प्रदीप कुलकर्णी यांची गझल ..समाधी! हिस वंदन करून आम्हीही समाधिस्त झालो. (ही बातमी ऐकून जालावरील आमच्या काही कविमित्रांना हर्षवायू झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे. असो.)
...................................
(...समाधी!)
...................................
खाऊन मुगाचा भात...निघालो आहे!
पाडून दुधाचे दात...निघालो आहे!
सामान, वळकटी आणि भरीला जाया...
घेऊन मुले मी सात निघालो आहे!
असतात दिवाणे कोण तुझ्या गे मागे?
मी खार तयांवर खात निघालो आहे!
रंगात उना, सानी मिसरा रंगवितो...
मी चित्रकला-निष्णात निघालो आहे!
माझे न कधी भिडणार सुराला गाणे...
मी वर्ज्य स्वरांनी गात निघालो आहे!
भांडेन जिथे जाईन तिथे मी; नंतर -
-होईल पुन्हा रुजवात...निघालो आहे!
घेईन समाधी, खूप विडंबन केले...
सोलून कवींची कात निघालो आहे!
- खोडसाळ
................................
रचनाकाल ः २९ मे २००९
.................................
Labels: विडंबन