मायबोली ह्या अग्रगण्य मराठी संकेतस्थळावर गझलवैभव श्रीयुत वैभव जोशी ह्यांनी मायबोली गज़ल कार्यशाळा -1 आयोजित केली आहे. हे शुभकार्य हाती घेतल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांच्या या योजनेमुळे अनेक तरुण मराठी गझलेकडे आकृष्ट होतील, त्यांना मराठी गझल लेखन-वाचनाची गोडी लागेल, ताज्या दमाचे गझलकार मराठी सारस्वतास लाभतील ह्याविषयी आम्हांस तीळमात्र शंका नाही. त्यामुळे आम्ही अत्यंत आनंदात आहोत. अर्थात हे एकच कारण नाही हे मान्य करायलाच हवं. वैभव ह्यांनी लावलेल्या ह्या रोपट्यास एकदा गझलरूपी फळं येऊ लागली की आमचा कच्च्या मालाच्या तुटवड्याचा प्रश्न कायमचा निकालात निघेल हा स्वार्थी विचार मनात डोकावत नाही असं कसं म्हणू? कालच आम्ही आणि आमचे परममित्र केशवसुमार मनोगतवर घटत चाललेल्या गझलसंख्येविषयी चर्चा करीत होतो व ह्यामुळे होणाऱ्या आमच्या कुचंबणेचं दु:ख एक-एक पेग नेस्कॊफीत बुडवीत होतो (सूर्य अस्ताला गेला नसल्यामुळे आम्हाला दुधाची तहान ताकावर भागवावी लागली! सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.)आम्हास खात्री आहे की विडंबनाचे मनोगतावरील भीष्माचार्य माफीचा साक्षीदार हेही आमच्याशी सहमत असतील.

मायबोलीसारख्या संकेतस्थळावरील सुविद्य, सुसंस्कृत, साक्षेपी, प्रतिभावंत सदस्यांच्या मध्ये अस्मादिकांसारखा टपोरी लेखकु अजिबात शोभणार नाही ह्याची आम्हास पुरेपूर जाण असल्यामुळे तीव्र इच्छा असूनही आम्ही उपरोल्लेखित कार्यशाळेत भाग घेण्यापासून स्वत:ला रोखले आहे. ऋतू येत होते, ऋतू जात होते अशी पहिली ओळ गझलवैभवांनी कार्यशाळेत सहभाग घेणाऱ्यांसाठी दिलेली आहे. भाग घेत नसलो तरी त्यावरून आम्हास सुचलेल्या काही द्विपदी इथे देण्याचा मोह मात्र टाळवत नाही. आमच्या ह्या ब्लॊगझोपडीला चुकून कधी जर वैभवांचे पदकमल लागले तर त्यांनी इस्ला(दुरुस्ती) जरूर करावी ही नम्र विनंती.

ऋतू येत होते, ऋतू जात होते
निजे दुष्ट तो, मी ऋतुस्नात होते

सुगंधाळता मी तया होय पडसे
विवाहित जरी मी, अनाघ्रात होते

घरी बायको अन् सखी रंगसदनी*
असे षौक 'ह्यां'चे पिढीजात होते

असे काळ आता सख्या-साजणांचा
निघाले पती ते निकालात होते

नका ना, सख्यांनो, विचारू खुणांचे
कुठे ओठ होते, कुठे दात होते

निघाले तुला भेटण्या खोडसाळा
उभे नेमके 'हे'च दारात होते

* - खोडसाळाच्या कनिष्ठ मध्यमवर्गीय मनाची भरारी कविकल्पनेतही महालापर्यंत जाऊ शकत नसल्यामुळे रंगमहालाऐवजी रंगसदन!

3 Comments:

 1. केशवसुमार said...
  खो खो खो... ह. ह. पु. वा. गुरुजी मनोगता सारखे मयबोली वरुन गझलकार पळून जातील...
  Milind said...
  जियो खोडसाळपंत !

  आपले द्रोणाचार्यपद आपण पुरते सिद्ध केले आहे.

  अंगठा कधी देऊ ?

  - (एकलव्य) सर्किट

  ता. क. आपण माझ्या अनुदिनीवर व्यक्त केलेल्या शंकांची उत्तरे http://thebhandarkars.com/milind/archives/88 येथे मिळतील. धन्यवाद.
  खोडसाळ said...
  @ सर्किट
  एकलव्या,
  सांप्रत गुरुला अंगठा देण्याचा नसून दाखवण्याचा काळ आहे !
  :)

Post a CommentNewer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds