आमची प्रेरणा :- जयशी अंबासकर यांची कविता अशक्य केवळ


कशास वावर मनात केवळ ?
भ्रतार असला अशक्य केवळ

नको अता तुज वरणभात मी
हवी काकडी खमंग केवळ

तुझ्यामुळे ही सुषुप्त गात्रे
सदा घोरणे तुझेच केवळ

जरा तरी तुज हुक्की यावी
कसे करावे उपास केवळ

हवी नव्याने सख्या उभारी
किती कराव्या खोड्या केवळ ?

प्रदीपपंत कुलकर्णी यांच्या "स्मरेना चेहरा आता...!" या कवितेने प्रेरित होऊन ...!



...........................................
स्मरे का चेहरा म्हणुनी...!
...........................................

किती हा काळ विरहाचा; तुझ्या कायम मनाईचा
स्मरे का चेहरा म्हणुनी मला दुसर्‍याच बाईचा ?

घशाची शुष्कता शमवायला शोधू कुठे टपरी ?
मला देशील का थोडा चहा तू दाट साईचा ?

कितीदा वाक्य उच्चारी, "तुझ्याशी लग्न का केले ?"
"कशाला ऐकला सल्ला न मी तेव्हाच आईचा ?"

जुन्या त्या भांडणांच्या तारखा का शोधशी आता?
इरादा फौजदाराच्याकडुनी सरबराईचा ?

कळीचा प्रश्न कानाआड केला पांडुरंगाने...
"तुझ्या नावात पांडू अन् तुझा का रंग शाईचा ?"

तुझ्या नावामुळे झाली कशी रंगीत ही जादू ?
फिकटले चेहरे सारे...म्हणाले, "फोन ’भाई’चा !"

असा आतून-बाहेरून काटेरीच आहे मी...
कुणी घेण्यास पंगा येत नाही लाल माईचा !

सफाईदार साबण लावला आहेस तू आधी...
सरावाने अता जमतो तुला स्मश्रू सफाईचा!

जमे हे काव्य थोडे; तोच होई वेळ ’खोड्या’ची
कुणी पत्ता दिला याला कवींच्या या सराईचा ?

- खोडसाळ
.............................................
पुनर्रचनाकाल ः २१ मार्च २००९
.............................................

(अज्ञेय)

आमचे प्रेरणास्रोत : कोहम् यांची गझल अज्ञेय

कविवर्यांचा वाटेवरला वृश्चिक आहे
म्हणून माझा जालावर बदलौकिक आहे

भक्ष्यासाठी वणवण करतो जालावरती
इलाज नाही, विडंबनाचे आह्निक आहे

तिला भेटण्या असेन गेलो अनेकदा मी
अंगाला ती कुठे लावते, नॉन्स्टिक आहे

मिठी सोडता घोरत पडतो खुशाल मेला
नवरोबांची ओळख ही सार्वत्रिक आहे

हात तिने हातात दिल्यावर नकोस थांबू
वाटायाचे तिला किती हा अरसिक आहे

कसल्या गप्पा लग्नाच्या तो कवी मारतो
करार हल्ली सौख्याचा नैमित्तिक आहे

नाही कौतुक, नाहित वाचक, 'अर्थ'ही नाही
जरी खोडसाळाची रचना मार्मिक आहे

आपल्या सर्वांच्या मायमराठीने सोडलेला सुटकेचा निश्वास सध्या मराठी जालविश्वात सर्वत्र ऐकू येत आहे. तिच्या या आनंदाला कारणही तसेच आहे. गेली काही वर्षे तिला पीळ पीळ पिळून घेतल्यावर श्री. मिलिंद फणसे यांनी आपली मेहेरनजर (पक्षी : वक्रदृष्टी) यावनी भाषेकडे, चुकलो, ज़ुबानकडे, वळवली आहे. (कोण आहे रे तो "बुरी नज़रवाले तेरा मुँह काला " म्हणणारा ?!) हे ऐकून मायमराठीस जरी हर्षवायू झाला असला तरी उर्दूअम्मी रडत रडत अश्फ़ाक़ परवेज़ कियानी व मुल्ला ओमरकडे गेल्याची खात्रीलायक बातमी ISI मधील आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

तद्दन बाजारू हिंदी चित्रपटगीते ऐकण्यापलिकडे हिंदी/हिंदुस्तानी/उर्दूशी कोणताही संबंध आलेला नसताना मिलिंदमियाँना त्या भाषेत शेर लिहिताना (की कहताना ?) बघून आम्ही जलकर खा़क न होतो तर नवल ! लाहौल विलाकुवत ! अरे, चार-दोन हिंदी सिनेमे आम्हीही पाहिले आहेतच की. तो राजकुमार का कोण म्हणतो ना, "जानी, हम किसीसे कुछ कम है क्या?! हम हम है, बाकी सब पानी-कम है!" तेव्हा मिलिंदमियाँपासून स्फूर्ती घेऊन म्हणा किंवा जलकर खा़क हो‍ऊन म्हणा, आम्हीही ठरवले - यवनांवर नाही तर नाही, निदान यावनी(भाषे)वर तरी प्रभुत्व मिळवायचेच! देखना है ज़ोर कितना बाजू-ए-खोड्यामें है...


जिस ओर देखता हूँ कितनी बिमारियाँ हैं
हैज़ा, मलेरिया या सीनें धुवाँ धुवाँ हैं

बिजली को गुल कराके पूछें अवा़मसे वह
माथेंपे क्यों पसीना, क्यों बंद बत्तियाँ हैं ?

आए करीब इतने हम प्यार के सफ़रमें
गुस्सा मुहाफ़िजोंने दी खूब गालियाँ हैं

वह रूठनाभि, यारों, मेंहंगा हमें पडेगा
दीदारेअश्रफ़ी क्या जब चार बीवियाँ हैं ?

सायें हैं ज़िंदगीपर गुजरी हुई शबोंकें
हड़तालपर है बीवी, बच्चों को छुट्टियाँ हैं

लो, शाम आ गयी है उनकी शिकायतोंकी
इल्ज़ाम रातभर अब, मैं हूँ, सफ़ाइयाँ हैं

(चुंबन)

प्रेरणा : श्री. प्रसाद कोलते यांची कविता चुंबन


प्रियेचे पहिले चुंबन
हाय मजला असे भाजुन गेले
वैशाखातही नसतील भाजले
माळरानावरील दगड आणि धोंडे

तीच्या कम नीयर ओठांची
मजल्या मजल्यावर चर्चा झाली
टुणटुणलाही पालटुन नसती दिसली
अशी रुंदी आज मी बघितली

चुंबन तीचे घेताना
त्राहिची आशा मिटली
निशस्त्र मी शाकाहारी
ती मांसाहारात शिर-शिर-शिरली

तिचे चुंबन तिचे आलिंगन
वाटले नसावे सोसणे याहून काही
जीवन याहुन असावे काय भयंकर
नासावी जीवनाला हि अशी अख्ख्या का ही

(फायदा?)

आमचे प्रेरणास्रोत : आदरणीय भूषणसाहेब कटककरसाहेब यांची रचना "फायदा? "



हो न हो, ठेहरूच, देखू ठेहरण्याचा फायदा
ठेहरणे येभी असावा चालण्याचा फायदा

मालकाचा त्रास सोसावा कसा हे जाणले
हा तुझ्या हपिसात आम्ही राबण्याचा फायदा

लीन केव्हा व्हायचे, पत्नीपुढे वाकायचे
जो शिके त्यालाच रात्री जागण्याचा फायदा

घेत गेलो मी मुक्याने बोलण्याचा फायदा
खूप मज झाला असे त्या चुंबण्याचा फायदा

दात तू घासायचे होतेस मित्रा टाळले
दंतवैद्यालाच झाला उपटण्याचा फायदा

रोज कोणी वेगळी पाहून मादक हासते
हाच आहे बारबाला पाहण्याचा फायदा

रोज कोणी वेगळा बापूस पोहे घालतो
हाच उपवर कन्यकांना पाहण्याचा फायदा

केवढा मी क्षुद्र मज कळलेच नसते हे कधी
केवढा हा बायकोशी बोलण्याचा फायदा

जागते पत्नी असे हा घोरण्याचा फायदा
घोर बघता रूप कळतो झोपण्याचा फायदा

फार होता त्रास छोटे पोहता मासे इथे
लाभला पण त्यात काटा काढण्याचा फायदा

घेतला नाहीच आपण नांदण्याचा फायदा
काय असल्या संयमाने वागण्याचा फायदा?

मी तुझी आई तुझी आई तुझी आई तुझी
घेतला आहेस म्हणुनी बडवण्याचा फायदा

खोडसाळा खूप कवितावाचनाचा फायदा
शब्द दुसर्‍यांचे, मिळे मज लाटण्याचा फायदा

प्रेरणा : 'क्षणाचा सोबती' यांची कविता 'संधी आणि मंदी'


मंदी आणि कुंदी

यांची कधी होत नसते ’जुगलबंदी"?

दोघी एकमेकींच्या सवती

घुटमळतात दोघी नवर्‍याच्या अवती भवती

मंदी असल्यास कुंदी पाळत ठेवते

कुंदी दिसल्यास मंदी तिला जळवते

मंदी चुकवता येत नाही

कुंदी रुसली की जवळ येत नाही

मंदी जाता जात नाही

कुंदी येता येत नाही

मंदी जाण्याची वाट बघावी लागते

कुंदी येण्याची वाट बघावी लागते

मंदी असताना चुकून कुंदी आली तर

हे नवर्‍या तिला झापलेसे कर

अन्यथा मंदी तिला खाऊ की गिळू करेल

आणि नवर्‍याची कंबख्ती ओढवेल

एक मंदी पुरे आहे घराला डोक्यावर घ्यायला

मात्रा फक्त एकच योग्य; कुंदी आवश्यक आहे, मंदीला जळवायला...

मंदीला जळवायला...!!

आमचे प्रेरणास्रोत : भूषण कटककर यांची मस्त गझल बोलणे त्याचे मनापासून ते...


ती म्हणाली तेच झाले शेवटी
ढोसली अन्‌ रेच झाले शेवटी

बोलणे बेंबीतळापासून ते
श्रोतृगण बहिरेच झाले शेवटी

एवढा खोटे खरेच्या कच्छपी
की तिला पोट्टेच झाले शेवटी

हालचाली आमच्या थंडावता
व्हायग्रा होतेच, झाले शेवटी

खात मी बसलो अधाशासारखा
आतड्यांचे पेच झाले शेवटी

प्रेम ज्यांचे नाव होते ठेवले
ब्रह्मचारी तेच झाले शेवटी

खोडसाळा, तू जसा देवास त्या
काव्यही प्यारेच झाले, शेवटी

देखणी / लेखणी

प्रेरणा : 'लेखणी'

काय मी सांगू तुला, केव्हा उचलली देखणी
तू घरी कटलास, येथे मी पटवली देखणी

पाहिले गौरांगनांसम चालता तिज रँपवर
मालफंक्शनले वसन जेव्हा घसरली देखणी

पाहिले नव्हते कुणी, शृंगारली ना तोवरी
पाहण्याची रीत नडली, रोज नटली देखणी

अर्थ गुजगोष्टीत नही, अर्थ नाही मीलनी
अर्थ बँकेतील सच्चा अर्थ, वदली देखणी

कोडकौतुक खोडसाळाने तिचे केले तरी
बोहल्यावर, हाय, दुसऱ्याचाच चढली देखणी

------------------------------------------------------------------


प्रेरणा : लेखणीचा उत्तरार्ध

'पिंड गाण्याचा नसे माझा', गरजली लेखणी
का तरीही कुंथुनी कविता चिरकली लेखणी?

फार शाई, फार कागद, लेखका संयम कुठे?
का, प्रभो, त्याची न तू अडवून धरली लेखणी?

काय अन् सांगू किती, होते असे अपचन तिला
शब्द वारा बापुडे अन् वातभरली लेखणी

जी करी चमचेगिरी राजापुढे, "तू ग्रेट बॉ! '
ती पुरी क्षेत्री रिघे, निष्ठा विसरली लेखणी

लादले निर्बंध ज्यांनी 'डायर्'ईया होउनी
हीच निर्बंधाविरोधी काल लढली लेखणी?

रावणासम दशजिह्वा, आयडी हजारो निर्मिले
पाग पाहून खेचरांची हसत सुटली लेखणी

वाचता काही कुणाचे, थांबली नाही कधी
खोडसाळा, काव्यरक्ताला चटवली लेखणी

आमची प्रेरणा : भूषण कटककर यांची बोल्ड ऍंड ब्यूटिफुल गझल 'गंधाच्या उलाढाली'


जरा चुंबावया जाता तिला, मळमळ मला आली
तिच्या तोंडातल्या हुंगून गंधाच्या उलाढाली

तुला जे पाहिजे होते तसे केलेस तू सारे
तुला पुष्कळ मजा आली परी मजला इजा झाली

उभी आहेस तू माहीत आहे पण कुणासाठी ?
कुणी शिट्ट्य़ा तुला मारून जातो खालच्याखाली

रचावे काव्य कोणीही, कुणी मोरीत रेकावे
कुणा थोडे मिळाले मद्य की तो लावतो चाली

रडावे वाचकाने, काव्य वाचुनिया किती वेळा
चला झटकून टाकूयात या अंगावरुन पाली

जरा कोठे निघालो मी, कसा पायास तो ओढी
मराठी माणसाच्या नेहमी का खेकड्या चाली?

पुरेसे काफ़िये केव्हाच माझे जाहले गोळा
नको रे, खोडसाळा, काळजी, कविता, चला झाली!

प्रेरणास्रोत : भूषण कटककर यांची कविता "श्वासात ताल आहे"


बिनधास्त वाजवावी मजला कुणीही येथे
माझा सदाचसाठी उपलब्ध गाल आहे

भक्ती स्वतः:च करतो, मूर्ती स्वतः:च असतो
वरती स्वतः:स नमतो, माझी कमाल आहे

जितका जमेल तितका उपभोग घेत जावा
सध्यातरी दिरांचा मधुचंद्र-काल आहे

मदिरा खराब आहे, आंबूस वास येतो
व्हिस्की न ही, गड्यांनो, देशीच माल आहे

जाते कुठे नि येते, हंसा कुणास ठाउक
भलतीच संशयास्पद हंसाचि चाल आहे

कापू किती किती मी या गीतकार माना
करणार काय सांगा? बकवास माल आहे

रंगित रुमाल पाही नि त्यास खूळ लागे
नजरेत फक्त एका, बकरा हलाल आहे

आजार हा कवींना, जुळवत हजार यमके
वाचू तरी किती मी ? बस हाल हाल आहे

बावीस, हाय, ओळी, चालू असे परीक्षा
केव्हाच लागलेला माझा निकाल आहे

या वाचनात आला ओठांस फेस माझ्या
जडला विकार उदरी, गोटा जमाल आहे

झाले कथून तरिही सोडून जात नाही
ही खोडसाळकीची कसली कमाल आहे !

(विश्राम)

प्रेरणा : मिलिंद फणसे यांची गझल "विश्राम"


मान्य, गर्दी फार येथे पण तरी विश्राम आहे
रोजच्या वाटेवरीचा बार हा निजधाम आहे

छेडणे तिज सोडले पाहून अनुजाला तिच्या मी
रेशमाचा भाउ हल्ली वाढला बेफाम आहे

खूपसे हितशत्रू आणिक वानवा नाही रिपुंची
तेव्हढ्यासाठीच माझा चालला व्यायाम आहे

अत्तरे लेऊन अंगी भेटलो होतो तिला मी
चारुगात्रीला, परंतू, वाटले तो घाम आहे

चार खांदे शोधण्यासाठी निघाले प्रेत माझे
बोलले, "शववाहिनीचा फार सध्या दाम आहे"

'मूर्ति'पूजेचा गुन्हा चुकला कुणा; सारेच 'तसले'
पूजती कांता कुणी, इतरत्र कोणा राम आहे

येउनी टाकून गेला शब्दपाचोळा कवी तो
झाड कवितांगण, तुझे ते, खोडसाळा, काम आहे

आमची प्रेरणा : 'सोबतीचा आव आहे' ही जयंता५२ यांची हृदयद्रावक तक्रार.


भोवती अंधार आहे, साथ नाही
बायकोचा डाव आहे; वाद नाही !

कोणताही खेळ नाही आज सोपा
झोपली अद्याप काही ब्याद नाही

ठेवले नाही खुशीने शस्त्र खाली
हारलो मी, पण दिली तू दाद नाही

भेटण्यासाठी तुला जागाच होतो
घोरणे कानास आले, साद नाही

का अजुन दारात माझ्या माप आहे?
अंगणी येतात सार्‍या, आत नाही

खोडसाळा ती म्हणाली, "बाय, टाटा"
जाउ द्या, नावीन्य काही यात नाही :(

जबरी

प्रेरणा : पुलस्तिंची सुरेल ठुमरी


गालावरचा हात अताशा संगमरवरी नाही
पूर्वी होती तितकी 'ती'ही नवखी नवरी नाही

तिच्या कृपेने असतो दुखर्‍या मी जखमांनी भरलो
रोज प्रॅक्टिकल करते हल्ली, केवळ थिअरी नाही

रात्री विझलेल्या अन बेचव चोथापाणी जेवण
घडते रडके जगणे जेथे पत्नी जबरी नाही

कॉल तिचा आला अन बसला त्यास विजेचा झटका
नवर्‍याच्या हद्दीमध्ये वासूंची टपरी नाही

जगणे आता झापडलेले झाले घोड्यासम ते
खोडसाळकी नाही, बघणे मादक फिगरी नाही

मराठी माणसांच्या दुहीच्या प्राचीन व देदिप्यमान परंपरेनुसार व एका संकेतस्तळावरून फुटून निघून दुसरे काढण्याच्या अर्वाचीन पद्धतीनुसार (आठवा : मायढोली --> मौनगत -->भेसळ खाव) संक्रान्तीच्या शुभमुहूर्तावर फुटून निघालेल्या, आय मीन, स्थापन झालेल्या बजबजपुरीला खोडसाळाच्या हार्दिक शुभेच्छा. ऍमिबांप्रमाणे मराठी संकेतस्थळांची संख्याही विभाजनाने अशीच वाढत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.


खेचराच्या त्रासाने, शुद्धतेच्या जाचाने
मिसळपाव, मनोगत सोडीला
चालले मी आता बजबजपूरीला

नवी कोरी बजबजपूरी चित्त्याची
त्यात सोबत आहे त्याला कर्णाची
कर्णाची, बाई, कर्णाची
केशा आणि धोंड्याही घेतलेत जोडीला
चालले मी आता बजबजपूरीला

आणिबाणी लागू झाली तोर्‍यात
पंत होते गुंतुन पडले होर्‍यात
होर्‍यात जी होर्‍यात
ठसका त्याला काजूचा जोरात की लागीला
चालले मी आता बजबजपूरीला

लाज तात्याला ना आल्यागेल्याची
मुरवत नाही आया बायांची
बायांची हो बायांची
कल्पनेत पाठींना साबण की चोळीला
चालले मी आता बजबजपूरीला

(कविता - १)

कविता - १ मध्ये श्रीयुत दर्शनकुमार नेरकर यांनी केलेल्या प्रेमळ तक्रारीस त्यांच्या प्रियेने पाठवलेले उत्तर :


प्रियकरा,

इतकाही घट्ट

धरत जाऊ नकोस,

की तुझ्या धरण्यापायी

एखादीची गुदमरून हत्या व्हावी....

(रिक्त)

मूळ कविता : श्वास स्वातीचा यांची रिक्त


(रिक्त)
=========================
.
.
काही वात... नुसते,
आतल्या आत ढवळत राहतात..
सरून जात नाहीत.
तटतटल्या पोटामधून...
नुसती आग होत राहते..
साठलेल्या पित्ताची..
जळजळत..
शेवटचा घास जिरून जाई पर्यंत.
पोटाला फक्त जाणवत राहत..
रिक्त होण्या आधीच..
वातूळ रटरटणं..!
.
.
=========================
खोडसाळ..... ११-०१-२००९

आमचे प्रेरणास्थान : श्री. इलाही जमादार यांची अप्रतिम गझल अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. भीमराव पांचाळेंच्या आवाजात ती गझल इथे ऐका.

अंदाज तारखांचा चुकला जरा असावा
मधुचंद्र फार केला मी साजरा असावा

अंदाज बापसाचा वाटे खरा असावा
शेजारचाच चालू तो छोकरा असावा

जखमा कधी सुगंधी असतात का कुणाच्या?
कविराज काव्य रचता टल्ली जरा असावा

नाही अखेर कळले बोका कुठे पळाला
घेऊन मात्र गेला तो म्हावरा असावा

का आळ खंजिरावर घेता उगाच माझ्या
तुमच्याच एअरगनचा घुसला छरा असावा

काठावरी उतरली वसने खुशाल त्यांनी
चोरून पाहणारा का लाजरा असावा?

खेटून बायकोला बसुया, विचार केला
दारात दत्त म्हणुनी का सासरा असावा?

दारात ती उभी अन अधरा करून चंबू
तेव्हाच, हाय, भरला मी तोबरा असावा!

माझ्यावरी असावे ओझे विडंबनाचे
आडात काव्य तुमचे, मी पोहरा असावा

हा 'खोडसाळ' चेंडू घेई विकेट कवींची
हा ऑफब्रेक नाही, हा 'दूसरा' असावा

प्रियतमा!

प्रेरणा : प्रदीप कुलकर्णी यांची सुंदर कविता संभ्रमा!


......................................
संभ्रमा!
......................................

चंद्रमुखी होशील कसी तू...
तुझा चेहरा किती जाडसर
म्हणावेत हे कसे गुलाबी?
फुकून झाले ओठ काळसर!

नव्हेसही तू तशी बावळी...
मवाळ किंवा मुळी लाजरी
खमकी बाई अशी कशी तू
जीभ तुझी ती असे कातरी!

लालबुंद तव या डोळ्यांना
मोतिबिंदुचा रंग जरासा...
तशात जडली रांजणवाडी
पापण्यातुनी स्राव झरासा...!

प्रसन्नता तुज ठाऊक नाही
स्वभाव आहे जरा मिजासी
कशी तुला मी धनीण केली...
घरी आणली विकत उदासी!

काय हवे ते, लग्नाआधी
कळले होते तुला नेमके
शोधत आहे तुझे अता मी
वर्णन करण्या शब्द शेलके!

टुकार कोणी; भिकार कोणी
तुझी पसंती ना कळणारी
शेजार्‍यांच्या उंबरठ्यावंवर
सदैव तू तर घुटमळणारी!

कधी इकडची, कधी तिकडची...
कधी अशी तू... कधी 'तशी' तू...
नवरा-परका तुला सारखा...
मला पाडले पुरा फशी तू!!

अशी चंचला नको प्रियतमा
कुठून, वाटे, तुला पाहिली...
निघून तू गेलीस न्‌ सुटलो...
करेन पत्नी अता वायली!

- खोडसाळ
......................................
रचनाकाल ः २३ डिसेंबर २००८
......................................

(कूजन)

आमच्या प्रेरणेचे उगमस्थान : कुमार जावडेकर यांची गजल कूजन


(प्रियकरावर घालसी बंधन कसले?
हे दर्‍या-झुडुपातले कूजन कसले? )


ओढ ना ज्याला तुझी, ते मन कसले?
जवळ तू असता असे लंघन कसले?

बंद तू केलेस सारे दरवाजे...
चालले आहे छुपे प्राशन कसले?

चालले आहे मना चिंतन कसले?
सासरे आहेत रे कर्झन कसले...

तेच गाणे ओळखीचे येते, पण-
आदळे कानी नवे फ्यूज़न कसले!

खूप आहे घातलेले 'जीवन' पण
ज्यात नाही तेल ते मोहन कसले

खूप झाले घालणारे किरीट, पण-
ज्यास नाही 'क्वीन' ते राजन कसले?

फिरत बसशी तू सदाच्या नाकावर...
(चालले श्लेष्म्यात संशोधन कसले? )

सर्व येथे वाचण्या कविता तत्पर
खोडसाळा, केले विडंबन कसले?

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds