(प्रयोग)

प्रेरणास्रोत : प्रयोग

चेहर्‍यावरील खुणा लपवण्यासाठी,
कधी-कधी प्रयोग करावे लागतात स्वत:वर

उगाच कोणी असं
इलेक्ट्रॉलिसिस करून घेत नाही आपल्याच ओठावर.

आमची प्रेरणा : मोकळे असू द्या


नकोत ओझी काव्याची, मोकळे असू द्या

कधी तरी रसिकांनाही मोकळे असू द्या

उगाच लाठ्या ओळींच्या घालता कशाला ?
कशास त्या अमुच्या माथी, मोकळे असू द्या

असोत, जर काव्याचे शेवाळले सरोवर
अम्हास गद्याचे पाणी मोकळे असू द्या

दिसून यावा बुरख्यातिल चेहरा प्रियेचा
असे वसन आरस्पानी, मोकळे असू द्या

असो मुखी यवनी अथवा खोडसाळ गोरी
हृदय मराठीच्यासाठी मोकळे असू द्या

(गमक)

प्रेरणास्रोत : मिल्या यांची गझल "गमक"


कसे जगावे सुखात ह्याचे मला कळाले अता गमक
इथे तिथे शोधणे कशाला? हवी कुणी ठेंगणी सुबक

खरोखरी छंदमुक्त लिहिणे सदैव जर का तुला हवे
मना सुचे ते लिही अगोचर, कशास जुळवायचे यमक?

लगेच ढुसतील कोपरांनी वयात येताच तू जरा
टिकायचे तर निदान सँडल तरी असावी तुझी टणक

उगाच नामोनिशाण जैसे कशास अल्फ़ाज़ घ्यायचे?
कशास सोडायचे मराठीवरी असा रीतिने उदक?

पडेल हे उन्मळून माझे क्षणात बेजार टाळके
तुझ्या बडबडीमुळे अशी डोचक्यात जाईल ही सणक

उगाच व्रतभंग व्हायचा जर दिलीस उत्स्फूर्त चुंबने
कशास तव चेहर्‍यास इतके दिसायला पाहिजे कडक?

खलास केलेस तू कवींना... दिला न सोडून एकही
सुचायला ही विडंबने, लेखणीत, खोड्या, हवी चमक

प्रेरणा : मानस६ ह्यांची सुंदर गझल "वादळाची ह्या जगा चाहूल जेंव्हा लागली"

तांदळाची ह्या घरा चाहूल जेव्हा लागली
भात सार्‍या रांधती, मी खीर, चकली रांधली!

शेवटी आलास सगळ्यांच्या वसंता, Hi, पण;
आज माझी डायरी आहे फुल्यांनी झाकली!

जावयाच्या चाचणीला पास झाली शेवटी
चप्पला झिजल्या खर्‍या, पण घोडनवरी चालली!

चालतो मी पावसातुन एवढ्यासाठीच की,
ना कुणालाही दिसावी पँट ही ओलावली!

वर्ग ह्याचा कोणता, काढा बरे घनही जरा;
कॅल्क्युलेटरची कशाला गरज भासू लागली?

स्वाद तोंडाला हवा लावण्यगीताचा, सखे!
भावगीती गुळमटाची सवय मागे सांडली

दूरदेशी वाहते माझी प्रिया माझ्यापुनी
गावली मज नाय, हिरव्या कार्डवाल्या गावली!

अंग उघडे.. कापडाने व्यापले होते कमी!
विघ्नसंतोषी कुणी पण शाल त्यावर टाकली!
-खोडसाळ

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds