शूल

मनोगत बंद असल्यामुळे मनोगतावरील खोडसाळासह अनेक विडंबक उपाशी आहेत.विडंबन करण्यास साहित्यिक खाद्य मिळेनासे झाल्यामुळे तडफडत आहेत. विद्येच्या माहेरघरी पुण्यनगरीत आमचे मित्र, थोर विडंबक केशवसुमार, ह्यांची अवस्था बिकट आहे. आम्हीही पाण्यातून बाहेर काढलेल्या मासळीसम झालो आहोत.(स्वत:ला 'आम्ही' म्हणणं कसं छान वाटतं म्हणून सांगू!)मनोगतींच्या प्रतिभेचं खाद्य विडंबनासाठी उपलबद्ध नसल्यामुळे नाइलाजाने आम्ही नजर वर नेली. महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ गझलकार, कै. कविवर्य सुरेश भट यांचा 'एल्गार'काल परत वाचत होतो. त्यातील 'हूल' ही गझल वाचताना लेखणी पुन्हा फुरफुरू लागली.स्वत:ला रोखण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण नाही जमलं. कुत्र्याची शेपुट काही सरळ होत नाही व जित्याची खोड (खरं तर खोडसाळाची खोड)काही मेल्याशिवाय जायची नाही.

कविवर्य सुरेश भट ह्यांची 'हूल'
उंबऱ्याने ‘नको रे!’ म्हणावे
अंगणानेच का गुणगुणावे?

आठवेना कधी प्रेम केले…
चांदण्यालाच का आठवावे?

देश आहे जरी हा फुलांचा
हे उन्हाच्या घरांचे विसावे!

श्वास हे श्वास नाहीत माझे…
हे तुझ्या लाजण्याचे सुगावे!

साक्ष काढू कशी आसवांची?
मागती लोक खोटे पुरावे!

सोसतो हा कसा आरसाही
अंग ओले तुझे बारकावे

भेटतो कोण येथे कुणाला?
भेटती एकमेका दुरावे!

धन्य झाले तुरुंगात कैदी…
शृंखलांची किती गोड नावे!

गाव माझे मला सापडेना
हूल देतात सारीच गावे!

----------------------

अन 'हूल' वाचून उठलेला आमचा खोडसाळ शूल

चुंबिताना ‘नको रे!’ म्हणावे
दूर पण तू जराही न व्हावे!

आठवेना कधी प्रेम केले…
रोज डोके तुझे का दुखावे?

बाज आहे जरी ही फुलांची
इंगळ्यांनी तिथेही डसावे!?

एकही मूल अद्याप नाही…
हे तुझ्या लाजण्याचे पुरावे!

धिंड काढू चला गाढवांची
माणसांवर तयांनी बसावे!

षौक आंबट असे आरशाला
अंग ओले तुझे का पहावे?

भेटते कोण नवऱ्यास टवळी?
पाहिजे बायकोला पुरावे!

लग्न, संसार, पत्नी, कलत्र…
शृंखलांची किती गोड नावे!

पाववाली मला सापडेना
मोत मेरीस जाऊन यावे!

नाव घेता तुझे, खोडसाळा
शूल उदरी कवींच्या उठावे!

सध्या मनोगतचा सर्वर, चुकलो, विदागार, 'अकस्मात अपघाताने' बंद पडलेला असल्यामुळे अस्मादिकांसह साऱ्याच मनोगतींची फार गोची, आपलं, अडचण (ही कट्ट्याची भाषा एक दिवस गोत्यात आणणार आहे!)झाली आहे. गोपनीय सुत्रांनी दिलेल्या खात्रीलायक माहितीनुसार मनोगतावरचे अनेक पडिक सांप्रत 'मनोगत withdrawal' ने बाधित आहेत. ह्या रोगाची लक्षणं drug withdrawal शी मिळती-जुळती असून बरेच मनोगती गेल्या काही दिवसात मानसोपचारतद्न्यांकडून उपचार घेत आहेत असे समजते.दर दोन मिनिटांनी मनोगत उघडून बघणे, कळफलकावरील सारी बटणं बडवणे, व प्रशासकांच्या नावाने शिमगा करणे हे जेहत्तेकालाचेठायी बहुतेक साऱ्या मनोगतींच्या घरचे चित्र आहे, महाराजा. कळफलकावर व उंदरावर काढलेल्या रागामुळे अनेकांचे संगणक बिघडले असल्याचे समजते.रोगग्रस्त मनोगतींच्या उपचाराचा खर्च मनोगतींच्या बायका (प्रत्येक मनोगतीची एक, भलते अर्थ काढू नये)/नवरे(नियम तोच) प्रशासकांकडून वसूल करण्याच्या विचारात आहेत. त्यासंबंधी त्यांनी कायदेतद्न्यांशी संपर्क साधला आहे.

आमचा वार्ताहर असेही कळवतो की मनोगतींमध्ये सध्या 'अकस्मात अपघात'ह्या विषयावर कलगी-तुरा रंगात आहे. काही मनोगतींच्या मतानुसार, अपघात हा , व्याखेनुसार (by definition)अकस्मातच घडतो. तेव्हा 'अकस्मात अपघात'ही द्विरुक्ती होते असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु प्रशासकांच्या कंपूतील, आपलं, प्रशासकांशी सहमत(हा खास मनोगती शब्द!) मनोगतींच्यानुसार अपघात हे दोन प्रकारचे असतात, अकस्मात व नियोजित. मात्र विदागाराचा सध्याचा अपघात हा (सु)नियोजित होता काय ह्या प्रतिप्रश्नावर त्यांनी गांधीवादी मौन धारण करीत मो.क.गांधींसह मोक्का (की टाडा) फेम संजू बाबांनाही मानवंदना दिली व सत्याग्रहावर असलेल्या प्रशासक मंडळाच्या गांधीगिरीचे अनुकरण केले.

समस्त मनोगतींना सुचना! ऐका हो ऐका!हल्ली बाजारात एक नवीन पुस्तक आले आहे. मी कालच घेऊन आलो आणि सध्या त्याची पारायणं करतो आहे.अत्यंत मौलिक माहितीने भरलेले व तमाम मनोगतींसाठी अत्यावश्यक असे हे पुस्तक तुम्हीही लवकरात लवकर आणा ( अर्थात विकत. अहो, माझा चरितार्थ नको का चालायला? तिथे आमची सौ. तो 'Home Minister' नावाचा कार्यक्रम पाहून "पैठणी हवी" म्हणून हटून बसली आहे. त्या बांदेकराला कुणीतरी आवरा रे! ) ह्या बहुमोल, बहुगुणी, बहुरंगी, बहुढंगी, इ. इ. पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे चित्र खाली देत आहे :

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds