श्री. प्रदीप कुलकर्णी यांच्या एकमेवाद्वितीय दिवलीने आमच्या तामसी मनात पाडलेल्या प्रकाशात आम्हीही थोडे लेखन करून घेतले.....................................
... खोडसाळ आहे दिवटी!
....................................
मी रोज कशाला वाचू?
शब्दांचा असला चकवा....
त्यांना ही गाणी रचुनी
येईना कैसा थकवा!

ती जखम काळजामधली
मज रोज नका हो दावू
प्रतिसाद देउनी त्यावर
मी लेप कितीदा लावू?

थिजलेल्या गाण्यासाठी
का श्वास ताणवत जाई?
सांगून संपले सारे
हे त्यास जाणवत नाही?

टाकाया सज्जच होते
भय ना त्यांना पाट्यांचे
अवतार असावे बहुधा
चिपळुणकर वा माट्यांचे!

वाचल्याविना पण का हो
भाळावर पडल्या आठ्या
कवितावाचन मी करता
का गायब झाल्या पोट्ट्य़ा?

सक्तीचे-आसक्तीचे
मज प्यारे वादळवारे
गजबजले जे ललनांनी
पाहिलेत सर्व किनारे

मी दूर फेकला जावा
बेटावर निर्जन कुठल्या
हा नवस बोलती कविवर
मजविषयी उठल्या-सुठल्या!

सुटकेचा क्षण येईना
ही पानभराची शिक्षा
पाहतो देवही बहुधा
वाचकहो, सत्त्वपरीक्षा!

ओलांडिन सहजगत्या मी
या कविपंक्तींच्या राशी
खोडसाळ आहे दिवटी
अभिव्यक्तीची मजपाशी!

- खोडसाळ

....................................
रचनाकाल : १७ जुलै २००८
....................................

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds