पहा मेमो मिळाला
नोकरी झाली अखाडा

इन्क्रिमेंट नाही मिळाली
बढतिचाही साफ राडा

कर्णकर्कश गीत माझे
सूरही थोडा भसाडा

ती उभी सौधात आहे
खोल की तूही कवाडा !

काय मी केले कळेना ?
लावला आहेस टाडा !

हासते माझ्यावरी ती
पाहुनी माझा खुराडा

खोडसाळा ही न कविता
फक्त शब्दांचा चुराडा

आम्हाला ऋतुगंध यांची कविता की गझल...? ही रचना आवडली. ( ती कविता आहे की गझल या विषयी मत देणे आम्ही सुज्ञपणे टाळत आहोत. झाकली मूठ सव्वा लाखाची!) त्यावरून सुचलेली एक रचना खाली देत आहोत. आमच्या 'कविते'ची मजल काही केल्या याहून पुढे जात नाही!


सखीच्या मुखी लागण्या वाव आहे
मिठी मारण्यालाच अटकाव आहे ...!

तुला काय सांगू मनी कोण माझी ?
वरण-भात तू, ती वडा-पाव आहे...!

तुझ्याशी सुरू, वाट संपे तुझ्याशी
मलैकाकडे ना मला वाव आहे ! : (

नको 'हाफ' मजला, नको 'फुल्ल' खंबा
पुणेरी तृषेला पुरे 'पाव' आहे

पुन्हा शोधण्याला चला काव्यसावज
पुढे आज कोरा नवा ताव आहे !

फुकाचे यमक जोडसी खोडसाळा
कवींच्यामध्ये ना तुझे नाव आहे

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds