आमचे प्रेरणास्रोत : प्रदीप कुलकर्णी यांची गझल "शब्द मी आहे असा...!"


अर्थ त्याचा लावण्याचा यत्न साऱ्यांनीच केला!
अर्थ काव्यातून माझ्या एकदाही ना उदेला !

हा कवी झाला कशाला, कैकदा वाटून गेले...
द्याल का याला कुणी हो, शाल, श्रीफळ आणि शेला ?

ना जनाचे, ना मनाचे, ऐकले नाही कधीही...
हा जरासुद्धा न थांबे, हा कवी कसला हटेला !

खेळ आहे वाचकांचा चालला पळता भुईचा
अन्‌ इथे ओठंगलेला काफ़ियांचा रोज झेला !

रोजच्या घायाळ किंकाळ्या बिचार्‍यांच्या नकोशा...
यातना झाल्या अशा की जीव कवितेनेच गेला !

ते कवी गांभीर्यपूर्वक प्रसवुनी जातात कविता
रोज आकांतामुळे त्या सुन्न मेंदूचा तबेला!

राहिले बाकी न काही, जाहले सांगून सारे
रिक्त पातेल्यात बसतो कालथा घालून मेला !

रोज तो कोठे न कोठे काव्य करणार्‍यांस भेटे...
हाय, हा संपेल केव्हा खोडसाळाचा झमेला ?

आमची प्रेरणाः कविवर्य सुरेश भट यांची अजर, धगधगती कविता "उषःकाल होता होता काळरात्र झाली"


काल रात्र झाली !
घरी पुन्हा पत्नी वाही शिव्यांची लाखोली ! ॥धृ॥

आम्ही गोड शब्दांची त्या आस का धरावी ?
जे कधीच नव्हते त्यांची वाट का पहावी ?
कडू कारल्याच्या जिभेवरी जर पखाली ! ॥१॥

रोज घाव करिते पत्नीची जिह्वा कट्यारी;
रोज वंश सासरचा ती समूळऽ उद्धारी !
आम्ही गप्प ऐकत असतो आमुची खुषाली ! ॥२॥

अंत:पूर केले आहे बंद आम्हासाठी
ओसरीवरी ती धाडे निजावयासाठी !
आम्ही ते पती की ज्यांना बायको न वाली ! ॥३॥

उठा-बशा काढत काढत संपल्या उमेदी !
असा कसा झालो माझ्या घरी मीच कैदी ?
मी अपार दु:खी, माझी चालली हमाली ! ॥४॥

उभा फ्लॅट झाला आता एक बंदिशाला
जिथे सिंह ताटाखालिल मनी-माऊ झाला !
कसे पुरुष दुर्दैवी अन्‌ स्त्रिया भाग्यशाली ! ॥५॥

धुमसतात अजुनी उदरी भुकेचे निखारे !
अजुन अन्न मागत उठती रिक्त पोट सारे !
दूषणेच पत्नीची ती आम्हाला मिळाली ! ॥६॥

बरसतात ’खोड्या’वरती जिभेचे निखारे !
अजुन रक्त काढत बसती शब्द बोचणारे !
आम्ही महिषरूपी राक्षस; भासते ती काली ! ॥७॥

खेळा खो खो रे

मूळ जमीन

खेळा खो खो रे, खेळा खो खो रे
खो देउन त्या पुढे पळाल्या, तू मागे धाव रे!

कट्ट्यावरल्या चिमण्या, साळू
माझ्या राजा नकोस पाहू
पिकल्या पाना, तुझ्या, जाहली अब्रूची लक्तरे!

"पुरे खेळणे", वदली बाला
थांबव चाळा, थांबव लीला
गुमान येऊन घरी भेट तू माझ्या बापा, रे!

केस पांढरे त्यांचे झाले
नातवंड मांडीवर आले
ललनांनी ज्या कधी मारले तुज डोळे घारे!

(बाळ्या!)

आमची प्रेरणा : भूषण कटककर यांची कविता बाळ्या!


प्यायले चकण्याविना त्याला उगाचच
त्रास देते पेय ते आता उगाचच

शब्द माझे मोडले मी शांत निजता
काढला काटा कुणी, माझा उगाचच

बिल तसे ठेवून गुत्ता सोडतो मी
मित्रही म्हणतात फुकटा का उगाचच ?

पचवले नाहीस हे लक्षात येते
ढवळवे उदरास हा वारा उगाचच

आपली बाळी म्हणे, " बाळ्या, शहाण्या"!
घालतो आहेस का गाद्या उगाचच ?!

भासलो नाही कवी मी एकदाही
जे नसावे ते कसे भासा उगाचच?

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds