शूल

मनोगत बंद असल्यामुळे मनोगतावरील खोडसाळासह अनेक विडंबक उपाशी आहेत.विडंबन करण्यास साहित्यिक खाद्य मिळेनासे झाल्यामुळे तडफडत आहेत. विद्येच्या माहेरघरी पुण्यनगरीत आमचे मित्र, थोर विडंबक केशवसुमार, ह्यांची अवस्था बिकट आहे. आम्हीही पाण्यातून बाहेर काढलेल्या मासळीसम झालो आहोत.(स्वत:ला 'आम्ही' म्हणणं कसं छान वाटतं म्हणून सांगू!)मनोगतींच्या प्रतिभेचं खाद्य विडंबनासाठी उपलबद्ध नसल्यामुळे नाइलाजाने आम्ही नजर वर नेली. महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ गझलकार, कै. कविवर्य सुरेश भट यांचा 'एल्गार'काल परत वाचत होतो. त्यातील 'हूल' ही गझल वाचताना लेखणी पुन्हा फुरफुरू लागली.स्वत:ला रोखण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण नाही जमलं. कुत्र्याची शेपुट काही सरळ होत नाही व जित्याची खोड (खरं तर खोडसाळाची खोड)काही मेल्याशिवाय जायची नाही.

कविवर्य सुरेश भट ह्यांची 'हूल'
उंबऱ्याने ‘नको रे!’ म्हणावे
अंगणानेच का गुणगुणावे?

आठवेना कधी प्रेम केले…
चांदण्यालाच का आठवावे?

देश आहे जरी हा फुलांचा
हे उन्हाच्या घरांचे विसावे!

श्वास हे श्वास नाहीत माझे…
हे तुझ्या लाजण्याचे सुगावे!

साक्ष काढू कशी आसवांची?
मागती लोक खोटे पुरावे!

सोसतो हा कसा आरसाही
अंग ओले तुझे बारकावे

भेटतो कोण येथे कुणाला?
भेटती एकमेका दुरावे!

धन्य झाले तुरुंगात कैदी…
शृंखलांची किती गोड नावे!

गाव माझे मला सापडेना
हूल देतात सारीच गावे!

----------------------

अन 'हूल' वाचून उठलेला आमचा खोडसाळ शूल

चुंबिताना ‘नको रे!’ म्हणावे
दूर पण तू जराही न व्हावे!

आठवेना कधी प्रेम केले…
रोज डोके तुझे का दुखावे?

बाज आहे जरी ही फुलांची
इंगळ्यांनी तिथेही डसावे!?

एकही मूल अद्याप नाही…
हे तुझ्या लाजण्याचे पुरावे!

धिंड काढू चला गाढवांची
माणसांवर तयांनी बसावे!

षौक आंबट असे आरशाला
अंग ओले तुझे का पहावे?

भेटते कोण नवऱ्यास टवळी?
पाहिजे बायकोला पुरावे!

लग्न, संसार, पत्नी, कलत्र…
शृंखलांची किती गोड नावे!

पाववाली मला सापडेना
मोत मेरीस जाऊन यावे!

नाव घेता तुझे, खोडसाळा
शूल उदरी कवींच्या उठावे!

3 Comments:

  1. केशवसुमार said...
    वा खोडसाळ पंत विडंबन एकदम झकास झालय.... सगळेच शेर एक से एक आहेत..
    तुमच्या सादेला आमची ही प्रती साद..

    वाढताना 'नको रे!’ म्हणावे
    आणि चोरुन मग का गिळावे!

    आठवेना कधी प्रेम केले
    चेहरे मग कसे आठवावे?

    बाप झालास बारा मुलांचा
    तू तुझ्या वारूस आवरावे!

    वास हे खास नाहीत माझे
    हे तुझ्या खेटसराचे सुगावे!

    एकही मूल अद्याप नाही
    मागती लोक मजला पुरावे!

    हासतो हा अता आरसाही
    अंग ढोले तुझे हेलकावे!

    ठेवतो कोण येथे कुणाला?
    प्रश्न असले कशाला पुसावे!

    दार माझे मला सापडेना
    सारखी दिसती सर्व दारे!

    धन्य झाले कवी आज सारे
    "केशवा" ठेवली खूप नावे

    केशवसुमार
    खोडसाळ said...
    वा वा वा, केशवा! क्या बात है.विडंबनाचे अप्रतिम विडंबन.
    हासतो हा अता आरसाही
    अंग ढोले तुझे हेलकावे

    मस्त.
    चित्तरंजन भट said...
    एकही मूल अद्याप नाही…
    हे तुझ्या लाजण्याचे पुरावे!

    नाव घेता तुझे, खोडसाळा
    शूल उदरी कवींच्या उठावे!

    वाव्वा मस्त विडंबन आहे खोडसाळपंत

Post a Comment



Newer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds