प्रेरणा : पाहून वादळाला झाला पसार नाही

लावून वाद झाला मागे पसार नाही
अन् कोणत्या शिव्या तो देण्या तयार नाही ?

गेलो अनेक पोरी घेऊन थेटराला
काळोख किर्र होण्या काही तयार नाही

मी रोज तिज पाहावे दीपावलीप्रमाणे
आहे फटाकडी ती, ती वायबार नाही

उंची नसे हृतिकची, सलमानची न छाती
लुब्र्यास कोण सांगे, तो डौलदार नाही ?

शब्दांत रंग भरतो जो भाव-भावनांचे
मी व्यंगचित्र त्याचे साकारणार नाही ?

कविता करीत गेले तोट्यात ते बुडाले
कविता करावया मी बेरोजगार नाही

थकतील वाचणारे शोधून मौक्तिकांना
फुटके मणीच सारे, हा रत्नहार नाही

धिक्कार रोज होतो, होतो निषेध कायम
अजुनी विडंबितांचा घटला विखार नाही

'खोड्या' विडंबनाच्या करतो जरी, तरी मी
केशवसुमार नाही, केशवकुमार नाही :(

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds