खोडसाळ उवाच

मायबोलीवर गझल कार्यशाळेची यशस्वी मुहूर्तमेढ रोवल्यानंतर गझलवैभवाचा रुचकर प्रसाद समस्त महाजालीय मराठी काव्यरसिकांना वाटण्याकरता मराठी गझलेचे सद्यकालीन द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांनी मराठी गझल : एक अखंड मैफल! नावाचे गुरुकुल स्थापन केले आहे. त्यांच्या या नूतन उपक्रमास आमच्या हार्दिक शुभेच्छा. (तो उपक्रम नाही हो ! अर्थात त्यासही आमच्या शुभेच्छा आहेतच. पण तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे.) या गुरुकुलात प्रवेश घेण्याची आमची खूप इच्छा होती परंतु गुरुद्वयीने "या संकेतस्थळावर विडंबने प्रकाशित केली जाणार नाहीत" असा नियमावलीतच सज्जड दम दिलेला असल्यामुळे आमच्या सर्व आशा-आकांक्षा धुळीस मिळाल्या.हा तर अगदी "प्रथमग्रासे मक्षिकापात" होता. मराठी गझलेच्या या अग्निहोत्रात ऋत्विजांनीच आम्हास प्रवेश नाकारल्याने आम्ही काही काळ अतिशय खिन्न झालो. मग आम्ही एकलव्यापासून स्फूर्ती घेऊन, गुरुंचे स्मरण करून इथे आमच्या या जालनिशीवर विद्याध्ययन करायचे ठरवले. 'तरही गझल' हा आदरणीय गुरुद्वयीचा अध्यापनाचा आवडीचा प्रकार असल्यामुळे आम्ही सध्या त्या अनुषंगाने अभ्यास करत आहोत. पण 'तरही' हा शब्द, का कुणास ठाऊक, आम्हास 'तर्र'ची आठवण करून देतो. [अवांतर : आमचे काही दुष्ट टीकाकार आमचे सारे लेखन तर्र अवस्थेतच केले जाते असे आमच्या अपरोक्ष बोलत असतात हे आमच्या कानी आले आहे. तुम्हा वाचकांच्याही जर हे कानी आले तर त्याकडे दुर्लक्ष करावे कारण हे टीकाकार दोन गटात मोडतात -
१) सदाशिव पेठी मनोवृत्तीचे सोवळे . यांना उत्तर दाग़ देहलवीने एकोणिसाव्या शतकातच दिलेले आहे :

"लुत्फ़े-मय तुझे क्या कहूँ ज़ाहिद
हाय कम्बख्त, तूने पी ही नहीं"
२) तीर्थप्राशनाच्या शुभकार्याचे निमंत्रण न मिळालेले असूयाग्रस्त. (हे बहुसंख्य ! यांची ही पोटदुखी दूर करणे आमच्या खिशाला परवडणार नाही.) ] त्यामुळे आम्ही आमच्यापुरते 'तरही गझल' चे 'तरी गझल' असे मराठीकरण केले आहे. एखादी तरी गझल (तरी शब्दावर इथे श्लेष केलेला आहे हे चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच ) रचून झाली की ती आम्ही या जालनिशीवर ताबडतोब सादर करू. वाचकांनी थोडी कळ काढावी. ( कोण रे तो सुटकेचा निश्वास सोडणारा ? )
वरील महाभारतीय रूपकांची यादी पुढे वाढवत आम्ही अशी प्रार्थना करतो की नव्या संकेतस्थळाच्या गुरुकुलातून लवकरच असे अनेक अर्जुन निर्माण होवो ज्यांना फक्त गझलरूपी पोपटाचा रदीफ़-काफ़ियारूपी डोळा दिसेल. हो, पण अशा अर्जुनांनी नंतर कुरुक्षेत्रावर द्रोण-कृपांनाच आव्हान दिले तर ? काळजी करू नका, त्या महाभारताचा आँखों देखा हाल तुमच्यापर्यंत पोचवायला हा खोडसाळ संजय तिथे असेलच. तेव्हा पाहात, आपलं, वाचत राहा तेंडूची पाने.

1 Comment:

  1. धोंडोपंत said...
    वा खोडसाळ महाशय,

    आपले लेखन खूप आवडले.आपली शैली खूप खुमासदार आहे. आपल्या संकेतपृष्ठावर आता रोज फेरी होईल.

    आपला,
    (हसरा)धोंडोपंत

Post a CommentNewer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds