वणवा २

मिलिंद फणसे यांच्या अंतरी पेटलेला "वणवा" वाचला आणि आमच्या तथाकथित प्रतिभेनेही पेट घेतला. ("एव्हढी काय घाई झाली आहे लिहिण्याची? काहीतरी वाचता आणि बुडाखाली आग लागल्यासारखे करता!मी एखादं काम सांगितलं तर वेळ नसतो तुमच्याकडे. इथे मी मात्र मर,मर, मरत्येय..." इति सौ. पुढील 'सं'भाषण साऱ्यांना पाठ असल्यामुळे देत नाही.)

जोगवा लक्ष्मीकृपेचा मागतो आहे
सर्व धन घोड्यावरी मी लावतो आहे

रोज मागे वंदनेच्या लागतो आहे
एक डोळा शर्वरीवर ठेवतो आहे

होय, सर्वांशी जरी मी बोलतो हसुनी
खास कोणा एकटीला गाठतो आहे

तीच फुंकर घालते अन्‌ दीप मालवते
आणि वर म्हणते "कशाला पेटतो आहे?"

वाहते देवा फुले पत्नी दिवस-रात्री
अन्‌ उशी नवरा तिथे कवटाळतो आहे

व्यसन मटक्याचे मला आहे असे जडले
लागला नाही कधी पण लावतो आहे

हाय ते पार्ट्यांस जाणे संपले सारे
फक्त दुपट्यांच्या घड्या मी घालतो आहे

मार्ग कैसे वेगळे होतील दोघांचे?
पोटगीचा आकडा भंडावतो आहे!

कोरडे डोळे निरोपाच्या नको वेळी
चोरुनी ग्लिसरीन आधी घालतो आहे

कुकू शिन्दे यांनी मांडलेल्या किंचित एकतर्फी लग्नाआधी......नन्तर... ची दुसरी बाजू मांडण्याचा आमचा हा प्रयत्न. यच्चयावत्‍ पीडित नवऱ्यांना (व खिलाडू वृत्तीच्या बायकांना) आमची बाजू थोडीबहुत तरी पटेल याची आम्हास खात्री आहे.


लग्नाआधी रूप वेगळे,
नंतर दिसती रंग वेगळे...

आधी... लांब रेशमी केस मोकळे

जीव सखे मम ज्यात गुंतला।

नंतर...सखी म्हणे हा त्रास फार मज

करून येते बॉब कुंतला।

आधी...तू आल्याची वर्दी देई

तुझ्या अंगीचा गंध आगळा

नंतर... सेंट प्रियकरासाठीच होते

नवरा मासा लावण्या गळा।

आधी...तू बोलावे, मी ऐकावे,

अंगावरुनी पीस फिरावे।

नंतर...तू बोलावे, तू बोलावे

तू बोलावे, तू बोलावे।

आधी...साखरेविनाही चहास गोडी

तुझ्या हातची अन्‌ अधरांची

नंतर...अगोड चहाही परवडला पण

मिठास यावी कैसी गोडी?।

आधी...तंग तुझ्या त्या कपड्यामधुनी,

तारुण्य तुझे घे नजर खेचुनी।

नंतर...असे बाळसे तू धरले की

कपडे सारे गेले उसवुनी।

आधी...कोमल, हळवी प्रिया तू सुंदर

फुलासारखी जपण्याजोगी।

नंतर...किती जिवाचे कौतुक केलेस

एक असूनही भासे दोघी।

आधी...दमला असशील, थकला असशील

सख्या, पाय मी चुरुनी देते।

नंतर...पुरेत नखरे, स्वप्ने आवर

अस्तन्या दुमड, झाडलोट कर।

आधी...गृहिणी, सचिव मी, सखी एकांती

राजा माझा तूच खरोखर।

नंतर...सम्राज्ञी मी माझ्या घरची

गुलाम तू तर, माझा नोकर।

...आता नको!

आमचे प्रेरणास्थान : प्रदीप कुलकर्णी यांची सुंदर गझल ...आता नको!

नको, डान्सचा बार आता नको
पुन्हा तोच झंकार आता नको

नका साथ नेऊ कुणीही मला
मजा ती मजेदार आता नको

हसू येत आहे अटीचे तुझ्या -
"मुलांचा मला भार आता नको!"

मला प्यार आहेत साऱ्याजणी
अशा दोन वा चार आता नको!

स्वत: मीच जेथे वळू व्हायचो
असा बैलबाजार आता नको!

गटारीस मजला असे वाटते
गळा कोरडा फार आता नको

नको डासविश्वातले हे जिणे...
नि हिंवताप आजार आता नको!

मुक्याचाच भारी मला सोस तो
तुझी त्यास तक्रार आता नको

तुझी वेळ होताच खाशील तू
अवेळी फलाहार आता नको!

तुझा बाप होकार देईल हे
खुळे स्वप्नसंभार आता नको!

गळेखाजव्यांनो कृपा ही करा!
गळ्यातून गंधार आता नको!

करी खोडसाळा विडंबन असे
कुणाचीच तक्रार आता नको!

"कसे जगावे...?" हे आम्हांस शिकवल्याबद्दल आम्ही प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर, यांचे अत्यंत आभारी आहोत. त्यांच्या या ऋणातून काही अंशी तरी मुक्त होण्यासाठी आम्ही खालील ओळी प्राध्यापक डॉक्टर मजकुरांच्या चरणी सविनय अर्पण करीत आहोत.


'कसे लिहावे...?..' भान तिजकडे भटकत राही
लिहू कसे, ती समोर माझ्या मटकत राही

उभा जरी मी पहारेकरी दारावरती
क्षणाक्षणाला मुलगी खाली सटकत राही

पळून गेली कार्टी याचे दु:ख न मजला
हिला न नेले सोबत हे मज खटकत राही

पुसून माझी स्थावर-जंगम क्षेमखुशाली :(
जगास टवळी सांगत सत्ये भटकत राही

जवळ करी ती बंगला, गाडी, पैसा माझा
मलाच केवळ झुरळासम ती झटकत राही

ध्यान माझे

आमची प्रेरणा : अजब यांची सुंदर गझल भान माझे...

हरवले आहे जरी 'हे' ध्यान माझे
चालले आहे तरी पण छान माझे!...

बोलला राहूल "मी मिस कॉल देतो"
ऐकण्या टवकारते मी कान माझे...

राहती खुर्च्या रिकाम्या नाटकाच्या
काळजी नाही, असे अनुदान माझे!...

चेहरा मी शक्य तितका रंगवावा
लपवण्या तारुण्य-पिटिका-रान माझे!...

जिंकली आहेच मी सौंदर्यस्पर्धा
घट्ट आहे जज्जशी संधान माझे!...

आरसा हसतोय पाहून ध्यान माझे
'खोडसाळा' तोकडे परिधान माझे

आमची प्रेरणा : राजगुडे यांची कविता मला प्यायला खूप आवडतं...


मला दमदार साहित्य लिहायला खूप आवडतं...

पण लिहिलेले कुणीतरी वाचायला पाहिजे...

आणि वाचून भरपूर प्रतिसाद द्यायला पाहिजे...

पण प्रतिसाद देण्यासाठी आधी वाचायला पाहिजे...

आणि त्यांनी वाचण्यासाठी मला नियमित उच्च प्रतीचे लिहायला पाहिजे..

आणि उच्च प्रतीचे लिहायचे तर कमी लिहायला पाहिजे...

मला दमदार साहित्य लिहायला खूप आवडतं... म्हणून कमी लिहायला पाहिजे...

पाखरू

आमच्या पाखरास उडण्याची प्रेरणा मिळाली अजबरावांच्या पक्षी कडून.

आज निराळी
सकाळ होती...
एक वेगळे
पाखरु येऊन
बसले होते
कट्ट्यावरती...

सगळी पोरं
जमली होती...
पाखरु त्यातच
रमले होते...

मला वाटले
पाखरास त्या
उडवून न्यावे...
याआधी की
त्या फडक्याने
मध्ये घुसावे...

चौपाटीची
वाट धरावी
चुकवून फादर...
खाऊ घालून
त्यास जरासे
जवळी घ्यावे...

पाखरु पण ते
अवली होते
भोळे नव्हते...
खाऊन - पिऊन
पसार झाले
बघता-बघता...

बोचरा

प्रमोद खराडे यांच्या गझलेने प्रेरीत होऊन सुचलेली आमची ही 'गझल'(शेवटी खोडसाळाची गझलकार होण्याची सुप्त इच्छा समोर आलीच!):

सासऱ्यासाठी असे हा धोतरा
सासुला देतो अळू मी खाजरा

भोवती माझ्या जरी साऱ्या जणी
जागता पण बायकोचा पाहरा

मारकीला कोण सांभाळेच ना
मी दिला गोठ्यात माझ्या आसरा

फक्त हे माझे जरी खाते असे
त्यावरी वीटो 'ति'चा असतो खरा!

दोस्तहो येऊ नका दारेपुढे
हा असे निवडुंग भलता बोचरा

मी न आहे तो, तुम्ही जो वाचता
खोडसाळाच्या पहा ना अंतरा

आमची प्रेरणा (हे वाचून एकता कपूरबाई आमच्यावर चोरीचा खटला तर नाही ना भरणार?) : अजबरावांची गझल कुठे म्हणालो

कुठे म्हणाले मला रांधणे आवडते?
खरे मला हॉटेलींग करणे आवडते...

नकोस सांगू मेनुतल्या किंमती मला
त्या तुझ्या चेहऱ्यात बघणे आवडते...

खिसा सैल तू सोडणार नाहीस कधी
म्हणूनच तुझे खिस कापणे आवडते...

तू असताना वडा-पाव मागवू कशी?
अरे कढी जर तुला भुरकणे आवडते...

'खोडसाळ' ही कसली आहे अजब गझल?
जिच्या फुग्याला तुला टोचणे आवडते...

वाकला

जो वाकला, जो टेकला
नवरा असे तो चांगला

रुसवे तुझे, फुगवे तुझे
खर्चात टाके मामला

अष्टौप्रहर म्हणसी कशी
"कसला अवेळी चोचला!"

करता सुखाचे बेत मी
तो बाळ छद्मी हासला

"वा, वा" कधी केले कुणी?
जो तो मला कंटाळला!

पायात जो होता म्हणे
मोजा मला ना गावला

माझाच तो होता जरी
कुत्रा मला का चावला?

खरडेन मी ओळी पुन्हा
हा मोह मजला जाहला

झालो कधी नि'वृत्त' पण
हसतील ना सारे मला?

का खोडसाळाला तुम्ही
वाळीत आहे टाकला?


मूळ जमीन : दाखला
जमिनीचे मूळ मालक : जयन्ता५२
आमच्या आधीचे कुळवाडी : केशवसुमार (पाहा चावला)

वीट - २

प्रेरणास्रोत : मिलिंद फणसे यांनी आणलेला वीट

रुदनभरल्या शायरीला मागणीचा पेच येथे
अन् विडंबन चाळण्याला होत रस्सीखेच येथे

रोजचा छळवाद यांच्या रोजच्या भडिमार गझला
वाचताना लागते मज नेहमीची ठेच येथे

मी कधीचा बेवड्यासम सोम-प्याले पीत आहे
का तरीही वारुणीचे डोह भरलेलेच येथे?

यत्न मी आजन्म केला माणसांशी बोलण्याचा
ते कधी बोलू न शकले, ते सुद्धा नवरेच येथे

मयसभा ही अप्सरांची, काय त्यांचे रूप सांगू
चेहरे एकाहुनी ते एकसे दिलखेच येथे

शेर तो घेऊन आला हे तुझ्या आहे भल्याचे
त्यातले काव्यांश पुरते 'खोडसाळा' ठेच येथे

कळेना

आमची प्रेरणा - पुलस्ति यांची गझल कळेना

मुलांना कसे वाढवावे कळेना
कशाने तयां झोडपावे कळेना

ज़नाना पहा सर्व बुरख्यात आहे
सख्यांना कसे ओळखावे कळेना

नको माहिती ही, नको अज्ञ सल्ले
कुणाला कधी गप्प व्हावे कळेना

किती टिप्पणे अन्‌ किती तज्ञ हल्ले
कुणाला कसे तोंड द्यावे कळेना

विजेवीण उत्सव करू साजरा हा
कपातीस का त्या डरावे कळेना

विचारी उमा,"सांग ना चंद्रमौळी
तुला वश कसे मी करावे कळेना"

बरी जीन्स्‌ अंगी, बरी की बिकीनी
कसे शेवटी मॉड व्हावे - कळेना

पुन्हा आणले शेर तू खोडसाळा
किती वाचकांना छळावे कळेना ?

सांगणे

आमचे प्रेरणास्थान - संपदा यांचे चांदणे

सिगरेट फुंकली मी, हुक्क्यास ओढले मी
धूरास आज साऱ्या छातीत कोंडले मी

भांडण कसे करावे अन्‌ वाद मी स्वत:शी?
नाते अता पतीशी म्हणुनीच जोडले मी

वैराग्य झूल घाली अनुराग सांड लुब्रा
संसार-जोखडाला त्यालाच जोडले मी

खाऊन घट्ट झाली यांची तुमान जेव्हा
शिंप्याकडून काही टाक्यांस सोडले मी

येईल राजपुत्र, जपली उरात स्वप्ने
आलास तू कपाळी, भाग्यास खोडले मी

लिहिलेस तू कवाफ़ी ते खोडसाळ होते
भिंतीवरी शिराला वाचून फोडले मी

लोक..

संतोष कुलकर्णी यांच्या लोक.. या गझलेने प्रेरित

पाहायाला आले लोक
या नाचा हो बाले लोक

का बैलांचे लागे लोण..?
..चाराखाऊ झाले लोक

प्रत्येकाला आली धार
..बहुधा थोडी प्याले लोक

जेव्हा तेव्हा डोके, हाय
माझे खात निघाले लोक

ज्याला त्याला होई भास
झालो पैसेवाले लोक

घेवुनिया झोपेचे सोंग
शृंगारात बुडाले लोग

..बुंदी की हा मोतीचूर..?
दात पाडण्या आले लोक...

नार ती कुठे...

नार ती कुठे गावत नाही
का मिठीत सामावत नाही?

दोष आरसा शोधत असतो...!
रूप त्यास मी दावत नाही

शब्दकोष मी शोधत बसतो
यमक सहज ते गावत नाही

जवळ बोलवे ती नजरेने
मी उगाच नादावत नाही

थंड येथले बियर किती हे...!
अन्य बारचे यावत नाही...!

दूध पाजता गणरायाला
सोंड त्यास तो लावत नाही...?

संतोष कुलकर्णी यांच्या फार मी कुठे... वर आधारित

सर्व आदरतात हल्ली बायकांना
कायद्याचा हात हल्ली बायकांना

सहज केसांच्या बटा कापून येती
बॉब आवडतात हल्ली बायकांना

राक्षसांची गरज नाही कलियुगाला
पुरुष घाबरतात हल्ली बायकांना

पाह्ती दिड्‍.मूढ सारे उपवधू नर
कोण आवडतात हल्ली बायकांना

पाहिजे नोकर नि कूली त्यांस; नवरे
धार्जिणे नसतात हल्ली बायकांना

भेट होते रूज़-पावडर-काजळाशी
चेहरे नसतात हल्ली बायकांना

देवही, भृंगा, तुझ्या-माझ्याप्रमाणे
चोरुनी बघतात हल्ली बायकांना

येतसे वाचून तव ओळी द्वयर्थी
'खोडसाळा', वात हल्ली बायकांना

आमची प्रेरणास्थाने - मिलिंद फणसे यांची जेहत्ते कालाचे ठायी आणि माफीचा साक्षीदार यांची काय द्यावा भात हल्ली जावयांना

आमची प्रेरणा - कुमार जावडेकर यांची गझल पोचुनी दारी तुझ्या

खोकुनी मागे तुझ्यावर मरत जायचे
मी घसे आता किती खाकरत जायचे?

रेखतो चित्रे जरा चावट सभोवती
त्यात रंग अनंग आपण भरत जायचे

किर्र काळोखात बुडता दशदिशा अम्ही
रातकीड्यांसम कुठे किरकिरत जायचे?

शूर्पणखेसम असे विद्रूप झाल्यावर
मी कशी वासूगिरी ती करत जायचे?

करत पत्नीच्या दिशेने वाटचाल, पण
हसत-खेळत का,तिला डाफरत जायचे!

वाचलेले शेष सारे विसरले तरी
खोडसाळाचे पकवणे स्मरत जायचे

आधार

आमचे प्रेरणास्थान - सुवर्णमयी यांची गझल निराधार

बायकांचे सरकार येथे
त्रस्त सारे भर्तार येथे

आवरावे 'ह्यां'ना कसे मी?
जाहले मी बेजार येथे

ही घडी नाही उत्सवाची...
चुकुन झाले गर्भार येथे

झोपला मंद कसा अवेळी?
जात वाया अंधार येथे

खुणवणाऱ्यांची रांग मोठी
छेडणारे चिक्कार येथे

सूर्य असता फिरतीवरी मम
काजवे आधार येथे!

धा इंची खोड

"ये आये, मला पन्नास रुपये दे!"
"कशापायी र मुडद्या? माझं श्राद्ध घाल्तुय्स का काय?"
"तसं नव्हं, म्हातारे. गावच्या थेटरामंदी आपल्या दादांचा नवा विंग्रजी शिणुमा लागलाय."
"आत्ता! खूळ लागलं की काय म्हनायचं तुला? दादा आनी विंग्रजी शिणुमा! सकाळी सकाळी ढोसून आलेला दिसतोयस, मेल्या.का कालचीच उतरली न्हाय अजून?"
"उगाच काहीतरी बोलू नगं, म्हातारे. ही प्येपरातली जाहिरात बघ आनी मग बोल. जवा तवा आपलं पिणं काढत असते."




दादा कोंडके सहर्ष सादर करीत आहेत मराठीतील पहिला ग्रामीण इंग्रजी चित्रपट
धा इंची खोड

पात्रं :
राबर्ट लंगडा
सोपी नव्हं
झाय्क सान्त्या
बिषप रिंगारिंगारोझेझ्‍
इनिस्पेक्टर पाश
शिटलास पांडू, आणि इतर

तवा मंडळी, बघायला इसरू नका दादांचा ग्रामीण इंग्रजी धमाल इनोदी मर्डर शिणुमा "धा इंची खोड"




"घे र माज्या लेकरा हे शंभर रुपये. येक तिकीट माझ्यासाठीबी काड! आरं, य़ाडल्त्स शिणुमा हाये त्यो. तुला येकट्याला आत सोडनार न्हायीत.आन्‍ मी सांगेन तवा शिणुमामंदी डोळं मिटून घेतले न्हाईस तर फोडून काढीन, मुडद्या! बघावं तवा त्या गोऱ्या म्याडमांची चित्रं चोरून बघत अस्तोस, मला ठाव नाय, व्हय?"

आमची प्रेरणा - अनुवहिनींचे प्रेमकाव्य जीव माझा अंतरी या

जाणते मज राहिला आकारसा नाही
आज का न्याहाळला मी आरसा नाही?

का मला नाकारले टवळ्या मनीसाठी
(एकपत्नी राहण्याचा वारसा नाही)

पेग छोटासा पुरेसे मद्य आहे का?
पेग पटियालाविना ओला घसा नाही

ते किती आले नि गेले पाहण्या मजला
रे तुझ्यासम एकही भंगारसा नाही

'खोडसाळा' म्यावऽऽऽऽ आता रोजचे आहे
आमचा बोका अता बेवारसा नाही

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds