प्रोफेसरांच्या (प्रा. सतीश देवपूरकर) बहुप्रसव व प्रतिभाशाली लेखणीतून झरलेल्या "कधी मी आगही प्यालो, कधी मी झोकला वारा!" ह्या गझलेने प्रेरित होऊन आम्ही केलेले हे पांढऱ्यावर काळे. प्रोफेसर, तुमच्याच शब्दांत सांगायचे तर,

"छान आहे तुझी गझल! आवडली.
फक्त अभिव्यक्ती थोडी अजून प्रभावी हवी होती.

आम्ही तुझी गझल अशी वाचून पाहिली......"

कधी मी एक पेग्‌ प्यालो, कधी मी झोकल्या धारा!
कधी केलाय मी शिमगा, कधी केलाय पोबारा!

गळाले नाक चाफ्यासे तिचे सर्दीमुळे ऐसे
रुमालावर तिच्या वाहून तो सुकलाय लिप्तारा

तिचे ते ओठ सुजलेले, जणू बोटॉक्स केलेले!
कसे चुंबायचे त्यांना, तिच्या दातांसही तारा!

फिकिर नाही, जरी माझी निघाली धिंडही येथे;  
जगाला लाभलो शायर, करिन हुकमी गझलमारा

दिल्या गझला किती त्यांना? कुठे मी मोजतो आहे?
मला पाहून केला वाचकांनी आज पोबारा

"मलाही" आकळेना का "स्वत:ची" आणि मग "माझी"
दिसे हा शेर 'खोड्या'ला द्विरुक्तीचाच डोलारा!


.....ना(ध्यापक) खोडसाळ
पद्यार्कचित्रण व निर्विष चिमटे विभाग,
रोजच्या खोड्या महाविद्यालय,
मु. पो. भादवि ४२०,
मराठी आंतरजाल

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds