मुर्दाड

मूळ कविता : मृण्मयी यांची शृंगार


संपव आता उपास माझा, जेवायाला वाढ मला
खूप वडाला पूजपूजले, अता नको ते झाड मला
फुकट जेवसी, घोरत पडसी, उठून लागसी ढोसाया
उगा रिकामा पडून राहसी, दिवसा-रात्री नाड मला !
हात-तोंडाची पडे न गाठ, उत्कट व्हावी मिठी कशी ?
सोयरिकीचे तोडून बंधन , नवा लावू दे पाट मला
मनोमनी मी जरी वांछिते, नेई न कोणी हरून मला
नवऱ्याशी वादंग रोजचा, माहेराला धाड मला
हरेक जन्मी पुन्हा पुन्हा का होते अपुली भेट मढ्या ?
याही जन्मी हाच मिळाला, का नवरा मुर्दाड मला ?
कसे खोडसाळा समजावू, वरवरचा त्रागा आहे
रिझवाया मी आले तुज, समजोत कुणी बेचाड मला

पौर्णिमा

आमची प्रेरणा - चक्रपाणि यांनी कोजागिरीच्या शुभमुहूर्तावर प्रकाशित केलेली औचित्यपूर्ण गझल/कविता पौर्णिमा.

लाजरी भासत जरी आहे समोरी पौर्णिमा
काय सांगू, ती खरी आहे टपोरी पौर्णिमा

चिंब हिरवळ, रात मखमल, प्रेममय वातावरण
मारते पण भाव नाकेली मुजोरी पौर्णिमा

साबणाचा वास तो घरभर पसरला, लाडके
तुंबलेली साफ कर ती त्वरित मोरी, पौर्णिमा !

राखरांगोळी तुझी मी आज करते राजसा
पाहसी शेजारची तू का छचोरी पौर्णिमा ?

बघ तिला, कोजागिरीला टॅन होऊ पाहते
राहते हल्ली जराशी पाठकोरी पौर्णिमा

तसा नेहमी...२

आमची प्रेरणा - अजब यांची सुंदर गझल तसा नेहमी...

तसा नेहमी बासुंदी मी असायचो
तिच्या मुखी कारलेच हो‍उन बसायचो

उमेद होती बघण्याची जेव्हा तिजला
खिजगणतीतही तिच्या कधी मी नसायचो...

ओळख माझी कसे विसरले अताच हे?
उधार देउन किती जणांना फसायचो !

पाडत होतो कवने मी पूर्वीदेखील...
पण कवनांवर लेखन-कंबर कसायचो...

टवाळ होतो, नव्हतो लोचट इतका मी!
क्वचित-प्रसंगी खोडसाळही असायचो...

मिसळ

कैक सारे मिसळ खाया लागले
अन्‌ रुचिपालट कराया लागले

हा असंतुष्टांस अड्डा लाभला
रुष्टणारे चळवळाया लागले

वाजले स्वातंत्र्यडंके जालभर
दो दिसांनी शांत व्हाया लागले

बंदुका स्कंधी दुज्याच्या ठेवुनी
पारधी पारध कराया लागले

'प्रसव'पत्राची करोनी डिलिवरी
पोस्टमन कोणी ठराया लागले

'वीजवाटा' तद्न्य तो लावे छडा
नाव पोष्ट्या कोण घ्याया लागले !

बादरायण जोडुनी संबंध ते
'प्रसव'ण्या बंदी कराया लागले

जाहली ऐसी तिखट मग मिसळ की
वाचता ठसके बसाया लागले

Tor वा सायबरकफेच्या आडुनी
बाण शत्रुंवर पडाया लागले

हाय, एकाची इथे नावे किती
फसवणारेही फसाया लागले !

जाग सरपंचा कधी येईल का ?
लोक त्याला वापराया लागले

चप्पल

प्रेरणा : मिलिंद यांची गझल सल

बंदिस्त जाहल्याची सल काळजास आहे
झाला विवाह आता नरड्यास फास आहे

ओल्या अजून जखमा आहेत यौवनाच्या
अन्‌‍ याद चप्पलेची फुटल्या मुखास आहे

पाहून ज्या फुलाला झालो सख्याहरी मी
दुसऱ्या कुणा मिळावे हा दुर्विलास आहे

बंदिस्त फूल करुनी बरणीत ठेवले मी
गुलकंद त्यास करुनी मी घेत घास आहे

एका करांगुलीने जे खोडसाळ सांगे
शब्दांत सांगणे ते अश्लील खास आहे

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds